मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक गुरुवारी पार पडली, यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पण या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले होते. अजित पवार नाराज असल्याने या बैठकीतून अर्ध्यातूनच निघून गेले असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेवर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणाले, काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझ्या नियोजित कार्यक्रम होता. तर कालच सकाळी १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. पण काही कारणांमुळे ही बैठक उशीरा सुरु झाली. पण माझ्या हेलिकॉप्टरला दुपारी १ वाजता टेकऑफ करायचं होतं. त्यामुळं कॅबिनेट उशीरा सुरु झाल्यानं साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत मी तिथे थांबलो. १ वाजता मला जाणे गरजेचे होते. कारण २ वाजेपर्यंत मला नांदेडला पोहोचून तिथून पुन्हा हेलिकॉप्टरने अहमदपूरला जायचे होते. तिथे अत्यंत साधेपणाने एक शेतकरी मेळावा मी केला. यावेळी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर मी पुन्हा मुंबईत आलो, अशी खरी वस्तुस्थिती आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याचाच प्रत्यय मंत्रिमंडळ बैठकीत आला. माध्यमांच्या वृत्तानुसार अजित पवार यांनी नाराज होत मंत्रिमंडळाची बैठक १० मिनिटांतच सोडल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता अजित पवार यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.