लंडन : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडवर 115 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा पहिल्या डाव अवघ्या 140 धावांत आटोपला होता, तरीही वेगवान गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी सामन्यात पुनरागमन करीत विजय मिळवला. बॅटिंगसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडला अखेरच्या डावात विजयासाठी 254 धावांची गरज होती. मात्र चौथ्या डावात किवी संघाचा डाव 138 धावांवर संपुष्टात आला.पावसामुळे दुसऱ्या दिवशी काही षटकांचा खेळ वाया गेल्याने प्रत्यक्षात हा सामना अवघ्या तीन दिवसांतच संपला.
कॉनवे-फिलिप्सची झुंज अपुरी
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 55 अशी होती. दिवसाच्या सुरुवातीलाच जोश टंगने टॉम ब्लंडेलला बाद केले.त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार बेन स्टोक्सने कॉनवेला 41 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर न्यूझीलंडचे उर्वरित फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर टिकू शकले नाही.फिलिप्स 44 धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडच्या विजयात गस अटकिन्सनने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने दुसऱ्या डावात 5 विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.याशिवाय ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.त्यामुळे न्युझीलंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात य़श आले नाही. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 140 धावांत सर्वबाद झाला होता.न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने 5 बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला. सुरुवातीला न्यूझीलंडचा विजय होईल असं मानले जात होते. मात्र त्यानंतर न्यूझीलंडची फलंदाजीही कोलमडली आणि त्यांचा डाव केवळ 113 धावांत आटोपला. इंग्लंडकडून पुनरागमन करणाऱ्या ओली रॉबिनसनने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या आणि संघाला 27 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या डावात पदार्पणवीर एमिलिओ गे याने 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला जेमी स्मिथ (39), बेन डकेट (33) आणि ओली रॉबिनसन (29) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव 226 धावांपर्यंत पोहोचला आणि न्यूझीलंडसमोर 254 धावांचे आव्हान उभे राहिले.मात्र अखेरीस इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचा पराभव झाला. यजमानांनी 115 धावांनी विजय मिळवत मालिकेची सुरुवात विजयाने केली.






