हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा
बिहार : देशभरात उन्हाचा कडाका वाढत चालल्याचे चित्र आहे. केरळमध्ये (Keral) मान्सूनचे (Monsoon) नुकतेच आगमन झाले असले तरीही इतर राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दिल्लीनंतर (Delhi) बिहारमध्ये (Bihar) उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) सर्व विक्रम मोडले आहेत. बिहारमध्ये वाढत्या उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बिहार सरकार आणि हवामान विभागाकडून (IMD) अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उष्मघाताने २४ तासांत १६ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ३३७ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. तर २४ तासांमध्ये १६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
‘या’ भागात उष्णतेचा अलर्ट
वाढते तापमान लक्षात घेता बिहार सरकार आणि हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-मध्य भागात एक-दोन ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर राज्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भागात एक-दोन ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या नैऋत्य-पश्चिम पाटणामध्ये एक-दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘इतका’ असेल तापमानाचा पारा
बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, वाढते तापमान लक्षात घेता बिहारमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३० मे ते ८ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.