परदेशात ११ लाख कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा ईडीचा संशय
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अवैधरीत्या ऑनलाइन गेमिंग अॅप चालवत त्याद्वारे हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या महादेव अॅपचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी अनेक कलाकारांना याचा फटका बसला. त्यानंतर आता अशा पद्धतीच्या अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या गेमिंग अॅपवर ईडीची नजर असणार आहे. सध्या ईडीचे लक्ष २ डझन गेमिंग अॅपवर असून यामधून तब्बल ११ लाख कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय ईडीला आहे. अनेक परदेशी अॅप चालवले जात असल्याचा संशय असल्याने ईडी सध्या अलर्ट मोडवर आहे.
महादेव ऍपचा फटका
देशभरातली लाखो लोकांना महादेव या गेमिंग अॅपचा फटका बसला. या अॅपच्या मालकांनी हवाला आणि इतर मार्गांनी हा पैसा दुबईमध्ये वळवल्याचे आढळले. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर अनेक परदेशी अॅप चालवले जात असल्याचा संशय असल्याने ईडी सध्या अलर्ट मोडवर आहे. बेकायदेशीरपणे चालवले जाणारे अॅप भारतामध्ये पसरत असल्याची माहिती ईडीला मिळाल्यानंतर तब्बल २ डझन अॅपवर ते लक्ष ठेवून आहेत. या अॅप्सद्वारे जमा होणारे पैसे ही क्रिप्टो करन्सीच्याद्वारे तसेच काही बनावट आर्थिक व्यवहार करत परदेशात जात असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे याचा भारतीय वापरकर्त्यांना चांगलाच फटका बसत आहे. पण, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास करणे हे यंत्रणांपुढील मोठे आव्हान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अॅपचा सुगावा यंत्रणांना लागला की, ते अॅप चालवणारे लगेच बंद करतात आणि त्याचप्रकारचे दुसरे अॅप अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू करतात. यामुळे अशा अॅपवर आळा घालणे अवघड होते. पण देशभरातली अनेक यंत्रणा अशा गेमिंग अॅपद्वारे होणाऱ्या फसवणुकीविरोधात अॅक्शन मोडवर आले आहेत. ईडीसह समन्वय साधत अनेक तपास यंत्रणा या घोटाळ्यांचा तपास करत आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बँकांना असे अॅप्स अथवा संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे अॅप्स प्रामुख्याने यूएई, श्रीलंका आणि दक्षिण आशियातील काही देशांतून सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.