सावरकर, गांधी, आंबेडकर… या तीन महामानवांचे विचार वेगवेगळे असतील, राजकीय मतभेद असतील, पण या सर्व महान राष्ट्रनिर्मात्यांनी एकमेकांचा कधीच अनादर केला नाही. आज, मात्र, राजकीय फायद्यासाठी या महापुरुषांच्या नावाचा वापर होताना दिसतो. आज काँग्रेस पक्ष, देशाच्या गृहमंत्र्यांची विधानेसुद्धा विपर्यस्तपणे पाहातो आहे आणि आंबेडकरांचे केवळ नाव वापरून राजकारण करतो आहे!
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलेल्या निवेदनाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जी निदर्शने केली, त्याचे हाणामारीत झालेले पर्यवसान… हे अत्यंत दुर्दैवी आहे. अमित शहा म्हणाले होते, ‘तुम्ही आंबेडकरांचे नाव घ्या, पण त्यांच्या विचारांबद्दल खरे मत काय होते, हे सुद्धा स्पष्ट करा.’ काँग्रेसने आंबेडकरांसाठी त्यांच्या जन्मगावी स्मारक बांधण्याला विरोध केला, तर भाजपने महत्त्वाच्या ठिकाणी आंबेडकरांची स्मारके उभारून ‘पंच तीर्थ’ची संकल्पना पुढे आणली. वास्तविक सभागृहातील काँग्रेस सदस्यांना उद्देशून शहा म्हणाले होते : ‘‘ आजकाल आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे म्हणत राहाणे ही (विरोधी पक्षीयांसाठी) फॅशन ठरते आहे… इतक्या वेळा देवाचे नाव घेतले असतेत तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता. तुम्ही आंबेडकरांचे नाव घेता यात आम्हाला आनंदच आहे. शंभरदा तुम्ही आंबेडकरांचे नाव घ्याल पण आंबेडकरांबद्दल तुमचे खरे मत काय होते हेही आता मी सांगतो. या देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची सक्ती आंबेडकरांवर का करण्यात आली? आंबेडकर म्हणालेले आहेत की अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीमुळे ते नाराज होते, तत्कालीन सरकारचे परराष्ट्र धोरण आणि ‘अनुच्छेद ३७०’ हे त्यांना पटत नव्हते. त्यामुळे त्यांना राहावेसे वाटत नव्हते. आंबेडकर आणि राजाजींसारखे लोक मंत्रिमंडळ सोडून जात आहेत, याबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र बी.सी. रॉय यांनी लिहिले. नेहरूंनी त्यावर उत्तर दिले की राजाजींच्या जाण्याने थोडेफार नुकसान होईल, पण आंबेडकर निघून गेल्यामुळे मंत्रिमंडळ कमकुवत होणार नाही. हे तुमचे (आंबेडकरांबद्दलचे) विचार. एखाद्याला विरोध करून वर त्याचेच नाव मतांसाठी घेत राहायचे, हे औचित्याला धरून ठरते का?’’
याच निवेदनात शहा यांनी, मध्य प्रदेशातील महू या डॉ आंबेडकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक बांधण्यास काँग्रेसने ‘वैयक्तिक स्मारके खासगी संसाधनांचा वापर करून बांधली पाहिजेत’ अशा कारणाने नकार दिल्याची आठवण करून दिली. ‘इतकी स्मारके (काँग्रेस नेत्यांची) सगळीकडे बांधली गेली आहेत त्यांचे काय?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महू, लंडन, दिल्ली, नागपूर आणि मुंबई येथे आंबेडकरांची स्मारके भाजपच्या सरकारने बांधली आहेत आणि आंबेडकरांशी संबंधित या पाच पवित्र स्थानांचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंच तीर्थ’ या शब्दात केलेले आहे. याची आठवण शहा यांनी दिली. यात आंबेडकरांचा अपमान कुठे आहे? काँग्रेस पक्षाचा दुटप्पीपणा उघड करण्याचा शहा यांचा हेतू होता. स्वर्गाबद्दलची त्यांची टिप्पणी आंबेडकरांच्या अनुयायांना उद्देशून नव्हती, तर आंबेडकरांना केवळ मते मिळविण्याचे साधन म्हणून पाहणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षांसाठी होती. त्यातही लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, शहा यांच्या ९० मिनिटांच्या भाषणादरम्यान काँग्रेस पक्षाकडून कोणताही विरोध झाला नाही. काही तासांच्या नंतर, जणू कोणीतरी उकसवल्यामुळे, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विरोध सुरू केला. यातूनच स्पष्ट होते की, इथे कोणतीही खरी भावना दुखावलेली नव्हती, तर हा सारा राजकीय बनाव होता.
महात्मा गांधी, आंबेडकर आणि सावरकरांसारख्या नेत्यांना कोणत्याही एका गटाची किंवा पक्षाची मालमत्ता मानता कामा नये. ते आपले राष्ट्रीय नायक आहेत. ते नेहमीच एकमेकांशी सहमत होते, असे नाही. गांधींनी त्यांच्या शेवटच्या विधानात लिहिले होते की, काँग्रेसला सत्तेचे साधन ठरू देऊ नये आणि म्हणून ती विसर्जित केली पाहिजे. आंबेडकर हे काँग्रेसचे आजीवन टीकाकार होते. एका प्रसंगी तर, काँग्रेस पक्षात जाण्यापेक्षा आत्महत्या करेन अशा अर्थाचे उद्गार त्यांनी काढले होते. सावरकरांचेही गांधींच्या राजकारणाशी मतभेद होते. तरीही त्यांनी नेहमीच अत्यंत परिपक्वता दाखवली. १९४७ सालच्या हंगामी सरकारमध्ये आंबेडकर, राजगोपालाचारी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या विरोधी नेत्यांचा समावेश करण्यास गांधींनीच नेहरूंना सांगितले. सावरकरांनी १९३४ मध्ये गांधींना रत्नागिरीला आमंत्रित केले आणि दोघांनी दिवसभर चर्चा केली. या नेत्यांच्या राजकीय मतभेदांच्या पलीकडे त्यांचे राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी मोठे योगदान निश्चितपणे आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि सावरकर हे केवळ एका पक्षाचे वा गटाचे नेते नव्हते. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी कार्यरत होते.
आजच्या काळात, विरोधक एखाद्या विषयावर टिकाटिप्पणी करताना महान नेत्यांच्या नावांचा चुकीचा वापर करत आहेत. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले, मात्र त्याच वेळी, त्या ग्रंथांतील काही चांगल्या गोष्टींची प्रशंसा केली. या नेत्यांनी विचारांचा आदर ठेवत प्रगतीचा मार्ग शोधला.
महान नेत्यांच्या विचारांची वा कृतीची छाननी आणि त्यांवर टीका होण्यात काही वावगे नाही. जगभर अशी उदाहरणे आहेत. पण आता प्रश्न असा आहे – आपला राजकीय वर्ग अशा राष्ट्र नायकांना ‘एकतर देव, नाही तर दानव’ असे न मानता, आदराने वागवण्याची परिपक्वता दाखवणार का? आपण विधायक मतभेद स्वीकारू शकणार का, कुणाचेही दानवीकरण न करता? चला, या महान नेत्यांकडून शिकूया. देशासाठी त्यांच्या त्यागाचा आणि योगदानाचा आदर करूया. आपल्या मतभेदांवर आदराने चर्चा करण्याची परंपरा पुन्हा सुरू करूया.