प्रा. देवबा पाटील
दिवशी जयश्री खेळून घरी आली तेवढ्यात तिचे बाबाही शेतातून घरी आले. आल्या आल्याच जांभई देत ते जयश्रीला म्हणाले, “खूप थकलो आज मी. जाम भूक लागलीय बाळा. थोडेसे डोकेही दुखून राहले. आईला म्हणा जेवणाचे जरा लवकर कर. मी हातपाय धुऊन आलोच.” “बस, पाच मिनिटांत स्वयंपाक होतो हो. जयू बाळा, तोपर्यंत तू ताटं वाढण्याची तयारी कर.” आई म्हणाली. “हो आई.” जयश्री उठून ताटं घेत म्हणाली, “आई थकणे म्हणजे काय गं?” आई म्हणाली, “ शरीराला श्वासावाटे पुरेसा प्राणवायू न मिळाल्यास अथवा काही कारणाने शरीरातील प्राणवायू कमी झाल्यास आपणास थकवा येतो. खूप वेळ शारीरिक कष्ट, व्यायाम किंवा बौद्धिक काम केले म्हणजे आपल्या स्नायूंमधील प्राणवायू कमी होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. यालाच थकवा येणे म्हणतात.” “ मग धाप कशी काय लागते?” जयश्रीने प्रश्न केला.
“आपण जेव्हा खूप जोराने व वेगाने काम करतो तेव्हा आपला श्वासोच्छवास खूप जोराने व वेगाने होतो. यालाच धाप लागणे म्हणतात.”
“ आई-बाबा म्हणाले, थोडेसे डोके दुखत आहे. हे डोके कसे दुखते गं?” जयश्रीने प्रश्न केला. आई म्हणाली, “आपला मेंदू हा हाडांच्या कवटीत सुरक्षित असतो. त्या कवटीवर असणाऱ्या धमणी व शिरांमध्ये “शूलचेतक” तंतू असतात. ताणतणावासारख्या काही कारणाने हे शूलचेतक तंतू जेव्हा उद्दिपीत होतात तेव्हा डोके दुखते. तसेच ज्यावेळी कोणत्याही कारणाने आपल्या डोक्याच्या वा मानेच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागाच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होतात त्यावेळी त्या तणावांमुळे ज्या वेदना निर्माण होतात त्या त्यांना जोडलेल्या मज्जातंतूद्वारे आपल्याला जाणवतात. त्यालाच आपण डोकेदुखी वा मानदुखी असे म्हणतो.” “मग बाम लावल्याने डोकेदुखी कशी थांबते?” जयश्रीने विचारले. “बाम चोळल्याने त्या चोळलेल्या ठिकाणी उष्णता निर्माण होते. ती उष्णता त्या ताणलेल्या स्नायूंना पूर्ववत होण्यास मदत करते. बाम चोळताना त्या स्नायूंच्या पेशीही चोळल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावरील ताणही कमी होतो. तसेच चोळलेला बाम त्वचेच्या छिद्रांतून झिरपून तेथील स्नायूंमध्ये शिरतो आणि त्यातील आतील स्नायूंनाही उष्णता मिळून त्यांच्यावरील ही ताण कमी होतो. स्नायू ताणलेल्या स्थितीत जी वेदना होते ती त्या स्नायूंवरील ताण कमी झाला म्हणजे ती वेदनाही कमी होते. अशा रीतीने बाम लावल्याने डोकेदुखी थांबते; परंतु बामामुळे फक्त ताणामुळे निर्माण झालेले दुखणेच थांबते. बाम लावूनही डोके दुखणे थांबत नसल्यास त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घेणे योग्य असते.” आईने सांगितले.
“आई, आता बाबांना जांभई आली होती. आपणास जांभई कशी काय येते गं आई?” जयश्रीने विचारले.
आई सांगू लागली, “भूक, कंटाळा, आळस, थकवा आणि झोप अशा कारणांनी जांभई येते. नकळत तोंड उघडले जाऊन जोराने हवा आत घेणे व त्वरित तशीच बाहेर काढण्याच्या क्रियेला जांभई असे म्हणतात. विविध शारीरिक क्रियांमध्ये शरीरातील ऑक्सिजन वापरला जातो व त्याचे प्रमाण कमी होते. तसेच कंटाळा आला म्हणजे श्वसनक्रिया हळू होते व शरीरातील प्राणवायू कमी होतो. आपण नाकावाटे जेव्हा श्वासोच्छवास करतो तेव्हा शरीरात पुरेसा प्राणवायू जात असतो. पण जेव्हा शरीरातील प्राणवायू कमी होतो तेव्हा श्वसनसंस्थेशी संबंधित मज्जापेशी कार्यान्वित होतात. त्या मेंदूला तसा संदेश देतात. मेंदू तोंडाला खोल श्वास घेण्याचा आदेश देतो. तोंड पूर्णपणे उघडले जाते. हवा आत खेचली जाऊन सरळ श्वासामार्गात शिरते नि रक्ताला व पेशींना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होतो.” “ जांभई ही लागट असते, एकाला आली की दुसऱ्यालाही येते असे म्हणतात. ते खरे आहे का आई?” जयश्रीने शंका उकरली. “एकाने जांभई दिली की, दुसराही देतो याला काहीच शास्त्रीय कारण नाही; परंतु जांभई देताना तोंड आणि घशातील अन्ननलिकेवरील झडप एकाच वेळी उघडते. त्यामुळे एखादेवेळी पोटातील पचनक्रियेतील सहभागी रसांचे वास बाहेर येतात. ते इतरांना खराब वाटू नये म्हणून तोंडापुढे हात मात्र धरतात.” जयश्रीलाही आता जांभई आली. ते बघून “तुलाही आता कंटाळा आला वाटते?” आईने तिला विचारले.
“हो आई.” जयश्री म्हणाली व त्यांचे संभाषण थांबले.