शिवडी आणि पंढरपूरच्या जागेवर कोणाला दिली संधी?
मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. लोकसभेत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ते आज सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, मनसेने विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी आणि पंढरपूरच्या जागेवर मनसेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मनसेने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून (Pandharpur Assembly Constituency) दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या शिवडी विधानसभेत ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.
शिवडी विधानसभेत होणार ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत
शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा निवडून आले आहेत. दोन्ही वेळा अजय चौधरी यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर दुसरीकडे बाळा नांदगावकर शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे यावेळेस नेमकं कोणाचं पारडं जड होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.