अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)
अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी, भारतामध्ये १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांतील मतदान होणार आहे. लोकसभेच्या मतदानाच्या तारखा १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून अशा आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यातील पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुका पार पडल्या. तिसरा टप्पा जो ७ मे रोजी संपन्न होणार आहे. त्यात आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा क्र. ४६ मतदारसंघाचा समावेश आहे. यापूर्वी जशी युती व आघाडी अशी लढत होत असे, ती जरी प्रथमदर्शनी समान वाटत असली, तरी त्यातील घटक बदललेले आहेत. यंदा भाजपा-युती व काँग्रेस-आघाडी हे समान; पण दोघांही बरोबर शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष आहेत.
कायदे व नियमांच्या आधाराने शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी-अजित पवार गट यांना अधिकृत पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे व पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण व घड्याळ त्या-त्या पक्षांना बहाल केले गेले आहे. या दोघांचीही साथ भाजपास. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर भाजपा व शिवसेनेसह घटक पक्षांचे उमेदवार निवडून आले. आता समीकरण बदलल्याने, उमेदवारांचा कस लागणार आहे. महाराष्ट्रात तर सद्य राजकीय परिस्थितीनुसार ही निवडणूक प्रतिष्ठेबरोबरच असंख्य निकष निकाली काढणारी ठरेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपा व युतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मैदानात उतरवले गेले आहे, तर काँग्रेस व आघाडीतर्फे खासदार विनायक राऊत यांना पुन्हा संधी दिली गेली आहे.
युती व आघाडी तसेच राणे व राऊत यांच्यात तुलना केल्यास या मतदारसंघासाठी उपयुक्त कोण ठरेल? येथील मतदार हे पारंपरिक शिवसेनेचे मतदार समजले जातात. पण यास निश्चिती नाही. येथे विधानसभेसाठी विविध पक्षांचे आमदार निवडून येत असतात. आता तर असली व नकली अशी शिवसेनेची दोन शकलं पडलेली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, तिची ध्येय-धोरणे, बाळासाहेबांची विचारसरणी याचा विचार केल्यास ती कोणाकडे? निश्चितच ती एकनाथ शिंदे यांच्याकडे, तर निव्वळ ठाकरे हे नाव व त्यांची धनसंपत्ती, मालमत्ता उद्धव ठाकरे यांच्याकडे. मराठी व त्यानंतर हिंदुत्व हे एकनाथ शिंदे यांच्याकडे, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मराठी हा निव्वळ मतांसाठी तसेच हिंदुत्वास यांनी केव्हाचीच मूठमाती देऊन टाकलेली.
बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादी अशा पक्षांचा अखंड तिरस्कार केला नव्हे, तर काँग्रेसकडे जाण्याची वेळ आल्यास मी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करेन, अशी टोकाची भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला स्वतःस बांधून घेतले. बाळासाहेबांना मशिदीतील बांग व अजाण यांवर बंदी आणावी असे वाटे, तर उद्धव ठाकरे यांना बांग व अजाण सुमधुर वाटते, ती सतत वाजत राहावी असे वाटते, त्याची स्पर्धा भरवण्याची हौसही वाटते. उद्धव हे आपल्या भाषणाची सुरुवात बाळासाहेबांच्या प्रमाणेच ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू-बंधू भगिनी आणि मातांनो’ अशी करत. पण आता काँग्रेसी झाल्यानंतर तेच उद्धव यातील
‘हिंदू’ या शब्दला बगल देतात. देशद्रोही, आतंकवादी याकूब मेनन याच्या कबरीस मान्यता व सुशोभीत करण्यासाठी मनस्वी सहकार्य करतात. आज यांच्या कार्यक्रमात व घराबाहेर जाळीवाली टोपी, बडेभाईका लंबा-चौडा कुर्ता और छोटेभाईका तंग पजामा परिधान केलेला जमाव अधिक दिसतो. मातोश्रीसमोरील त्यांच्या घोषणा ‘नारा-ए-तकबीर अल्लाहु अकबर’ असे इस्लामधार्जिणे आणि जनाब उद्धवजी यास हसत मुखाने हात उंचावून प्रतिसाद देतात. राम मंदिर व्हावे, ही बाळासाहेबांची इच्छा, तर उद्धवजी यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. काश्मीरमधून देशविरोधी ‘कलम ३७०’ हटवले गेले. उद्धवजी यात वजाबाकी करतायत. ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी’ आणि ‘समान नागरिक कायदा’ याबाबत बाळासाहेब आग्रही होते, तर उद्धवजींना यात राजकारण दिसते, यास ते विरोध करतात.
उद्धवजी बाळासाहेबांचे हिंदुत्व मोडीत काढत म्हणतात, “माझे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही.” म्हणजेच हिंदुत्वातही तुझे आणि माझे झाले. उद्धव म्हणजे आज महाराष्ट्रातील मुसलमानांना असदुद्दीन ओवैसी प्राप्त झाल्याचा आनंद देत आहेत. यांनी मुंबईतील मराठी माणसांना मुंबईपासून दूर वसई-विरार आणि डोंबिवली-कल्याण यांच्यापुढे हद्दपार केले. गिरगाव, दादर, लालबाग, परळ अशा मराठी बहुल भागातून मराठीजनास परागंदा केले. मराठी माणसाच्या हातातील उद्योग-व्यवसाय परप्रांतीच्या हाती गेले. कोकणवासीय मुंबईत सातत्याने शिवसेनेबरोबर राहिले, पण त्यांच्या प्रगतीसाठी उद्धवजींनी कोणतेही खासे प्रयत्न केले नाहीत. हे चाललेले सारे प्रकार थोपविण्यासाठी उद्धव यांनी काय केले? कोकणवासीय जनास सांगायचे ते असे, उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नव्हे आणि उद्धवजींची शिवसेना ही आपल्या हृदयात कोरली गेलेली शिवसेना राहिलेली नाही. उद्धव यांना मत म्हणजे काँग्रेसला मत, हिंदुत्व विरोधास मत, आपण जपलेल्या मराठी संस्कृतीच्या विनाशाला मत.
नारायण राणे हे पहिल्या पिढीतील शिवसैनिक. बाळासाहेबांचे आवडते. कर्तृत्वाने त्यांनी शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. बाळासाहेबांच्या कार्यकाळात कर्तृत्वाला संधी मिळे. नारायण राणे यांनी त्याचे सोने केले. उद्धवजींच्या कार्यकाळात बाळासाहेबांशी बेईमानी, फंदफितुरी, कटकारस्थान करत उद्धवजींची विश्वसार्हता संपादन केलेले त्यांचे विश्वासू, खुशमस्करे, भाट मंडळी अशांचाच उद्धार झाला. त्यातीलच एक विनायक राऊत! राणे हे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री असताना झालेला कोकणचा विकास याचा विनायक राऊत हे १० वर्षे खासदार असताना केलेल्या विकासाचा लेखाजोखा होऊ शकतो का? राऊतांनी कोकणसाठी काय केले, याचे एक तरी उदाहरण दाखवावे. राणे हे विकासपुरूष आहेत. राऊत हे बोलघेवडे आहेत. राणेंना शिवसेनेतून बाहेर पडावे लागले, तरीही अन्यत्र जाऊनही ते मंत्री व आज भाजपा सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. ते कर्तृत्ववान असल्याचा हा दाखला आहे.
