Sunday, January 19, 2025

गोड गोष्ट…..

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड 

दरवाजाची कडी जोराजोरात वाजली. त्याला आपल्या माजी बायकोची जाम आठवण आली.

“माजी बायको?” रेवतीची अशी सवय!
जुनीच. “अगं बेल आहे ना?”
“हो. पण तुला ऐकू येत नै!”
“वाजवून तर बघ.”
“पटकन् दार उघड मनू. मन्या. मनोहर.”
“अरे! हा तर तिचाच आवाज. रेवा, रेवू, रेवतीऽऽ”
“अरे उघड आता.”
“हो. आलोच.” त्याने दरवाजा उघडला.

पाऊस ‘मी’ म्हणत होता.
उभी भिजली होती रेवा! कुडकुडत होती. तो बघता बघता जागा झाला. त्याने टॉवेल आणला. जाडसा. टर्किश टॉवेल!

“घे. किती भिजलीयस.”
“अरे, छत्री विसरले घ्यायला.”
“कुठे? क्लासला गेली होतीस?” गोपाळ गायन समाजात ती गाणं शिकायला जायची. त्याला पक्कं आठवत होतं.
छोटसं कारण होतं, दोघं वेगळी व्हायला!
तो दादागिरी करतो. पुरुषी अहंकार गाजवतो. माजला आहे.
“हे बघ, मी भारतीय नवरा आहे.”
“पण अहंकार केवढा? अं?”
“भारतात पुरुष जरा वरचढच असतो गं.”
“असतील. पण आता जमाना बदलला आहे रावजी.”
त्याला जुन्या आठवणी आल्या. तीच होती.
“रेवा, ये, किती भिजली आहेस. थांब! टॉवेल देतो जाडसा.”
“मी थोड्याच वेळा पुरती आले आहे हं!”
“मला ठाऊक आहे ते.”
“नाही! उगाच गैरसमज नको.”
“नाही. काही गैरसमज नाही माझ्या मनात.”

दोघात आता या क्षणी भांडणाचा मागमूसही नव्हता.छोटसं कारण होतं. गैरसमज हो! पण तिचं नाक सुजलं! फुगलं! रुसलं! नि ती वेगळी झाली. आता ती एमेस्सी बीएड होती. शाळेत शिक्षिका होती. चढत चढत मुख्याध्यापिकेच्या पदी पोहोचली होती.केवळ काही वर्षांत तिच्या हुशारीवर. गुणवत्तेवर पण त्याला वाटलं की, हिला गर्व झाला. जरा अधिक उणं बोलला तरी हिचा पापड मोडायचा.

“तुझं प्रस्थ मी चालवून घेणार नाही.” ती एकदा जोरात म्हणाली.
“भारतीय नवरा आहे मी. माझं ऐकायलाच हवं.”
“अरे ज्जा ज्जा! आला मोठ्ठा नाक फुगव्या.”
“येवढं माझं नाक आवडत नाही, तर लग्न केलंस ते? कशाला?”
“घोडचूक झाली.”
“जा मग इथून.”
“जाते.” नि गेली चक्क निघून. त्याला इतकी कल्पना नव्हती. तिच्या स्वाभिमानाची! नंतर त्याने तिच्या आईकडे चौकशी केली.
“रेवा आलीय?”
“नाही बाबा.”
“मग कुठे गेलीय?”
“ती मिळवत्या बायांच्या हाष्टेलात गेलीय.”
“वर्किंग वूमन्स हॉस्टेल?”
“तेच ते.‘मै न बोझ बनूँगी’ असं म्हणाली. हिंदीत म्हणाली.”
“अरे बाप रे.”
“आता पाया पडत ‘तिच्या’ घरी घेऊन ये.” “बघतो.” तो सासूला ‘बघतो’ म्हणाला पण ‘अडलंय माझं खेटर’ असं मनोमन म्हणाला.
त्याने झरझर दार उघडले “रेवा तू?”
“अरे फार पाऊस आहे रे. म्हणून दार वाजवलं.” त्याने कोरडा टॉवेल दिला. “तिकडे बघ.”
“तुझ्याकडे कितीदा पाहिलयं गं.”
“तरीपण.” त्याने पाठ केली. एवढ्यात गडाड गडगड ढग कडाडले. त्याला अत्यानंद झाला. कारण ती ढगांना जाम घाबरायची. त्याला घट्ट मिठी मारायची. तशीच आताही घाबरली. त्याला घट्ट मिठी मारली. सारं भांडण विसरून.
“जाऊ नको ना!” त्यानं विनवलं.
“मी विनवणी करतो. चुकलो चुकलो चुकलो. त्रिवार! क्षमा कर.” तिला तरी मिठीमधून कुठे दूर जायचं होतं? गोड गोष्टीचा शेवट गोडच झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -