- राजेश सावंत
एकदा नव्हे तर दोन वेळा हातातोंडाशी आलेल्या मुख्यमंत्रिपदाचा घास सोडायला लागला तर एखाद्या नेत्याची (Devabhau) अवस्था काय होऊ शकेल? या गोष्टीचा फायदा घेऊन एक तर त्याला राजकारणातून संपवला जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल. याच गोष्टी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाबतीतही करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण जिद्द, संयम आणि राजकीय डावपेचाच्या जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाटावर पुन्हा झळाळून उठले. ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखरच पुन्हा आले. आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झालेत. २०१९ साली पूर्ण बहुमत मिळालेलं असतानाही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा’. आता तेच शब्द फडणवीसांनी खरे करून दाखवलेत. राजकारणात शेरोशायरी करणं फार सोपं असतं. पण, देवेंद्र फडणवीस होणं मुळीच सोपं नाही. २०१४ ला ते मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षाचा राहिलाय. अनेकांनी त्यांना चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण, महाराष्ट्रातील या अवलियाने भल्याभल्यांना गारद केले. आता ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेताहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास राहिलाय. संघाचे सदस्य, नगरसेवक, महापौर, आमदार, भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा कमी वयात मोठा राजकीय प्रवास आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपुरात झाला. सरस्वती विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादित केली.
त्यानंतर पुढे बर्लिन येथे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन पद्धती आणि तंत्र पदविकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण सुरू असतानाच १९८९ साली नागपुरात वॉर्ड संयोजक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. तसंच त्यांच्याकडं १९९० मध्ये नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्रात कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशीही ते संबंधित होते. रामजन्मभूमी आंदोलनात फडणवीसांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी ते १९९२ ते १९९७ दरम्यान नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९७ ते २००१ दरम्यान सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं. उत्तम वक्तृत्त्वं, दांडगा अभ्यास आणि प्रचंड लोकसंग्रह या बळावर १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४, २००९, २०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्ये सलग सहाव्यांदा ते आमदार म्हणून विजयी झालेत. २०१० मध्ये भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस, २०१३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री, २०१९ ते जून २०२२ पर्य़ंत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अशी पदे त्यांनी भूषवली आहेत.
Chitra Wagh : मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नहीं! चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचले
यासोबतच फडणवीस हे २०१४ ते २०१९ दरम्यान सलग ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याकडून धोका मिळाल्यामुळं त्यांना दुसऱ्यांदा मिळालेली मुख्यमंत्रीपदाची संधी औटघटकेची ठरली. अवघ्या ३ दिवसात फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु, कोरोना महामारीच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ऐतिहासीक ठरली. एकीकडं राज्यातील जनतेशी संपर्क कायम ठेऊन ग्रास रूटवर काम करीत असताना त्यांनी अडीच वर्षे सातत्यानं महाविकास आघाडीचे वाभाडे बाहेर काढले.
विरोधी पक्षनेते असतानाही देवेंद्र फडणवीसांनी संयम सोडला नाही. जून २०२२ साली झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमाचा असा काही प्लॅन केला की कुणाच्या ध्यानीमनी नसतानाही भाजपचे धनंजय महाडिक निवडून आले. त्यावेळी एकत्रित शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला. संख्याबळ नसतानाही त्यांनी भाजपचा खासदार निवडून आणला. त्यावेळी खुद्द शरद पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, अनेक लोकांशी जोडून घेतलं, असं पवार म्हणाले होते. त्याच रात्री शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि सूरतमार्गे गुवाहाटीची वाट धरली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घेतल्यानंतर पूर्ण संख्याबळ असतानाही, संधी असतानाही देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रिपदाची संधी पुन्हा हुकली. त्यावेळी कमी आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद घ्यावं लागलं. अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा संधी असतानाही मुख्यमंत्रिपद हातून निसटलं. ही देवेंद्र फडणवीसांच्या संयमाची पुन्हा एकदा परीक्षा होती. या सरकारमध्ये शिंदेंकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं पसंत केलं.
त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी करुन घेतला. यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. याच काळात लाडकी बहिण योजना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्कातील सातत्य या बळावर फडणवीस यांच्या नेतृत्त्वात २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळवला. राज्यात २०१९ मधील निवडणुकीच्या प्रचारात “मी पुन्हा येईल” या फडणवीसांच्या वाक्याची विरोधकांनी प्रचंड टवाळी केली. परंतु, फडणवीसांनी टीकाकारांच्या तोंडी न लागता आपल्या कामावर फोकस करत सत्तेत कमबॅक केलंय. भाजपनं त्यांच्या इतिहासातल्या सर्वाधिक जागा तर जिंकल्याच, पण महायुतीतील इतर पक्षांचे आमदारही निवडून आणले. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता पुन्हा आलेत आणि तेही एकहाती बहुमत घेऊन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर आता त्यांचे (Devendra Fadnavis) हेच एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा दिसणार आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रहारतर्फे खूप सा-या शुभेच्छा!