मुंबई : महाराष्ट्रात राज्य सरकारनं गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिवाळीआधी राज्य सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली होती. राज्य सरकारची ही एक महत्त्वकाक्षी योजना आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या ही योजना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून, या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असतानाच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेंतर्गत जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ऍडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार.
महायुती सरकारवर एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी टीकेची लाट पसरवली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून देखील तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मतदान पार पडल्यांनंतर लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये असताना म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे मला म्हणाले की, दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो, लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, मविआच्या पायाखालची वाळू सरकली आहे . विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही, निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता खात्यामध्ये जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
#Live l 16-11-2024 📍गुहागर, रत्नागिरी
🏹 महायुती उमेदवार श्री राजेश बेंडल यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा – लाईव्ह
https://t.co/Kd6KltOYUD— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 16, 2024