Saturday, May 30, 2026

सरकारी योजना

सरकारी योजना

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ

एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, की पोलीस पथकाने मालाडच्या एस. व्ही. रोडवरून भिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या मोहिमेत एक साधारण विशीचा मुलगा त्यांना सापडला जो स्वतःविषयी नीटशी माहिती देऊ शकत नव्हता. त्याला या पथकाने पोलीस स्टेशनला आणले. त्याला व्यवस्थित अांघोळ घालून जेवण दिले आणि त्यानंतर तो थोडासा सावरला. त्याच्याशी प्रेमपूर्वक हितगुज साधल्यावर त्या मुलाला आपले नाव आठवले आणि मग हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेताना त्या मुलाविषयी अधिकची माहिती सापडली. तो नांदेडचा होता. तो चक्क होमिओपथीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो दीड एक महिन्यांपूर्वी घरातून बाहेर पडला होता आणि त्याच्यासोबत असलेली बॅग चोरीला गेल्यामुळे त्याच्यासंबंधीचे सगळे पुरावे नाहीसे झाले होते. या विद्यार्थ्याला मानसिक विकार जडल्यामुळे तो स्वतःची ओळख विसरून गेला होता. खरं तर त्याच्या मानसिक विकारावर औषधोपचार चालू होते. हरवलेल्या व्यक्तींच्या या शोधामध्ये त्या कुटुंबाला या मुलाची माहिती मिळताच ते तडक मालाड पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तिथे स्वाभाविकपणे त्या सर्वांनी म्हणजेच पोलीस पथक आणि या मुलाचे कुटुंब यांनी एक आनंदक्षण अनुभवला. मी काही हा प्रसंग बातमी म्हणून देत नाही पण अलीकडेच कुठेतरी हे वाचले आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.

या प्रसंगामुळे मी माझ्या बालपणात सहज शिरले. आमचे बाबा ‘भिक्षेकरी सुधारगृह’ म्हणजेच Beggar’s Home या संस्थेत पदाधिकारी होते. त्यामुळे या सुधारगृहाच्या प्रांगणाच्या आतच त्यांना सरकारी बंगला मिळाला होता जिथे आम्ही राहायचो. भिक्षेकरी सुधारगृहात रस्त्यावरील भिकाऱ्यांना पोलीस पकडून घेऊन यायचे आणि या संस्थेमध्ये आणून सोडायचे. इथे वेगवेगळी कामे करणारी वेगवेगळी माणसे होती. इथे आल्यावर त्या भिकाऱ्यांच्या वस्तूंची मोजदाद करून त्याला व्यवस्थित गुंडाळून त्यांच्या नावाचे स्टिकर लावून सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जायचे. त्यांना अांघोळ घालून इथले स्वच्छ कपडे दिले जायचे. त्यांना थोडेसे हे जेलसारखे वाटायचे कारण त्यांना या प्रांगणाच्या बाहेर जाण्याची बंदी होती. दोन-तीन दिवसांत त्यांना, त्यांच्या आवडी विचारून त्याप्रमाणे काम शिकवले जायचे. या संस्थेत शिंपी होते, माळी होते, सुतार होते, लोहार होते, बांधकामाचे ज्ञान असलेली माणसे होती. आणखीही काही तज्ज्ञ होते. हे तज्ज्ञ भिकाऱ्यांना, त्यांच्या आवडीचे काम शिकवायचे. शिंपी या पकडून आणलेल्या भिकाऱ्यांकडून, याच संस्थेत राहून सुधारणाऱ्या भिकाऱ्यांसाठी कपडे शिवून घ्यायचे, संस्थेत लागणारे पडदे, उषांची अभ्रे किंवा आणखी काही शिवणकामही ते शिकवायचे. इथे असलेले माळी त्यांना शेतीचे काम शिकवायचे. या संस्थेचे प्रांगण खूप मोठे होते आणि मोठ्या प्रमाणात शेतीसाठी जागा होती. त्यांना रोजच्या जेवणासाठी लागणारा तांदूळ तसेच भेंडी, कारले, कोबी, मिरच्या इत्यादी भाज्या इथेच पिकवल्या जायच्या. काहींना स्वयंपाकी म्हणून तरबेज केले जायचे जे आपल्या सोबतीच्या माणसांसाठी स्वयंपाक करायचे शिवाय स्वयंपाकात कोणते पदार्थ वापरतात, ते कोणत्या स्वरूपात आहेत हेही त्यांना सरळ कळायचे. संस्थेतील काही वस्तूंची दुरुस्ती असेल किंवा नवीन कपाट, टेबल लागत असेल तर सुताराकडून हे भिकारी व्यवस्थित शिकून घ्यायचे. गरज असेल तर बाहेरच्या लोकांसाठीसुद्धा इथे छोटे-मोठे फर्निचर बनवले जायचे. इथे धान्य दळण्यासाठी एक गिरणी होती ज्या गिरणीत याच भिकाऱ्यांसाठी लागणारे धान्य दळले जायचे त्यापैकी काही पिठाची गिरणी चालवायची कशी हे शिकायचे. इथे अनेक वाॅर्ड असल्यामुळे तिकडची दुरुस्ती, ऑफिसची दुरुस्ती आणि ऑफिसच्या स्टाफसाठी असलेल्या घरांची दुरुस्ती जसे की कडिया किंवा प्लंबर काम इथे या भिकाऱ्यांना शिकवले जायचे. त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांच्या नावाने लिहून ठेवला जायचा जो त्यांना जाताना दिला जायचा. अशा तऱ्हेने खूपशी स्वयंसिद्ध अशी ही संस्था होती. अनेक छोटी-मोठी पदे अनेक माणसे सांभाळत होती जी या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून असायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात आया, वाॅर्डबाय, नर्सेस आणि डॉक्टर्सही होते जे याच प्रांगणातील निवासी संकुलात राहायचे आणि या भिकाऱ्यांसाठी केव्हाही ते उपलब्ध असायचे. भिकारी जेव्हा संस्थेत यायचे तेव्हा त्यांना त्वचारोग झालेले असायचे, पोटाचे विकार असायचे, तर ही तज्ज्ञ मंडळी त्यांच्यावर योग्य औषधोपचार करायची. त्यांना योग्य प्रकारच्या टॉनिकच्या गोळ्या घेऊन त्यांची प्रकृती सुधारण्याचा प्रयत्न करायची. या संस्थेकडून भिकाऱ्यांची खाण्याची, राहण्याची सोय तर व्हायचीच; परंतु त्यांना एखाद्या कामामध्ये तरबेज केले जायचे. एकदा का लक्षात आले की ही माणसे या कामात तरबेज झाली आहेत किंवा इथून बाहेर पडल्यावर अशा तऱ्हेने ही कोणत्या तरी कंपनीत काम करून किंवा स्वतःचा व्यवसाय करून जगू शकतात तेव्हा त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जायची. इथे खास नियुक्त केलेले समाज कार्यकर्ते हे या सर्व शिक्षित भिकाऱ्यांना अशा चांगल्या लोकांशी जोडून द्यायचे की ज्यांच्याकडे हे पुढे काम करू शकतील!

या भिकाऱ्यांना आणल्यापासून ते इथून ते जाईपर्यंतचा त्यांचा प्रवास अधूनमधून बाबांच्या तोंडून ऐकायचो! अशा अनेक संस्था माणसांना, भिकारी होण्यापासून ते समाजात नावाजलेले तज्ज्ञ होण्यापर्यंतचा प्रवासात मदत करायचे.

जाता जाता मला एक अनुभव सांगायला आवडेल, की एक भिकारी या संस्थेत आला आणि तो काही केल्या त्याची गोधडी जमा करायला नकार देत होता. सगळ्यांनी त्याला समजावून सांगितले, की जाताना तुझ्या सगळ्या वस्तू तुला परत मिळणार आहेत तरीही तो काही केल्या ती द्यायला तयार नव्हता आणि मग खूप खोदून चौकशी केल्यावर लक्षात आले की या गोधडीमध्ये त्यांनी काही नोटा योग्य प्रकारे सरकवून शिवून आत सुरक्षित ठेवलेल्या आहेत. त्या नोटा जेव्हा बाहेर काढल्या तेव्हा ती रक्कम साधारण लाखभर रुपयाची होती असे बाबांनी आम्हाला सांगितले. ही साधारण चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे.

माणसे भीक का मागतात? यातून त्यांना किती उत्पन्न मिळते? खूप चांगली चांगली माणसंसुद्धा भीक मागू लागतात. कारण हे कष्ट न करता सहज मिळणारे उत्पन्न आहे. एकंदरीत अशा अनेक संस्था कार्यरत असतानाही भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे; परंतु एक आनंदाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, की बाबा जेव्हा एका जवळच्या मित्राच्या, मोठ्या बंगल्याच्या गृहप्रवेश कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्यांनी या बंगल्याचे काम ज्यांनी केले त्या कॉन्ट्रॅक्टरची ओळख बाबांना करून दिली. तो कॉन्ट्रॅक्टर पटकन बाबांच्या पाया पडला. बाबांनी त्याला अजिबातच ओळखले नाही इतका त्याच्यात फरक पडला होता. तो चक्क सुटाबुटात त्या कार्यक्रमासाठी आला होता. तसं त्याने इंजिनीअरिंग अर्धवट सोडले होते आणि तो मानसिक आजारपणामुळे भिकारी झाला होता, पण मुळात हुशार असल्यामुळे इथे भिक्षेकरी गृहात तो बांधकाम व्यवस्थित शिकला. छोटी-मोठी कामे घेत, मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला होता. खरं तर अशी अनेक उदाहरणे आहेत.

सरकार जेव्हा काही योजना राबवतात तेव्हा कोणतीही योजना १००% यशस्वी होतेच अशी नाही; परंतु १०% जरी यशस्वी झाली तरी ती फार मोठी गोष्ट आहे असे मला वाटते. आपण अशा योजनांना नावे ठेवण्यापेक्षा आपल्याकडून त्यासाठी काय करता येईल, याचा मात्र जरूर विचार करावा! pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment