Thursday, January 16, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनातं... जगण्याची शक्ती.....

नातं… जगण्याची शक्ती…..

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

नातं म्हणजे मैत्री, स्नेह, माया. मग ते रक्ताचे, धर्माचे असो किंवा मानलेले ! त्या नात्यात असते फक्त टिकवण्याची धडपड. नसते कोणती अपेक्षा. अपेक्षांचे ओझे लादले की, नातं वाकतं. अपेक्षा म्हणजे कोणतीही अामिष, आपण सगळे काही विकत घेऊ शकतो पण कोणाचे मन आणि भावना मात्र विकत घेऊ शकत नाही. मन, भावना जपाव्या लागतात. त्या दुखावून चालत नाही. तरच नाते मजबूत उभे राहते. नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास ! जो नात्याला घट्ट बनवतो. विश्वास तुटला, तर नाते टिकत नाही. नात्यात खरं तर पारदर्शकता हवी. आपण आपल्यापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी जास्त घेतो. तेव्हाच ते नातं टिकतं. आपण समोरच्याच्या मनाचा जितका विचार करतो त्या त्यागातच आपण आपलं सुख शोधत असतो. त्याच्या सुखासाठी आपण आपल्या सुखाचा त्याग करतो. नातं हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडेच दिसतो पण जाणवत नाही म्हणून अशी नाती तयार करा की जी दिसली नाही तरी चालतील पण जाणवली मात्र पाहिजे. मनाला सुखदायी असली पाहिजेत. मनाने मनोमन मनाला मनवलं की, मनही मनाचं मानत. स्मितहास्य, संवाद साधून मन सुखावतं. तर खोटं बोलून अहंकाराने कोणाला दुखावून आपण नातं ठेवू शकत नाही. हसून काहीतरी बोलायचं आणि हसून खूप काही सोडायचं असं तर आयुष्य जगायचं असतं. ज्यामुळे आपण आपले आयुष्य समाधानी जगू शकू. या आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त सुख देतात. काही नाती जगणं श्रीमंत करून जातात. ज्या नात्यांनी जगणं समृद्ध होतं, ते नातं अर्थपूर्ण होतं. पण काही नाती आयुष्याला चटके, दाह, दुःख, जखमा, सल देऊन जातात. आणि त्या नात्यांनी आयुष्य उद्ध्वस्त, बरबाद होऊन जातं.

जो फरक औषधांनी पडत नाही तोच मनमोकळे बोलल्याने, समाधानाने होतो. ती आपली खरी कमाई आणि तीच आपली माणसं. वेदना दिसत नाहीत तरी रडवून जातात. त्यावेळी आपल्याला व्यक्त व्हायला हवं असतं थांबवा म्हणून आपल्या आठवणी थांबत नाहीत, जीव गुंतवून जातात. मन उदास होतं. सोबत हवं असतं ते खंबीर, विश्वासू मन, संवेदनशील नातं. कोणत्याही नात्यात मनाचा ओलावा, जीवाला जीव देणारी, निरपेक्ष प्रेम करणारी माणसं असतील, तर ते नातं अधिकाधिक खंबीर बनत. मनाची मुळे इतकी मजबूत असतात की, सोड म्हणता सोडवत नाहीत. नातं कोणतंही असो ते टिकतं दोन्ही बाजूंनी समसमान जबाबदारीने वागल्याने. दोघांपैकी एकाने जरी नातं सोडण्याचा विचार केला तरी ज्याने धरून ठेवले त्यालाच ताणलेल्या रबराप्रमाणे ते इजा करतं. म्हणजेच दोन्ही बाजूंनी तितकी जबाबदारी निभवायची तयारी असावी लागते. नात्यात जर समोरच्याबद्दल ओढ, आपुलकी, जिव्हाळा, माया, कळकळ असेल, तर ते नातं प्रेमाच्या प्रवाहात अधिक मजबूत विनलं जातं. मनापासून जीव लावलेला असतो आयुष्यात प्रेमाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेल्या माणसांना. जवळ असलेली माणसं जास्त आनंद देतात.

आयुष्यात कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवाने मैत्रीचे नाते निर्माण केले आहे. कारण जगातील हे रक्ताचे नसले तरी खात्रीचं असतं. नातं हे झाडाच्या सावलीसारखं असतं. जिथे झाडाची सावली चांगली तिथेच माणूस विसावा घेतो. जिथे मान-सन्मान, आदर, ओढ असते. तिथेच नातं टिकतं, बहरतं सुद्धा.अनमोल नाती जपा. त्यामुळे कोणतीही धनदौलत अपुरी पडते. नात्यांना हृदयात, मनात, मनाच्या खोलवर हळुवार कप्प्यात, अत्तराच्या कुपीप्रमाणे जपून ठेवा. तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ मात्र जोडून जपून ठेवलं, तर आयुष्याची बेरीज होते आणि ती जमेची बाजू ठरते. काही जणांना मूल्य किंवा त्या गोष्टीचे मूळ कळत नसतं. अहंकार आणि आपल्या रुबाबात नाती तोडली जातात. आपल्या आयुष्यात आपण ‘चला नाती जपूया’ आणि ‘आयुष्य समृद्ध करून जीवन सार्थकी लावूया’…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -