नवी दिल्ली: चार राज्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणानंतर आता मिझोरम येथील मतमोजणी होणार आहे. याआधी मतमोजणी ३ डिसेंबरला होणार नाही. मात्र राजकीय पक्ष, एनजीओ, विद्यार्थी संघटना आणि चर्च यांच्या अपीलानंतर निवडणूक आयोगाने ही तारीख बदलत ४ डिसेबंर केली. कारण येथील ख्रिश्चन लोकांसाठी रविवारचा दिवस अतिशय खास असतो.
मिझोरममध्ये मतमोजणीसाठी सुरक्षा अतिशय चोख करण्यात आली आहे. यावेळेस मिझो नॅशनल फ्रंट, झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि काँग्रेस यांच्यात त्रिशंकू सामना होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण १८ महिलांसह १७४ उमेदवार मैदानात आहेत. मिझोरम विधानसभेसाठी सात नोव्हेंबरला मतदान पार पडले होते. राज्यातील ८.५७ लाख मतदारांपैकी ८० टक्क्यांहून अधिकांनी मतदान केले होते.
मिझोरममध्ये एनएनएफ, झेडपीएम आणि काँग्रेस यांनी ४०-४० जागा लढवल्या तर भाजपने १३ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. मिझोरममध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने चार जागा लढवल्या. याशिवाय १७ अपक्ष उमेदवारांचाही निकाल आज लागणार आहे.
कडक सुरक्षाव्यवस्थेत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. काही ठिकाणी मतदारांची संख्या कमी आहे केवळ दोन टप्प्यात मतमोजणी होईल. मात्र बऱ्याच ठिकाणी पाच टप्प्यात मतमोजणी होईल.