Wednesday, June 3, 2026

Mamata Banerjee West Bengal : पश्चिम बंगालमधील बंडामुळे ममता बॅनर्जींसमोर मोठे संकट! पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा हक्क?

Mamata Banerjee West Bengal : पश्चिम बंगालमधील बंडामुळे ममता बॅनर्जींसमोर मोठे संकट! पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा हक्क?

पश्चिम बंगाल : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत झालेल्या फुटीची चर्चा देशभर झाली होती. आता पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) तशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये अंतर्गत बंड उफाळल्याने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. बंडखोर आमदारांच्या वाढत्या संख्येमुळे TMCचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘जोडा फूल’ यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे बंगालमधील राजकीय संकट?

टीएमसीमधून (TMC) हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या गटासोबत ५८ ते ६० आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी स्वतःला विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले असून विधानसभा अध्यक्षांनीही त्यास मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे. सध्या पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे ८० आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी कोणत्याही गटाकडे दोन-तृतीयांश म्हणजेच किमान ५३ आमदारांचे समर्थन असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऋतब्रता बॅनर्जी यांचा दावा खरा ठरल्यास ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो.

आमदारांनंतर खासदारही नाराज?

राजकीय संकट केवळ विधानसभेपुरते मर्यादित नसल्याचे दिसत आहे. कोलकाताचे (Kolkata) महापौर फिरहाद हकीम यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अस्वस्थता अधिक स्पष्ट झाली आहे. दरम्यान, भाजप खासदार सौमित्र खान यांनी दावा केला आहे की, टीएमसीचे सुमारे २० खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. लोकसभेत टीएमसीचे (TMC) २९ खासदार आहेत. जर यापैकी २० खासदारांनी गट बदलला, तर संसदीय पातळीवरही मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण होऊ शकते.

TMCचे नाव आणि ‘जोडा फूल’ चिन्ह कोणाला मिळेल?

एखाद्या पक्षात मोठी फूट पडल्यास निवडणूक आयोग ‘Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968’ अंतर्गत निर्णय घेतो. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणांप्रमाणे बंगालमध्येही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

निवडणूक आयोग निर्णय घेताना प्रामुख्याने खालील बाबींचा विचार करतो:

  • विधिमंडळातील बहुमत- आमदार आणि खासदारांची संख्या
  • संघटनात्मक बहुमत- पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा
  • मतांची टक्केवारी- निवडून आलेल्या प्रतिनिधींना मिळालेल्या मतांचे प्रमाण

जर बंडखोर गटाने बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे सिद्ध केले, तर ‘TMC’ हे नाव आणि ‘जोडा फूल’ हे चिन्ह त्यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?

१९८५ च्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार, एखादा आमदार किंवा खासदार पक्ष सोडल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. मात्र, दोन-तृतीयांश किंवा त्याहून अधिक सदस्यांनी एकत्रितपणे पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र गट किंवा विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारल्यास त्यांना कायदेशीर संरक्षण मिळते. त्यामुळे ८० पैकी ५३ पेक्षा अधिक आमदार बंडखोर गटासोबत असल्याचे सिद्ध झाल्यास, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता कमी राहते.

ममता बॅनर्जींसमोर मोठे आव्हान

टीएमसीमधील वाढत्या नाराजीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोरांना रोखणे, संघटना मजबूत ठेवणे आणि ‘खरी टीएमसी’ कोणाची यावरील संभाव्य कायदेशीर लढाईसाठी सज्ज होणे, यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा