Monday, February 10, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखMaharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीचे साद, पडसाद

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीचे साद, पडसाद

रवींद्र मुळे

निवडणुका झाल्या. निकाल लागले. निकाल धक्कादायक आहेतच, पण जो तळातील कार्यकर्ता होता त्याला कदाचित हा निकाल इतका धक्कादायक वाटत नसावा. मराठी माध्यमांनी महाराष्ट्राचे रणनीतीकार म्हणून नेहमीप्रमाणेच ज्या नेत्याला चाणक्य, जाणता राजा वगैरे पदव्या बहाल केल्या तो शेवटच्या क्षणी काही विकृत कारस्थाने करून पुन्हा गेल्यावेळीसारखे राज्य आणेल म्हणून त्याला ती संधीच न ठेवता जनतेने त्याच्या विकृत कारस्थान प्रणालीला पूर्णपणे बाहेर फेकून दिले आहे.

ज्याने हिंदुत्व आपल्या खुर्चीसाठी विकून अनेक भोळ्या-भाबड्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना निराशेच्या अंधारात लोटले, ज्याच्याबद्दल चाय बिस्कीट माध्यमांनी सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले अशा नकली, ढोंगी, अहंकारी माणसाला, त्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षाना कायमचा प्रतिबंध घालून जनतेने त्याला घरी बसवले. संविधान आणि आरक्षण आणि जातीनिहाय गणना या मुद्द्यांना घेऊन हिंदूंच्या मधील जात व्यवस्थेला संघर्षात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करणारा सॉरासचा एजंट आणि त्याचे चार चमचे (संगमनेर, कऱ्हाड, लातूर आणि साकोल) जे आपल्या आपल्या ठिकाणी सरंजामदार होते. या सगळ्यांना हिंदू समाजाने एकमुखाने नाकारत कायमचे घरी बसवले आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातने पळवले. गुजरातने महाराष्ट्रावर आक्रमण केले. हे भंपक विमर्श पसरवणाऱ्या भोंग्याला आणि त्याचे प्रसारण करणाऱ्या माध्यमांना समाजाने जागा दाखवून दिली आहे. मोदी, शहा, योगी यांची मर्यादा सोडून अपमान आणि अदानी, अंबानी यांचे भजन आणि त्यातून विकासाला विरोध हे आता लोकांना सहन होण्याच्या पलीकडे आहे.

महिलांच्या प्रती दुय्यम भाव, त्यातून लाडकी बहीण योजनेला विरोध याचा महिलांवर होणारा परिणाम हे लक्षात न घेता नाना गँग उद्धटपणे बोलत राहिली. अहिल्या नगर झाले आणि त्यांनी अहिल्यादेवी यांच्याशी जणू वैर धरले. लोकांना हे कळत होते. महिला प्रक्षुब्ध होत्या. लव्ह जिहादकडे कानाडोळा करणारे सरकार महिलांना नको होते. छत्रपतींचा बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींचा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी समाज मतदानाला सज्ज झाला होता.‘एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र’ हा संतांचा संदेश समाजाला भावला होता. त्यामुळे आपल्या मतांच्या शक्तीची जाणीव त्याला झाली होती. हनुमंताला जांबुवंत आठवण करायला होते, अर्जुनाला युद्धासाठी भगवान श्रीकृष्ण सिद्ध करण्यास होते. येथे समाजरूपी हनुमंत आणि अर्जुन यांना असंख्य जांबुवंत आणि श्रीकृष्णांनी जागे केले. सिद्ध केले आणि त्यामुळे या रामायण, महाभारतात रावण, कुंभकर्ण, शुर्पणखा, दुर्योधन, दुःशासन भस्म झाले. हा निकाल कुणा एका पक्ष, संघटना, नेता यांचा विजय आहे असे मानण्याची आवश्यकता नाही. हा विजय समाजाने साकारलेला विजय आहे. हा समाजाचा विजय रामगिरी महाराज यांना धमकी देणाऱ्यांना थप्पड मारणारा आहे. हा समाजाचा विजय मुस्लीम समाजाबरोबर निर्ल्लजपणे गुडघे टेकवून हिंदूंच्या जमिनी, मंदिरे आणि माता-भगिनी यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या लोकांना कानशिलात
मारणारा आहे.

