मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर दमदार १५० धावांनी विजय मिळवला आहे. या सोबतच भारताने ही पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली आहे.
भारताने इंग्लंडला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना इंग्लंडला डाव ९७ धावांवर आटोपला. मोहम्मद शमीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. शमीने या सामन्यात ३ विकेट घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र त्यांना हा निर्णय चांगलाच महागात पडला. भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने ५४ बॉलमध्ये तब्बल १३५ धावा तडकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १३ षटकार आणि ७ चौकार ठोकले. अभिषेकच्या नावाने जणू काही वादळच वानखेडेच्या मैदानावर आले होते. त्यांच्या झोडपण्यासमोर इंग्लंडची अवस्था खरंच वाईट झाली.
अभिषेकव्यतिरिक्त शिवम दुबेने ३० धावांची खेळी केली. त्याने १३ बॉलमध्ये ३ चौकार आणि २ षटकार ठोकत ३० धावा केल्या.
पाच सामन्यांच्या मालिकेत हा अखेरचा सामना होता. पाचव्या सामन्यातील या विजयासह भारताने ही मालिका ४-१ने जिंकली आहे.