Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमहिलांच्या चौकटीबाहेरचे जग

महिलांच्या चौकटीबाहेरचे जग

लता गुठे

आज एकविसाव्या क्षेत्रात वावरणारी मी जेव्हा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख पाहू लागते तेव्हा एकीकडे अभिमान वाटतो आणि दुसरीकडे तिला मिळणारी दुय्यम वागणूक, कायमच तिला नाकारलं जाणं, तिच्या हक्काचा आणि अधिकाराचा जराही विचार केला जात नाही हे पाहून मन उदास होतं. हे चित्र पाहिलं की वाटतं स्त्री कुठे कमी पडते आहे? तिच्याकडे कायमच अबला म्हणून का पाहिलं जातं? ती कधीच अबला नव्हती. कायमच एक शक्तीचं रूप आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. एकीकडे देवी म्हणून मंदिरात पूजली जाणारी स्त्री दुसरीकडे घरांमध्ये दासी म्हणून वागविली जाते. किती तफावत आहे यामध्ये. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर ती कायमच लढत राहते. कधी चौकटीच्या आत, तर कधी चौकटीच्या बाहेर अनेक भूमिका साकार करताना तिच्या वाट्याला येतं ते नैराश्य.

शेतीचा शोध महिलेने लावला यावरून तिच्यातील सृजनशीलता, सर्जनशीलता आणि नवनिर्मिती क्षमता दिसून येते. ग्रामीण भागामध्ये आजही जवळजवळ ९० टक्के महिला शेतात काम करतात. आयुष्यभर राब राब राबतात; परंतु त्या स्त्रीयांना आर्थिक स्वावलंबन कधीच नसतं. एवढेच काय पण एक शेतीचा छोटा तुकडाही स्त्रीच्या नावावर नसतो हे वास्तव आहे. क्रांती लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्राणाची बाजी लावणाऱ्या आमच्या लढाऊ महिला किंचितही मागे नव्हत्या. मादाम कामा, कल्पना दत्त, शांती घोष, बीना दास व उज्ज्वला मुजुमदार अशा कितीतरी महिलांची नावे सांगता येतील. या अग्रणी क्रांतिकारक महिला होत्या. इतिहासात त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा पाहून डोळे दिपून जातात. अशा महिलांच्या नावाचा कुठेही नामोल्लेखही केला जात नाही. क्रांती लढ्यातील पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात; परंतु त्या महिलांच्या वाट्याला हे भाग्य येत नाही.

स्त्री ही कोणत्याही काळातली असो कायमच तिला तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावं लागलं आहे आणि लागतंही आहे. शहरातल्या स्त्रियांचा काही प्रमाणात विचार सोडला, तर इतर स्त्रियांच्या वाट्याला कायमच कुचंबणा आलेली दिसते. अनेक स्त्रिया नोकऱ्या करतात, राब राब राबतात, घर, मुलं सांभाळतात. हे करताना त्यांची तारेवरची कसरत चाललेली असते. स्वतःकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही पैसे खर्च करण्याचे आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही. घरातल्या गृहिणीला हक्काने कर्तव्याची जाणीव करून दिली जाते; परंतु अधिकाराच्या वेळेला मात्र तिला गृहीत धरलं जातं.

घर उभं करण्यासाठी राबणारी महिला असते; परंतु घर असतं ते नवऱ्याच्या नावाने. ती मुलांना जन्म देते, वाढवते, त्यांच्यावर संस्कार करते आणि मुलांच्या नावापुढे लावलं जायचं ते बापाचं नाव. आता ही परिस्थिती थोडीशी बदलली आहे. जेव्हा स्नेहलता देशमुख या मुंबई विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलर होत्या त्या वेळेला त्यांनी मुलांच्या नावापुढे वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव लावण्याचा आग्रह धरला. यासाठी त्यांना खूप विरोध झाला; परंतु त्यांनी पाठपुरावा करून ही गोष्ट पूर्णत्वास नेली आणि मुलांच्या नावापुढे वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव लावलं जाऊ लागलं. वैज्ञानिक क्षेत्र असो किंवा साहित्यिक, ग्रामीण भागातील स्त्री असो किंवा शहरी भागातील प्रत्येकीच्या वाट्याला कायमच दुय्यम स्थानच आलेलं दिसतं.

काळाबरोबर परिस्थितीमध्ये थोडाफार बदल होत गेला. समाजामध्ये मात्र स्त्रीच्या समानतेचा ढोल पिटवला जातो; परंतु वास्तवामध्ये खूप तफावत जाणवते. उदाहरण सांगायचे झाल्यास नुकतेच पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जरा मागे वळून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की, ९७ पैकी फक्त ५ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा महिला झाल्या आहेत आणि ९१ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पुरुषांनी भूषविले आहे. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झाल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत. कुठे गेली समानता? अशा वेळेला विचार येतो की अध्यक्ष होण्यासाठी महिला सक्षम नाहीत का? तारा भोवळकर, प्रतिमा इंगोले, डॉ. विजय वाड अशा कितीतरी साहित्यिका आहेत ज्यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांना का नाकारलं जातं? याचा विचार कोणीच करत नाही. कारण साहित्यिक, राजकीय, सामाजिक या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पुरुषच कार्यरत आहेत.

आता थोडंसं विज्ञान क्षेत्राकडे वळूया. विज्ञान क्षेत्रामध्येही कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या अनेक महिला शास्त्रज्ञ होऊन गेल्या आणि आताही आहेत. त्यामध्ये डॉ. आदिती पंतांसारखी महिला संशोधक अंटाíक्टका मोहिमेवर जाणाऱ्या संशोधक पथकात सामील होते आणि एकदा नव्हे तर दोनदा या मोहिमेत भाग घेऊन मोलाचं संशोधन करते. डॉ. रजनी भिसेंसारखी एक स्त्री शास्त्रज्ञ, जिने खेडोपाडी जाऊन विडीच्या कारखान्यांत काम करणाऱ्या तरुणांना आणि महिलांना होणाऱ्या कर्करोगावर संशोधन करत जीवाचं रान केलं. कमल रणदिवे यांनी कर्करोगावर संशोधनपर काम करणाऱ्या एका संस्थेच्या संचालकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. महाराष्ट्रातील ‘कळवे’ गावची डॉ. चंदा जोग हिने अवकाशातल्या तारकासमूहावर जगभरात प्रशंसनीय ठरणारं काम केलं. डॉ. मेधा खोलेंसारखी महिला वैज्ञानिक हवामानशास्त्र या विषयात उल्लेखनीय संशोधन करत वेधशाळेच्या संचालकपदाची धुराही यशस्वीरीत्या सांभाळते.

नॅनो टेक्नॉलॉजीवर संशोधन करणाऱ्या डॉ. दीप्ती देवबागकर, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये संशोधन करणाऱ्या डॉ. सुलभा पाठक, पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि पदार्थरचनाशास्त्र हे विषय शिकवणाऱ्या आणि त्याच विषयांमध्ये संशोधनही करणाऱ्या डॉ. संगीता काळे अशा एक नाही दोन नाही अनेक स्त्री शास्त्रज्ञांनी आजवर संशोधनपर काम केलं आणि विज्ञान क्षेत्रात मोलाचं योगदान ठरावं इतकं मौलिक कार्य केलं. तरीही प्रसिद्धीचं वलय त्यांच्याभोवती नाही. न्यूटन, एडिसन सोडाच, पण कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्सच्या वाट्याला आलेली प्रसिद्धीही या भारतीय महिला संशोधकांच्या वाट्याला आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज असं म्हटलं जातं, महिला खूप सक्षम झाल्या आहेत, महिला दिन साजरे करण्याची गरज नाही… मला वाटतं महिला दिन साजरे झाले पाहिजेत यानिमित्ताने तरी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोललं जाईल.

स्त्रीवादी साहित्यिका स्त्रियांची होणारी घुसमट, तिच्यावर होणारे अन्याय या संदर्भात त्यांच्या साहित्यातून लिहीत आहेत. याच्या पाऊलखुणा शोधत गेलं तर संत साहित्यात त्या सापडतात. नामदेवाची दासी जनाबाई आणि चोखोबाची महारी सोयराई असा स्वतःच्या नावाचा नामोल्लेख करणाऱ्या संत कवयित्री त्यांच्या अभंगातून त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार मुक्तपणे लिहून गेल्या आणि स्त्रीचा दबलेला श्वास मोकळा झाला. विठ्ठलाला सखा सोबती मानून त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. एका अभंगांमध्ये सोयराई म्हणते… या वेदना आमच्याच वाट्याला का? असा प्रश्न विचारते.

देहींचा विटाळ देहीच जन्माला
सोहळा तो झाला कवनधर्म…
असं म्हणत समस्त व्यवस्थेलाच प्रश्न विचारताना दिसते.
संत जनाबाईच्या पुढील अभंगातून स्त्रीच्या मनातील घालमेल समाज व्यवस्थेच्या बाहेर पडून स्वतःला मुक्त करण्याची तीव्र इच्छा जाणवते…
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा।
आता मज मना कोण करी ॥ २॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल ।
मनगटावर तेल घाला तुह्मी ॥ ३॥

असं अभंगातून त्या व्यक्त होतात. हे वाचताना असं वाटतं की, पुढील काळातील महिलांसाठी त्यांनी एक मनाची खिडकी किलकिली करून मुक्तपणे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिलं, असं मला वाटतं. जेव्हा एकनाथांच्या भारूडाचा अभ्यास करू लागले त्यावेळेला पहिला स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार त्यांच्या भारूडातून जाणवला. तत्कालातील समाजातील स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती. त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य तर नव्हतंच; परंतु नाकारण्याचेही स्वातंत्र्य नव्हतं. अशा वेळेला ‘दादला’सारखं भारूड लिहून संत एकनाथांनी स्त्रीच्या मूक भावनेला बोलतं केलं. दीडशे विषयांवर ३०० पेक्षा जास्त भारूडे एकनाथांनी लिहिली. त्यापैकी आदिशक्तीपासून ते कोल्हाटीन, परटीण अशा नगण्य समजल्या जाणाऱ्या स्त्रियांवरही त्यांनी भारूडे लिहिली आणि स्त्री शक्तीचं उदात्तीकरण केलं.

वेगवेगळ्या टप्प्यावर जेव्हा स्त्री स्वातंत्र्याचा विचार आपण करतो तेव्हा स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या प्रकाशापेक्षा अंधारच जास्त जाणवतो. स्त्री दास्यत्वाच्या पाऊलखुणा रामायण महाभारतासारख्या पवित्र आदर्श समजल्या जाणाऱ्या ग्रंथातही आढळतात. काळ कोणताही असो थोड्याफार फरकाने बदल झाला असला तरीही स्त्रीवर अन्याय होताना दिसतो. फक्त कारणं वेगळी असतात. अन्याय करणाऱ्या पद्धती बदलल्या आहेत. आजही बाल विवाह होत आहेत. हुंडा पद्धतीही सुरू आहे. मुलींचे गर्भपातही केले जात आहेत. कायद्याच्या चौकटी मोडून माणसं स्वार्था पोटी हवं तसं वागतात. त्यावेळेला त्या स्त्रीच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचारही करत नाहीत. माणसांचीच मानसिकता युगानुयुगापासून तीच आहे.

स्त्रीयांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख जेव्हा पाहत पाहत मी माझ्यापर्यंत येते तेव्हा विचारू लागते… किती आदर्श परंपरा अनेक स्त्रियांनी निर्माण केली आहे. मी भाग्यवान आहे यासाठी की याच परंपरेची मी पाईक आहे… मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते आहे त्या क्षेत्रातली माझी जबाबदारी मी ओळखते. माझ्या परीने समाजासाठी, मराठी भाषेसाठी माझ्याबरोबर चालणाऱ्या व माझ्या पाठीमागून येणाऱ्या महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना सोबत घेऊन जाताना खूप आनंद होतो. हा आनंद महिला दिनाच्या निमित्ताने व्यक्त होताना मनाचा एक कोपरा सुखद अनुभवाने दरवळून जातो. यासाठीच महिला दिन साजरा करायला हवा. एकमेकींना सहाय्य करून संपूर्ण समाज सुपंथ करण्याची ताकद मैत्रिणींनो आपल्यात आहे आणि हे कार्य आपण करूया…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -