पुणे : शहरात डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे दररोज सरासरी ३८ रुग्ण आढळले असून, एकूण १ हजार १५० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर चिकुनगुन्याचे ऑगस्टमध्ये ५२ रुग्ण आढळले आहे. एकाच वेळी डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्ययंत्रणांची चिंता वाढली आहे. यामुळे डास प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
शहरात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे एकूण १ हजार १५० संशयित रुग्ण आढळले असून, डेंग्यूचे निदान झालेले ८२ रुग्ण आहेत. शहरात डेंग्यूचे या वर्षात फेब्रुवारीमध्ये ५, मार्च ३, एप्रिल २ आणि जुलैमध्ये ३४ रुग्णांचे निदान झाले. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. याचबरोबर जुलैमध्ये ६३६ संशयित रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये १ हजार १५० संशयित रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यूची लक्षणे ही इतर विषाणुजन्य तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे ही लक्षणे दिसून येतात. त्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.