छत्रपती शिवरायांचा, संभाजीराजे यांचा इतिहास विकृत करून त्यावर आपल्या मतांचा सौदा करण्यासाठी बी ग्रेड आणि तत्सम संघटना यांच्या माध्यमातून डाव रचणाऱ्या मंडळींना समाजाने त्यांची जागा दाखवली आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान मग स्वामी समर्थ असो प्रभू रामचंद्र असो किंवा गणपती असो, त्यांची चेष्टा करणाऱ्यांना कायमचे घरी बसवण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. हिंदू समाजाने केवळ एवढे एक काम केले की, हिंदू म्हणून मतदान करायचे ठरवले, तर या राष्ट्रविरोधी शक्तींचा पालापाचोळा झाला. जर पुढील काळात उर्वरित ३५ टक्के हिंदूंनी मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे ठरवले, तर हिंदूंच्या विरूद्ध वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही. पुढील काळात त्यासाठी सजग राहण्याची ही खरी सुरुवात झाली आहे. आचार्य स्वामीजी गोविंददेव गिरी, रामगिरी महाराज यांच्यापासून सर्व संत महंत या वेळी कुठलाही आड पडदा न ठेवता बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करत होते. अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत होते. उदय निरगुडकर, सुरेश चव्हाणके हे त्यात अग्रेसर होते. नरेंद्र पाटील मराठा समाजाला समजावून सांगण्यासाठी अहोरात्र फिरत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या कष्टाला तर तोड नाही. राहुल सोलापूरकर सारखे अभिनेते आणि अविनाश धर्माधिकारी सारखे माजी सनदी अधिकारी यात मागे नव्हते.

एकीकडे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे; पण सातत्याने त्यांचा अपमान करायचा. काँग्रेसचा हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील काळा इतिहासच या निमित्ताने पुढे आला. क्षितिज गायकवाड सारखे दलित तरुण नेते हिरिरीने पुढे आले. त्यांनी मांडलेला विषय दलित बंधूंना समजत गेला. हे आणखी एक या निवडणुकीचे सकारात्मक वैशिष्ट्य. या सगळ्या घडामोडीत समाजाने निवडणूक हातात घेतली. समोरून कट, कारस्थाने, अन्याय याचा कळस गाठल्यावर समाजाने पक्का निर्धार केला. जातीमध्ये विभागण्यावर, ‘एक है तो सेफ है’ किंवा ‘बटेगें तो कटेगें’ या घोषणा आणि त्या मागील आशय समाजाने लक्षात घेतला आणि तेथेच निवडणूक निकाल नक्की झाला. मतदानाची वाढलेली टक्केवारी सांगत होती, निकाल काय लागणार!

औरंगजेब, अहमद शहा यांचे उदात्तीकरण करताना अहिल्यादेवी, संभाजी राजे याना नाकारणे, पांडुरंगाच्या वारीमध्ये घुसून त्याला अपवित्र करणे आणि एकात्म वारकरी समाजात छेद निर्माण करणे या गोष्टी हिंदू समाजाला बिलकुल आवडलेल्या नाहीत. पुढील काळात हिंदू समाजाला कुणी गृहीत धरून चालणार नाही हे येथे स्पष्ट झाले आहे. महायुतीतील सर्वच पक्षाच्या उमेदवारांना, समाजाने हिंदुत्त्वाचा राजकीय आशय स्वीकारल्यामुळे विजय प्राप्त झाला आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. निखिल वागळे, विश्वंभर, सरोदे सहित उल्का आणि तथाकथित पुरोगामी काजवे यांना आता अंधारात नाही, तर हिंदुत्त्वाच्या स्वच्छ आणि देदीप्यमान प्रकाशात आपले अस्तित्व शोधावे लागणार आहे. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने आता कात टाकली आहे.

व्होट जिहाद, वक्फ बोर्ड आणि लव्ह जिहाद याने क्षुब्ध झालेल्या हिंदू मनाला ही निवडणूक व्यक्त होण्याची संधी होती. ती या समाजाने चोखपणे साधली. त्यामुळे हा विजय समाजाला समर्पित करूया आणि सजग राहण्याचे हे आंदोलन दीर्घकाळ पुढे नेण्यासाठी सज्ज होवू या!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -