फिरता फिरता – मेघना साने
तो मी नव्हेच
मी ‘तो मी नव्हेच’ नाटकात काम करत असतानाची गोष्ट! प्रयोग सातत्याने सुरू होते. एकदा माझ्या आजेसासूबाई आजारी होत्या. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. तेथेच त्यांचा मृत्यू झाला आणि आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये जमा झालो. इकडे सासरे घरी होते. लँड लाईनवर ‘नाट्यसंपदा’चा फोन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता शिवाजी मंदिराला प्रयोग होता त्याबद्दल फोनवर आठवण केली होती. माझे सासरे म्हणाले, “आत्ताच मेघनाच्या आजेसासू निवर्तल्या त्यामुळे उद्याचा प्रयोग ती करू शकणार नाही.”
काही वेळाने पणशीकरांचा स्वतःचाच फोन आला. त्यांनी समजावून सांगितले की, ‘प्रयोग उद्या आहे. तो मी करावा. त्यांचे वडील गेले तेव्हाही त्यांनी प्रयोग केला होता. कलाकाराने सैनिकासारखे असावे. प्रयोग रद्द झाला तर बॅकस्टेजच्या कामगारांचे नुकसान होते.’ मी हॉस्पीटलमधून घरी आल्यावर सासऱ्यांनी मला सर्व सांगितले. माझ्याजवळ तेव्हा मोबाईल नव्हताच.
आजेसासूबाईंचा मृत्यू हा माझ्यासाठी फार दुःखद होता. ती माझ्या सासरची अत्यंत प्रेमळ व्यक्ती होती. सकाळी ९ वाजता त्यांना अखेरचा निरोप द्यायला नातलग जमले आणि साडेनऊला सगळे गेले. मी आंघोळ करून शिवाजी मंदिरला निघाले. माझे वय त्यावेळी चाळीसदेखील नव्हते आणि आमच्या कुटुंबातील पहिलाच मृत्यू मी पाहत होते. त्यामुळे मन हेलावून गेले होते. रात्रभर मी झोपले नव्हते.
शिवाजी मंदिरला पोहचून मी मेकअपला बसले. दुःख एका ठिकाणी बांधून ठेवले आणि मनात भूमिकेची वाक्ये घोळवायला सुरुवात केली. प्रयोग नीट पार पडला. निसर्गाने कलाकार मंडळींना ही ताकद दिलेलीच असते.
मनःस्थिती कशीही असो, अडचणी कितीही असोत, प्रयोग करताना कलाकार परकायाप्रवेश करतो. त्यामुळे त्याचा वैयक्तिक दुःखाशी संबंध नसतो आणि कलाविष्कारामध्ये अडथळा येत नाही. माझी सुनंदा दातारची भूमिका नेहेमीसारखीच झाली हे पाहून पंतांनी (पणशीकरांनी) माझे कौतुक केले.
घरी गेले तो सर्वांचा रोष पत्करावा लागला. ‘अशा परिस्थितीत घराची जबाबदारी न घेता बाहेर निघून जाते. तुला काळीज वगैरे काही आहे की नाही?’ अशी मुक्ताफळे सोसली. खरे तर माझे दुःख मी मनात कोंडून ठेवले होते. खोलीत जाऊन मी मनसोक्त रडून घेतले.
लेकुरे उदंड झाली
‘लेकुरे’च्या टीममध्ये प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी, श्याम पोंक्षे, लीलाधर कांबळी, अरुण कदम वगैरे सर्व प्रसिद्ध मंडळी होती. एकदा सुकन्या कुलकर्णी यांच्या भगिनीने खोपोलीला रात्रीचा प्रयोग सुचविला होता. त्या दिवशी नेमके माझे डोळे आले होते. दुसऱ्यांना लागण होईल म्हणून मी गॉगल लावून प्रयोग करायचे ठरवले.
त्याप्रमाणे मी गॉगल लावून गाडीत बसले. सर्वांना हे विनोदी वाटायला लागले. गॉगल लावण्याचे कारण सांगितल्यावर कलाकार मंडळींचे विनोद सुरू झाले. ‘तिच्या नजरेत नजर मिसळून कोणी पाहू नका.’ किंवा ‘गुलाबी आँखे’ वगैरे उपमा सुरू झाल्या. मला जो त्रास होत होता त्याबद्दल कुणीही चौकशी केली नाही.
