आशय वीणा सानेकर घटस्फोट हा विषय अगदीच नवा राहिलेला नाही. तरुण वयातले घटस्फोट हे तर सर्रास दिसणारे चित्र आहे पण पंचवीस वर्षे लोणच्यासारखा मुरलेला संसार सोडून वेगळे व्हावेसे वाटणे, हा नाटकाचा विषय असल्यावर ते पाहण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या उत्सुकतेसकट ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नाटक नुकतेच पाहिले. सुमीत राघवन आणि चिन्मयी सुर्वे ही खऱ्या आयुष्यातली जोडी रंगमंचावर पाहणे हा रसिकांसाठी आनंद देणारा अनुभव!या नाटकाची वय पन्नाशीची नायिका मानसी हिला तिचा नवरा शशांक याच्यापासून घटस्फोट हवा आहे. शशांकने पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे तर मानसी त्याला नि घराला जपणारी गृहिणी आहे. बायको आणि आई म्हणून तिने आपली सर्व कर्तव्ये पूर्ण केली आहेत. मानसी अधून मधून कविता लिहिते. तिची कविता अतिशय साधी सोपी आहे. अशा लाघवी आणि सरळ स्वभावाच्या मानसीला घटस्फोट घ्यावासा वाटणे, ही गोष्ट उत्सुकता वाढवत नेणारी आहे. दुसरीकडे शशांकला घटस्फोट नको आहे. कोर्टाने या दोघांसाठी मॅरेज काऊन्सिलर्स नेमले आहेत. आदित्य आणि सुरभी हे दोघेही साधारण तिशीचे आहेत. त्यांनी काऊन्सिलिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे. प्रारंभी या तरुण जोडप्याला हे काऊन्सिलिंग काय जमणार? असे म्हणणारा शशांक हळूहळू त्यांच्यावर विश्वास ठेवू लागला. या काऊन्सिलिंग सभांमधून हळूहळू शशांक मानसीची कथा उलगडत जाते किंबहुना तेच त्यांची कथा कथन करतात. हे जे त्यांचे कथन करणे आहे, ते त्यांच्या आयुष्याच्या त्या त्या टप्यावर प्रेक्षकांना घेऊन जाते. हे फ्लॅश बॅक पद्धतीने काळाच्या वेगवेगळ्या प्रदेशात घेऊन जाणे, दिग्दर्शकाने रंजक केले आहे. त्यासाठी नेपथ्याचा ठोस आधार लाभला आहे.शशांक आणि मानसी एकाच शाळेतले मित्रमैत्रिणी आहेत. शाळेतल्या कित्येक क्षणांनी त्यांच्या नात्याला बांधून ठेवले आहे. त्यांची शाळा, शिक्षक, त्यांनी केलेल्या शिक्षा, मानसीला न कळणारी गणिते सोडवण्यात शशांकने केलेली मदत, आणखी पुढल्या टप्यावर बसस्टॉपवर भेटणे या सर्व गोष्टींनी त्यांच्या नात्याची पायाभरणी केली आहे. मानसीचे वागणे, बोलणे, वावरणे या सर्वातले चैतन्य चिन्मयी सुमीतने आपल्या अभिनयातून सुंदर साकारले आहे. शाळेतली धांदरट मानसी आणि नंतरची समजूतदार, शशांकची काळजी घेणारी मानसी या दोन्ही रूपांतले कंगोरे लख्खपणे समोर उभे राहतात. शशांकची प्रतिमा शाळेपासूनच हुशार, प्रतिभावंत, रुबाबदार अशी आहे. हा उमदेपणा सुमीत राघवनने त्याच्या अभिनयातून पुरेपूर साकारला आहे. सुरभी आणि आदित्य या दांपत्याच्या सहजीवनातील क्षण देखील नाटकातून बोलके होतात. आईपासून दूर गेलेला आदित्य नाटकाच्या शेवटी शेवटी तिच्याबद्दल भावुक होतो. या सर्वात सुरभीचे या दोघांमधले अंतर मिटवण्याचे प्रयत्न प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. नात्यामधल्या भावछटा, खुसखुशीत विनोदाची पेरणी, गीत संगीताचे रसरशीत माधुर्य आणि विचार करायला लावणारा स्त्रीमनाचा उत्कट उद्गार यामुळे नाटक प्रेक्षकांना धरून ठेवते.अनैतिक वर्तन, शारीरिक छळ, आर्थिक फसवणूक अशी कोणतीही सामान्यतः आढळणारी कारणे मानसीला अपेक्षित घटस्फोटामागे नाहीत. खरे तर शशांकला मानसीच्या निर्णयामागचे कारण कळत नाही. पती-पत्नीचे नाते प्रेमाच्या, मैत्रीच्या, विश्वासाच्या पायावर उभे असते, त्याचबरोबर या नात्यात परस्परांबद्दल आदरभाव नसेल तर त्यात पोकळी राहून जाते. हे नाट्यबीज या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. स्त्रीमनाचे व्याकुळ होणे साकारताना मानसीचा उद्रेक होत नाही, ती आक्रमक होत नाही. कोसळून पडत नाही.ती वेगळे व्हायचे ठरवते ते स्वतःचा शोध घेण्यासाठी! शशांकची सावली होऊन तिने आजवरची वाटचाल केली आहे. आता हे सावली होणे नाकारून तिला स्वतःला स्वतःबद्दल आदर निर्माण करायचा आहे. आपल्यालाच आपल्याबद्दल आदर वाटला नाही तर तो दुसऱ्यालाही वाटणार नाही हे तिने ओळखले आहे.मानसीच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित करून वाढदिवसानिमित्ताने शशांक तिला चकित करू शकतो पण आपल्या कविता लेखनाबद्दल शशांकला आदर नाही, हे मानसीने ओळखले आहे. ते तिच्या जिव्हारी लागले आहे. हे जाणवल्यावरच ती वेगळे राहायचे, स्वतःला स्वतंत्रपणे घडवायचे ठरवते. सहा महिन्यांनी शाळेच्या रियुनियन निमित्ताने दोघे पुन्हा भेटतात. दरम्यान मानसी स्वतः एका प्रथितयश लेखिकेसोबत काम करते. आत्मवि श्वासाने जगते. तिने वेगळे व्हायचे ठरल्यावर कोलमडून पडलेल्या शशांकला हळूहळू तिचे सुख कशात आहे, हे समजते. निरपेक्षपणे तो तिच्या निर्णयांचा आदर करण्याचे ठरवतो आणि त्या दोघांच्या वर्षानुवर्षे असलेल्या दोस्तीचा नवा प्रवास सुरु होतो. लेखक ओंकार गोखले, दिग्दर्शक सूरज पारसनीस, सुमीत राघवनचा सदाबहार प्रसन्न शशांक, मनाचा तळ शोधू पाहणारी चिन्मयी सुर्वे यांची मानसी, अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा आश्वासक अभिनय, नीरद सुमितचे ताजेतवाने करणारे संगीत, शिवप्रिया सुर्वे यांची गीते आणि कल्पक नेपथ्य या सर्वांसह ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नाटक वाढलेल्या उकाड्याचा मोसमात प्रसन्न आनंदाचा शिडकावा घेऊन आले आहे, एवढे मात्र नक्की!






