Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सPankaj Udhas : गझल झाली उदास...

Pankaj Udhas : गझल झाली उदास…

  • उमेश कुलकर्णी

इस्लामी सांस्कृतीकडून भारतीय संगीताला मिळालेली देणगी म्हणजे ‘गझल’. हा एक सुगम गायन प्रकाराचा प्रकार. प्राचीन इराणमधील हा प्रेमगीताचा प्रकार भारतात सुफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील भावनांची गुंफण म्हणजे ‘गझल’ या संतांनी आपली प्रार्थनागीते ‘गझल’ या काव्यप्रकारात रचली. त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. त्यामुळेच आपल्या कानावर सुमधुर गझल पडू लागली… पंकज उधास यांची ‘आज तुमसे बिछड् रहा हू मै, असज के बाद फिर मिलुंगा तुम्हे… ही गझलही अशीच अविस्मरणीय आहे. त्यांच्या मधुर सुरावटींचा गाेडवा रसिकांच्या कायम स्मरणात राहिल या शंकाच नाही.

तो काळ होता नव्वदच्या दशकाचा. बॉलिवूडला बॉलिवूड तेव्हा म्हटले जात नव्हते, तर साधे सरळ फक्त हिंदी चित्रपटसृष्टी असे संबोधले जात होते. हिंदी चित्रपटसृष्टीत किशोरकुमार आणि महंमद रफीची चलती होती. त्यांच्याही कारकिर्दीचा हा अखेरचाच टप्पा होता. त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांनी संगीत विश्वाला कवेत घेतले होते. गझल गायकी ही केवळ पाकिस्तानच्या मेहंदी हसनपुरती मर्यादित होती. इतर गझल गायकांचे नावही कुणाला माहीत नव्हते. बॉलिवूडमध्ये ‘एक दो तीन चार पाच छे सात’(चित्रपट तेजाब) असे अंकगणिताचे अर्थहीन गीते चित्रपटांवर राज्य करत होते. संगीताने मान टाकली होती. कल्याणजी आनंद जी यांच्या कारकिर्दीची अखेर सुरू होती, तर लक्ष्मीकांत प्यारेलाल चित्रपट संगीतात टॉपची जागा बळकावून बसले होते.

आर. डी. बर्मन कालवश झाले होते. बॉलिवूडमधील संगीत मारले गेले होते आणि त्याची दररोज भ्रूणहत्या सुरू होती. याच काळात अचानक महेश भटांचा चित्रपट ‘नाम’ रिलीज झाला. त्यात एक गाणे होते ‘चिठ्ठी आई है’ आणि ते गाणे लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले होते. अत्यंत तिसऱ्या दर्जाची गाणी लिहिणाऱ्या आनंद बक्षींचे हे गीत लोकप्रियतेच्या शिखरावर गेले आणि त्याबरोबर गायक पंकज उधासचे नाव घरोघरी पोहोचले. त्या गाण्याने असा इतिहास घडवला की, ‘बिनाका गीत’ मालेच्या वार्षिक कार्यक्रमात त्याने सर्वोच्च स्थान पटकावले होते. या अप्रतिम गीताचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालच होते. संगीताला ठार मारणाऱ्या चाली देणाऱ्या या जोडगोळीने हे गीत द्यावे, हा एक चमत्कार होता. या गाण्यामुळे आणि त्याच्या अफाट लोकप्रियतेमुळे गझल गायकीला प्रसिद्धी मिळाली. पंकज उधास हे नाव ज्याच्या तोंडी झाले. अर्थात त्यामुळे चित्रपट संगीतात काही आमूलाग्र बदल झाला, असे मात्र घडले नाही. संगीत तसेच सामान्य दर्जाचे राहिले. पण कधी असेच एखादे मोत्यासारखे गाणे झळाळून उठायचे. त्या पिढीतील तरुणांना गझलांची आवड पंकजने लावली. त्यांच्यासाठी गझल गाणे हे प्रेमाची पहिली पायरी ठरत होती.

गझलच्या कॅसेट्सची विक्री प्रचंड वाढली आणि ज्याच्या त्याच्या घरी गझलांच्या कॅसेट्स होत्या. त्यावेळी सीडी वगैरे आली नव्हती. तरुण पंकजच्या गझला ऐकत आणि ऐकवत प्रेमाचे उसासे सोडू लागले. हा बदल पंकजच्या गझल गायकीने घडवून आणला. पंकजच्या लोकप्रियतेने मोठी मजल मारली असली, तरीही त्याला व्यावसायिक यश असे फार मिळाले नाही.

