मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
कवितेच्या जगात जगण्यासाठी प्रत्येकालाच काहीतरी छंद जपावं लागतो, त्या छंदाचीच उपासना करावीच लागते. प्रतिभा ही दैवी देणगी असते. कला वाङ्मय साहित्य कौशल्य प्रतिभा छंद हे सर्व आपसूकच उपजत आपल्यामध्ये येतं. मला ही अंतरिक ऊर्मी काव्य लेखनाची स्फूर्ती वयाच्या तेरा-चौदा वर्षांची असतानापासूनची. मला आठवते, “वाटसरू” ही माझी पहिली कविता. ती १६ ओळींची नि चार कडव्यांची. लिहिण्याची स्फूर्ती, ऊर्मी दाटून यायची. पटकन सुचली की कागद पेन हवाच. स्फुरली आणि लिहिली. खूप आनंद व्हायचा. चालीत मांडावसं वाटायचं, गुणगुणत, काव्य संमेलनामध्ये सादर करणे. स्पर्धेला पाठवणं, पाक्षिक पुस्तक, वार्तापत्र, मासिक यात छापून यायची.
उत्कृष्ट साहित्य स्पर्धा पुणे यांनी माझ्या ‘स्त्री’ या स्त्रीवादी कवितेला पारितोषिक पोस्टाने घरी पाठवलं होतं. शाळेत असतानापासूनच कवितेने चाली लावणं, उतारा वाचन, निबंध, वकृत्व स्पर्धा गाजवणं अंगवळणी पडलेलं सभाधिटपणा वाढत जाई आणि त्याचे रूपांतर आसमंत वोईस अकॅडमी मध्ये झालं. कर्म फळाला आलं म्हणतात तसं वक्ता घडविताना संवाद संभाषण निवेदन यासाठी प्रत्येक टप्प्यावर संवेदनशील कवितेने एक नवा आनंद, नवी ऊर्मी, ऊर्जा, नवा प्रवास, सृजन, अंकुर दिले. आज प्रत्येक विषयाच्या कविता लिहिताना कवितेविषयीची आसक्ती, आवड जोपासली. एक मनाला छंदच लागून राहतो. आद्याक्षरावरून कविता लिहिणं हे ही माझे हातोटीच. व्यक्तींच्या नामोल्लेखासह अधिक कविता मी रचलेल्या आहेत. ओवी, पोवाडा, बालगीते, शैक्षणिक गीते काव्य तर माझी उत्तरा केळकर आणि त्यागराज खाडिलकर यांनी गायली आहेत. मी कविता होऊन जगले. कवितेमुळे माझ्या जगण्याला अर्थ आला, जीवन सार्थक झाले, परिपूर्ण झाले. कवितेचे विश्व म्हणजे भरलेली ओंजळ. आपल्या प्रतिभेतून इतरांसमोर रीती करत असताना काव्यानंदात न्हाऊन निघाल्यासारखं वाटतं. अगदी माझ्या जवळची मंडळी नातेवाईक, आप्तेष्ट सारे म्हणतात तू शीघ्रकवी आहेस.
आमच्यावरही लिहीत जा… सतत स्फुरेल तसं लिहिते. मन रितं करायला ओझं उतरायला तीच माझी सखी उरातलं दाटलेलं सल, हुरहुर, रितेपण, एकांतवास, हुंदके, अश्रू, हास्य, आनंद या भावभावना शब्दांत मांडल्यावर मोकळ वाटतं. रीत वाटतं साचलेलं प्रवाह जसा शब्दांतून ओसंडतो, तसतशी कविता घडत जाते. तिला आकार प्राप्त होतो. तितकीच ती उत्कृष्ट होते. आणि सर्वांची दाद मिळते. मनामध्ये असलेल्या भावभावनांना शब्द, अर्थ प्राप्त करून यमक, अलंकारयुक्त कविता वाचकांपर्यंत पोहोचवताना कवी मन अधीर असतं. मी तर कविता होऊन जगताना एक एक विलक्षण आनंदाची प्राप्ती अन् नवनिर्मिती होते. एखादी गोष्ट कमीत-कमी शब्दांमध्ये कमी वेळेत आपल्या भाषेत मांडण्यासाठी कवितेसारखी दुसरी गोष्ट व साधन नाही. तितकीच ती मला उद्युक्त तर करतेच, पण उपकृत करते. चैत्रपालवी हा माझा पहिला काव्यसंग्रह. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे २०२४ पी सावळाराम पुरस्कार माझ्या ‘समर्पण’ या काव्यसंग्रहास मिळाला. स्वप्नझुला, आशियाना प्यार का, घे भरारी, समर्पण यांसारख्या अनेक काव्यसंग्रहातून मी जे जगले ते मांडलं.
बाईपणाच्या वेदना जित्याजागत्या संवेदनशील मनाचं वर्णन अनुभव शोध सुखदुःख समाज, निसर्ग हे त्या कवितांमधून दिसून येते. स्त्रीविषयक अनेक भावभावनांचे विश्व उलगडताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व नात्यांची गुंफण भावभावनांचे उत्कट चित्रण कवितेची सार ठरतात त्याचप्रमाणे ती तिच्या अस्तित्व स्वत्व तिच्या कल्पना मनीषादेखील यात यथोचित मांडण्याचा लेखन प्रपंच केला आहे. स्त्रीउद्धार, समाज प्रबोधन, मुला मुलींचे शिक्षण, समानता, प्रबोधनात्मक, सामाजिक बांधिलकी, नीतिमूल्य, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी यासारख्या अनेक विषयांवरती कविता साकारलेल्या आहेत आणि यशस्वीरीत्या त्या सर्वांपर्यंत पोहोचताना अत्यानंद होतो, तो लाखमोलाच्या बक्षिसाहून श्रेष्ठ असतो. आपल्या मनातील भावनांचे दमन न होता त्या दाबल्या जाऊ नये, यासाठी उत्कटपणे त्या व्यक्त झाल्या, तर निश्चितच त्याला शब्दरूप प्राप्त होऊन त्याची सुंदरशी कविता होते. ही कविता जगते, जगायला लावते, जगायला शिकवते. म्हणूनच कविता ही माझी सखी आहे. माझ्यासाठी तिचं वरदान हे श्रेष्ठ आहे. अनमोल आहे कविता होऊन जगताना पुन्हा नव्याने मी स्वतःला भेटते आणि माझ्यात मी रमते म्हणून कविता ही माझी जीवाभावाची सखी आहे.
सुखदुःखाची साथीदार आहे, तिच्या खांद्यावर मी डोके ठेवून मन हलके करते, तर माझ्या अंगाखांदयावर कविता झुला होते, तिलाच चैत्रातली पालवी फुटते, तर माझं समर्पण ती तिच्या शब्दांत मांडते. आजवरचा जीवन प्रवास पाहता मी तिचं बोट धरून नाही, तर तिला बिलगूनच आहे आणि माझ्यातील ती प्रतिभेचा एक अंकुर, दैवी देणगी, अलंकार, अविभाज्य अंगच आहे, असं मी मानते. प्रत्येक माझ्या श्वासासोबत कविता होऊन जगताना जीवन परिपूर्ण झाले इतके सारे मला कवितेने दिले. जगण्याचे बळ दिले, आशा, आकांक्षा, स्वप्न, उत्तुंग भरारीचे बळ दिले. अशी ही माझी सखी ‘माझी कविता’.
नित्य नवनव्या जन्म घेई,
शब्दसुमनांचे भावपूष्प होई,
चित्र मनीचे उमटत जाई,
मरण सरे जगणे मात्र उरत जाई…