पंढरपूर : जादू-टोणा, तांत्रिक अशा गोष्टी अंधश्रद्धा असल्या तरीही अजूनही राज्यात अनेक जण याचे बळी पडतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना सांगली जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. महिलेला मूल होत नसल्यामुळे तिचे सासरचे कुटुंब अंधश्रद्धेचे बळी पडले. इतकेच नव्हे तर तिच्यावर सामूहिक बलात्कार देखील करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यामधील एका विवाहित महिलेच्या तिच्याच सासरच्या व्यक्तींनी शारीरित आणि मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. या महिलेला मूल होत नसल्यामुळे सासरचे कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेलं. त्यामुळे घरात सतत मांत्रिकाला बोलवलं जात होतं. यावेळी महिलेला मांत्रिकाचे पाय धुवून ते पाणी प्यायला सांगितले होते. असा गलिच्छ प्रकार विश्रामबागेतील घरी तसेच अर्जुनवाडमधील मंदिरात सुरू होता.
दरम्यान, काही काळापूर्वी या तरूणीचे संपूर्ण सासरचं कुटुंब गाडीतून निघाले असता वाटेत त्यांची गाडी बंद पडली. यावेळी सासरच्या मंडळींनी अर्जुनवाडमधील बुवा काशिनाथ उगारे याला फोन केला. यावेळी या कथित बाबाला संपूर्ण हकीकत सांगण्यात आली. त्यावेळी मांत्रिकाने पीडितेच्या कुटुंबीयांना ती महिला अपशकुनी असून तिचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले. तिच्यावर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि मांत्रिकाने अर्जुनवाड याठिकाणी सामूहिक बलात्कार केला.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेची खराब अवस्था पाहून माहेरच्यांनी विचारपूस केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पती, दीर, सासू, सासरे आणि मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल बेड्या ठोकल्या आहेत.