दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव
मुंबई : राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. अभिनेता शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख (Shivaji Satam and Asha Parekh) यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर केला असून दिग्दर्शक एन. चंद्रा यांचाही गौरव होणार आहे. यासोबत राज्य सरकारकडून इतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम याचा समावेश आहे.
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. २०२३ मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहिर करण्यात आला आहे. तर २०२३ स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करण्यात आला आहे. यासोबतच, २०२३ सालचा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक-दिग्दर्शक तसेच अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना जाहिर करण्यात आला आहे. २०२३ वर्षातील स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जेष्ठ लेखक- दिग्दर्शक-संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे.
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकनांची यादी समोर आली आहे. सन २०२० सालाच्या ५८ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी जून, जयंती, फनरल या तीन चित्रपटांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवारांनी केले अभिनंदन
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली. ‘ ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकने घोषित करतांना मला आनंद होत आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा.’ असं त्यांनी ट्विट करत लिहिले.