बॉलिवूडमध्ये टॉपला कुमार सानू, उदित नारायण हेच होते. उदित नारायण आणि कुमार सानू यांचे आगमन होऊन ते प्रस्थापित झाले होते. चित्रपटात सहा-सात गाणी असली तरीही एखादे कुठेतरी पंकज उधासचे गाणे असायचे. बाकी सारा उदित नारायण आणि कुमार सानू असाच मामला असायचा. किशोर, महंमद रफी यांच्या स्पर्धेला तोंड देत पंकज उधास मागे पडले. त्यानंतर कुमार सानूच्या तुफानात तर ते अदृष्यच झाले. कुमार सानूने सलग चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आणि बाकीच्या गायकांची उचलबांगडी झाली. त्यात गझल गायकी ही मागे पडली. जगजीतसिंग आणि चित्रा सिंग यांनी गझल गायकीला जी प्रतिष्ठा मिळवून दिली होती. ती पंकजने सर्वोच्च स्तरावर नेली. पण त्यांनंतर गझल गायकीला चर्चेत आणले ते पंकजने. पंकज उधासला नंतर फारशी गाणी मिळाली नाहीत. जग आणि जीवन गतीमान झाले, संगणक क्रांती आली आणि निवांत बसून गझल गायन ऐकण्याला कुणाला वेळ मिळेनासा झाला. त्यात गझल गायकीचे प्रचंड नुकसान झाले. पंकज उधास यांचा आवाज अत्यंत मुलायम होता. त्यांच्यासारखा आवाज हा गझल गायकीला जुळणारा होता. इतर प्रकारची उडत्या चालीची गाणी त्यांच्यासाठी नव्हती. पूर्वी मराठीमध्ये वाटवे वगैरे मराठी भावगीत गाणारे गायक होऊन गेले. पण नंतरच्या स्पर्धेत ते गुमनामीच्या अंधारात गेले. तसेच पंकजचे झाले. त्याला नव्या संगीतात आणि नव्या स्पर्धेच्या जगात स्थान राहिले नाही. मुळात गझलेलाच स्थान राहिले नाही. अगदी अपवादानेच गझला आल्या. पंकज उधासने ज्या गझलेला इतक्या उंचीवर नेऊन ठेवले, त्या गझलेला नंतर कोणतेच स्थान उरले नाही. गझल हा प्रकार निवांतपणे बसून ऐकण्याचा आहे.

एखाद्या अलिशान उपाहार गृहात बसून आरामशीर जेवण करणे आणि एखाद्या हातगाडीवर बटाटावडा पाव घाईघाईत खाणे यात जितका फरक आहे तितकाच फरक बाकीचे संगीत आणि गझल गायकीत आहे. पंकज उधासच्या आवाजावर विश्वास असणारे इतरही संगीतकार होते आणि त्यामुळे त्याला इतरही काही गाणी मिळाली. त्यात शाहरूख खानच्या ‘बाजीगर’ चित्रपटातील ‘किताबे बहुतसी पढी होगी तुमने’ हे एक गीत होते. ते प्रथम पंकज उधाससाठी होते.

पण नंतर ते विनोद राठोडच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले. पण उधासच्या मऊ, मुलायम आवाजाला बॉलिवूडमध्ये स्थान उरलेन नाही. त्यामुळे पंकजचा आवाज व्यावसायिक विश्वातून कधीच लुप्त झाला होता. दयावान चित्रपटातील ‘आज फिर तुमसे प्यार आया है’ एक लक्षणीय गीत. बस त्याची संगीत संपदा इतकीच मर्यादित राहिली. त्याने स्टेज शोज केले. पण चित्रपटातून ते बाद झाले ते झालेच. गझल गायकी आज पुन्हा एकदा लुप्त झाली आहे. पंकज उधासने जी गझल गायकी ती मुस्लीम संस्कृतीपुरती सीमित होती. ती त्याने हिंदू संस्कृतीपर्यंत विस्तारली. हे कार्य कोणत्याही गायकाने आजपर्यंत केलेले नाही. पंकज उधासची गझल गायकी चिरकाल स्मृतीत राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -