Thursday, April 16, 2026

Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या प्राण्यांच्या नियमित खाद्यांसाठी तब्बल ६२ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. मुंबई महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असला तरी महापालिकेला आपल्या राणीबागेतील या प्राण्यांना मांस पुरवता येत नसून त्यांनाही खरेदी करतच प्राण्यांना उपलब्ध करून द्यावे लागत आहे. महापालिकेचा कत्तलखाना हा सेवा देणारा पशुवधगृह असतानाही मुंबईत मात्र अनेक ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने चालत असल्याचे स्पष्ट होत आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) येथील मांसाहारी प्राण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बैल आणि रेड्याचे मांस खरेदी केले जाते. याबाबतच्या मांस खरेदीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता या निर्णयावर यामिनी जाधव यांनी प्रश्न उपस्थित करत प्राण्यांच्या अन्नाची गरज सततची असल्याने किमान पाच वर्षांचा ठेका देण्यात यावी , अशी मागणी केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असताना खासगी संस्थेकडून आपण मांसांची खरेदी का करत आहोत असा सवाल केला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी प्राणीसंग्रहालयातील स्थितीवर टीका करत कोट्यवधी रुपये खर्च करूनही माकडे कुपोषित दिसत असल्याचे सांगितले. त्यांनी प्राण्यांना योग्य आहार देण्यासोबतच नवीन प्राणी आणण्याचीही मागणी केली.

यावर प्रशासनाच्यावतीने वाघ, बिबट्या, तरस आणि कोल्हे यांसारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी नियमित मांस पुरवठा अत्यावश्यक आहे. मांसाच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत असल्याने एक वर्षाचा करार अधिक व्यवहार्य असल्याचे सांगितले. सध्याच्या दरांमध्ये वाहतूक, मजुरी, हाताळणी आणि वितरणाचा खर्च समाविष्ट असून हे दर बाजारभावापेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला. तसेच पुरवठादार परवानाधारक असून मांस देवनारमधील अधिकृत कत्तलखान्यांतून घेतले जाते. आणि त्यावर पशुवैद्यकीय तपासणी केली जाते. हाच पुरवठादार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या ठिकाणीही पुरवठा करतो. देवनार कत्तलखान्यात पशुवधाची सेवा दिली जाते. महापालिका स्वत: जनावरे खरेदी करत नाही किंबहुना मांसही विकत नाही. परवानाधारक विक्रेत असतात ते म्हैस, रेड्यासह प्राणी घेवून येतात आणि याठिकाणी त्यांना कापून देण्याची सेवा दिली जाते,असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले .

Comments
Add Comment