Sunday, February 9, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलशब्दांची नवलाई : कविता आणि काव्यकोडी

शब्दांची नवलाई : कविता आणि काव्यकोडी

दादा म्हणतो कर म्हणजे,
हात माझा भारी
ताई म्हणते कर म्हणजे,
टॅक्स सरकारी

दादा म्हणतो चरण म्हणजे,
ओळ कवितेची
ताई म्हणते चरण म्हणजे,
ओळख ही पायाची

दादा म्हणतो जलद म्हणजे,
ढग आभाळातला
ताई म्हणते जलद म्हणजे,
लवकर लवकर चला

दादा म्हणतो कात म्हणजे,
कातडी सापाची
ताई म्हणते कात म्हणजे,
जोडी सुपारीची

दादा म्हणतो चिरंजीव म्हणजे,
टिकणारा कायमचा
ताई म्हणते चिरंजीव म्हणजे,
मुलगा आई-बाबांचा

एकाच शब्दाचे अर्थ दोन,
सांगतात दादा-ताई
मराठी भाषा आपली गुणाची,
सांगतात बाबा आई

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) कलिंगाच्या युद्धानंतर
तलवार दिली टाकून
बौद्ध धर्म स्वीकारला
अगदी मनापासून

पालीला राजभाषेची
मोकळी केली वाट
प्रजेचा विचार करणारा
कोण हा सम्राट?

२) पंखावर झेलले रंग
भिरभिरण्याचा छंद
पानाफुलांचा संग
शोधित फिरे मकरंद

पाहून त्याला मिळे
निखळ निर्मळ आनंद
ओळखा बरं कोण,
जगणे ज्याचे स्वच्छंद?

३) नाचरे ओढे
हरिततृणांचे गालिचे
डोलणारी झाडे
ताटवे फुलांचे

मनाला पाडती भुरळ
वळतात तिकडे पाय
जशी असते दृष्टी
तशी असते काय?

उत्तर –
१) सम्राट अशोक
२) फुलपाखरू
३) सृष्टी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -