मॉस्को : मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये सुरू असलेल्या मैफिलीत तीन अज्ञात बंदुखधारी व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर या हॉलच्या इमारतीलाही आग लागल्याचे वृत्त आहे.
रशियाच्या राज्य आरआयए न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात सांगितले की, २२ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत अगोदर गोळीबार झाला आणि त्यानंतर इमारतीच्या आत आग लागली. या हल्ल्यात दोन ते पाच जणांचा सहभाग होता, अशी प्राथमिक माहिती इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
रशियन सोशल मीडिया चॅनेलवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मैफिलीतील उपस्थित लोक मोठ्या संख्येने हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. त्याच वेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असून बंदूकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येत होता.
इतर व्हिडिओ फुटेजमध्ये सभागृहाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेले लोक दिसत होते. TASS राज्य वृत्तसंस्थेने ज्या इमारतीत गोळीबार झाला तेथे स्फोट आणि आग लागल्याचे वृत्त दिले आहे.
कॉमरसंट वृत्तपत्राने बाहेर चित्रित केलेले फुटेज पोस्ट केले आहे. यात मैफिली झालेल्या इमारतीमधून धुराचे मोठे ढग दिसत असल्याचे म्हटले आहे.