छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण रस्ते (Accident) अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ट्रकमधील सेंट्रिंग प्लेट अंगावर पडल्यामध्ये ४ मजुरांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. ट्रकमधील लोखंडी सेंट्रिंग प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील खाट विकणारे पाच परप्रांतीय मजूर हे सोमवारी कर्नाटक येथून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लोखंडी प्लेट नेणाऱ्या ट्रकने जात होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील ढाब्याजवळ चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग मजुरांच्या अंगावर पडला. गाढ झोपेमध्ये असताना ही घटना घडली. अंगावर लोखंडी प्लेट पडल्यामुळे मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमध्ये दिवाण मानसिंग गरासिया, विजय कंवरलाल गरासिया, निर्मल राजूजी गरासिया आणि विक्रम मदनजी कछावा अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व मध्य प्रदेशच्या निमच जिल्ह्यातील खडावदा येथे राहणारे होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे मजूर कर्नाटकात गेले होते. अपघातामध्ये मृत्यू झालेले चार जण हे गरीब कुटुंबातील असून ते खाट विणण्याचा व्यवसाय करत होते. या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे. (Accident)