खासदारकी गेल्यास विनायक राऊत यांची स्थिती काय असेल. कोकणात रत्नागिरीत विमानतळ झाले. कोकणातून रेल्वे धावते. मुंबई-कोकण महामार्गाचे काम सुरू आहे, भले ते संथ गतीने असेल. विमानतळाची प्रगती असेल, पुढे मागे तेथून देशभर विमाने उड्डाण घेतील, कोकणात देशभरातून पर्यटक येतील. आर्थिक उलाढाल वाढेल, गुंतवणूक येईल. रेल्वेत बऱ्याच सुधारणा होणे आहे. स्टेशन सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणे आहे. महामार्ग लवकरात लवकर पूर्णत्वाकडे न्यावयाचा आहे. असेच केंद्र व राज्य सरकारी योजनेसह बऱ्याच सुधारणा कोकणात होणे शक्य आहे. यासाठी राणे-राऊत यातील कोण उपयुक्त ठरू शकेल. राणेंच्या बरोबर मोदी आहेत, केंद्र सरकार आहे. राणेंच्या बरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्र सरकार आहे. राणे सत्ताधारी पक्षात आहेत.
स्वतः मंत्री आहेत. अनुभवी आहेत. त्यांनी स्वतःचे एक वलय निर्माण केले आहे. त्यांच्या शब्दाला निश्चितच वजन प्राप्त झालेले आहे. यांच्या तुलनेत विनायक राऊत अत्यंत खुजे भासतात. कोणतेही कर्तृत्व नाही, वलय नाही, अनुभव नाही. प्रभावहीन आहे. राऊतांचे कर्तृत्व राणे यांना शिव्या-शाप देणे व हेच उद्धवजींना भावते याची पुरेपूर जाणीव असल्याने हेच वरचेवर करत राहणे येथपावेतोच मर्यादित आहे. दिल्लीत विमान प्रवासात सामोरे आल्यास राऊत राणेंना नतमस्तक होतात. त्यांच्या बॅगा उचलण्यास पुढे सरसावतात. भाजपा पुन्हा सत्तेत येणार, राणे निवडून येणार, पुन्हा मंत्री होणार हे निश्चित. माझ्या प्रिय कोकणवासीयांनी निव्वळ भावनिक न राहता, आपण अधिक धोरणात्मक होणे आणि रणनीतीनुसार मतदान करणे नितांत गरजेचे आहे. आपण आपल्यासह कोकणभूमीच्या प्रगतीसाठी, विकासासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आपण खूप भोगलेले आहात. आमचा कोकण महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेत खूप मागासलेला राहिला. आता प्रगती आणि विकासास प्राधान्य देण्याचाच विचार व्हावा.
लढाई युती व आघाडी या दोघांत. दोन्हीकडे शिवसेना आहे, तसेच राष्ट्रवादीही आहे. म्हणजे उरतात भाजपा आणि काँग्रेस. म्हणजेच अंतिमतः ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी येथे येऊन थांबते. ही तुलना म्हणजे ‘कहां राजा भोज कहां गंगू तेली.’ अगदी कालचीच घटना पाकिस्तानचे एक भारत द्वेष्टे प्रमुख नेते, माजी मंत्री फवाद हुस्सेन हे राहुल गांधींना प्रोत्साहन देत म्हणतात की, “राहुल आज जोमात आहे, ते चांगले नेते आहेत. ते आल्यास परस्पर संबंध चांगले होतील.” यास पाकिस्तान मीडियातूनही पाठिंबा मिळाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे वक्तव्य निव्वळ पाकिस्तानधार्जिण्या भारतीय मुसलमानांसाठी, त्यांचे एकगठ्ठा मतदान काँग्रेसला व्हावे याचकरिता. भारताचा नितांत तिरस्कार करणारा सर्वात मोठा शत्रू जर असं म्हणत असेल, तर काँग्रेसचे राजकारण कसे काय आहे, याची प्रचिती येते. सर्वप्रथम देश.
देश राहिल्यास, धर्म आणि देव. देशासाठी सर्वोत्तम कोण? मोदी वा राहुल. मोदीजींमुळे देशाच्या सीमा बळकट व सुरक्षित झाल्या. भारतीय सैन्य दलास सर्वतोपरी प्राधान्य प्राप्त झाले. सैन्य आधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज झाले. चीन व पाकिस्तानसारखे देश भारतास वचकून आहेत. देशांतर्गत दहशतवादी हल्ले बंद झाले. काश्मीर शांत झाले. काँग्रेस काळात सैन्यदल म्हणजे दलाली आणि भ्रष्टाचार करण्याचे कुरण. नियमित देशात दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट होत. मोदी घुसके मारते है तर मनमोहन सिंह म्हणतात की, “प्रतिहल्ला केल्यास मुसलमान नाराज होतील. आमची मते कमी होतील.” असेही म्हणतात की, “देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा.” मोदी यांचे जीवन देशासाठी अर्पण, तर काँग्रेस आणि आघाडीतील पक्ष स्वतःत रममाण! काँग्रेस पक्ष शत्रू राष्ट्र चीनबरोबर गुप्त करार करतो. त्यांच्या दूतावासात गांधी घराणे जाते आणि त्यांच्या राजदूतासोबत द्विपक्षीय करारावर सह्या करते. त्या करारात काय नमूद आहे, हे आपल्या देशापासून गुपित राखते. मोदी खुलेआम देशास ‘मोदी की गॅरेंटी’ देतात.
मोदी म्हणजे दर्जा, गुणवत्ता, नीतिमत्ता, मुत्सद्देगिरी, सचोटी, दूरदृष्टी, अनुभव इ. मोदी म्हणजे धर्माभिमान, विज्ञान तंत्रज्ञान. मोदींनी जगाला भुरळ घातली. देशाला मानाचे पान प्राप्त करून दिले. थोडक्यात काय मोदी म्हणजे पंतप्रधान बनण्यासाठीचे संपूर्ण पॅकेज. यांच्या तुलनेत राहुल गांधी ‘चलती का नाम गाडी.’ भारतीय राजकारणातील विदूषक ज्यास कोणीही गांभीर्याने घेत नाही. मोदी म्हणजे अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ कायापालट, महाकाल कॉरिडॉर, परंपरेनुसार संसदेत सेंगोल स्थापित करणारे, तर काँग्रेस ही सनातन धर्म नेस्तनाबूत करावा अशांची गँग, राम हे काल्पनिक पात्र आहे, हिंदू हा धर्म नाहीच त्यांना धर्मग्रंथही नाहीत.
हिंदू हा कॅन्सर-डेंग्यू, भारत देश हा देश नसून विविध राज्यांचे संघराज्य, अशा विचारांचा काँग्रेस पक्ष. अशा दोन मत प्रवाहातून दोघांतून एकाची निवड करण्याची वेळ आल्यास पक्ष, घराणे, उमेदवार इत्यादी पलीकडे जाऊन मतदान करणे उचित ठरते. तुल्यबळ असते तर वेगळा मामला. पण प्रश्न देश, धर्म आणि देवाचा आहे. विचार करावा असा पर्यायही नाही. काँग्रेस अन् इंडिया आघाडीस मत म्हणजे आपले मत वाया घालवणे. प्रत्येक वाया मत कोकणास पुढील ५ वर्षे स्थितप्रज्ञतेकडे लोटेल. सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे आणि देशवासीयांनी निश्चित केले आहे, ‘फिर एक बार मोदी सरकार.’ मग मत का वाया घालवयाचे. ‘अबकी बार ४०० पार!’ म्हणजे मोदीजींचे हात अधिक बळकट करणे.
‘४०० पार’ या म्हणण्यास वेगळा मथितार्थ आहे. पुढील ५ वर्षांत देशासाठी अतिमहत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याचे निश्चित आहे. धर्म अन् देव यांचे स्थान बळकट करावयाचे आहे. भारतास जगद्गुरू करावयाचे आहे. नारायण राणे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत अन् इंडिया आघाडीस मत म्हणजे पप्पू राहुल गांधी यांना मत. कोकणवासीय हा मुळात अभ्यासू व सूज्ञ मतदार म्हणून गणला जातो, याची प्रचिती पुन्हा एकदा होऊन जाऊद्या…