खोपोलीला आम्ही सुकन्याच्या बहिणीकडे उतरलो. तिने सर्वांचे योग्य आदरातिथ्य केले. माझे डोळे आले आहेत कळल्यावर तिने प्रेमाने मला आत बिछान्यावर अाराम करायला पाठवले. “ड्रॉप्स दिले आहेत का डॉक्टरने?” असे विचारले. तेव्हा मी डोळे मिटूनच पर्समधून ड्रॉप्स काढून दिले. तिने काळजीपूर्वक माझ्या डोळ्यात ड्रॉप्स टाकले. तिच्या चार प्रेमळ शब्दांनी मला शक्ती मिळाल्यासारखी वाटली. गॉगल लावून प्रयोग व्यवस्थित केला. परतीच्या प्रवासात मला ताप भरला होता पण मी कुणालाच सांगितले नाही.
‘गणरंग’ चे नाटक
नाटकाचे नाव आता आठवत नाही. पण विनय आपटे निर्मित ते एक सस्पेन्स नाटक होते. त्यात गिरीश ओक, संजय मोने, मेधा फडके असे कास्टिंग होते. त्याचवेळी माझे ‘लेकुरे उदंड झाली’चे प्रयोगही सुरू होते. विनय आपटे यांनी एकदा त्यांचा प्रयोग गडकरीला असताना मला बोलावून घेतले. त्यांचा १४ प्रयोगांचा दौरा लागला होता. त्यातील एका स्त्री कलाकाराच्या घरी काही समस्या होती. तिची आई हॉस्पिटलला होती. म्हणून ती प्रयोग करू शकणार नव्हती. म्हणून १४ प्रयोगांसाठी तिच्याऐवजी काम करण्याची ऑफर मी मान्य केली.
दौरा खूप छान सुरू होता. मी बदली कलाकार असूनही मला टाळ्या वगैरे मिळत होत्या. गिरीश ओक यांच्यासोबत माझे सीन होते म्हणून मी खूष होते. गिरीश ओक, संजय मोने यांच्या व्यक्तिमत्त्वाने खरे तर मी दबूनच गेले होते. सात आठ प्रयोग झाले आणि माझ्या भावाचा फोन आला. माझ्या वडिलांचा अपघात झाला होता. पायाचे हाड मोडले आणि ऑपरेशन करावे लागणार होते. त्याक्षणी असे वाटले की हा दौरा सोडून वडिलांना हॉस्पिटलमध्ये मदत करायला गेले पाहिजे. रडू यायला लागले. कोणत्याच कलाकारांशी मी ही गोष्ट शेअर केली नाही. पण पुन्हा भावाचा फोन आला.
“तू काळजी करू नकोस. आम्ही सर्व त्यांची काळजी घेत आहोत.” ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे मी पुढील प्रयोग नीट पार पाडले. शेवटचा प्रयोग शिवाजी मंदिरला म्हणजे दादरमध्ये होता. नाटकात चारच कलाकार असल्याने खाली बोर्डवर चौघांची नावे लिहिली असतील अशी अपेक्षा होती. मात्र बोर्डवर डॉ. गिरीश ओक, संजय मोने, मेधा फडके आणि दुसरेच पण बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेली नावे होती. विनय आपटे या प्रयोगाला हजर होते. मी त्यांना म्हटले, “ खाली बोर्डवर माझे नाव दिसले नाही. चुकून दुसरेच लिहिले आहे का?” तेव्हा ते मॅनेजरला म्हणाले, “अरे हो, हिचे नाव लिहा म्हणजे बुकिंग होईल.” हे वाक्य कानी पडताच मला खूप राग आला होता. पण बोलून काही उपयोग नव्हता. राग मनात बांधून ठेवून मी प्रयोग नेहेमीसारखाच समरसून केला. पुढील प्रयोगापासून त्यांना बदली कलाकाराची गरज लागणार नव्हती! नाटकातील कलाकार हे वैयक्तिक दुःखे, अडचणी, अपमान बाजूला ठेवून ‘शो मस्ट गो ऑन’ हे तत्त्व पाळत असतात. नाट्यक्षेत्र हे असे आहे की कलाकाराला येथे नोकरीतल्याप्रमाणे अचानक रजा घेता येत नाही. म्हणूनच जेव्हा एखाद्या नाटकाचे शेकडो प्रयोग होतात तेव्हा प्रमुख कलावंताचे त्यात फार मोठे योगदान असते.