मराठवाडा वार्तापत्र: डॉ. अभयकुमार दांडगे
शेजारच्या घरात आग लागली तर आपलेही घर जळू शकते, हे ज्यांना कळते तो हुशार, असा एक समज आहे. हे न समजण्याइतपत कोणीही ‘शहाणा’ राहिलेला नाही, असे असताना मराठवाड्यातूनच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा का पेटला? असा सवाल आता उपस्थित होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात होत असलेल्या राजकीय नेत्यांच्या सभा कुठेतरी रोखणे गरजेचे आहे, हे राज्य शासनाला कधी कळेल? असा सवाल मराठवाड्यातील सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत. मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण चांगलेच पेटले आहे. ग्रामीण भागात एकमेकांच्या सभांचे बॅनर फाडणे व त्यामधून वाद उद्भवणे असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. ग्रामीण भागात या दोन्ही समाजाचे कार्यकर्ते व नागरिक आपापसात भिडले आहेत. मराठवाड्यात आरक्षणाच्या सभाच नकोत, असा सूर आता यामुळे उमटत आहे.
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून भव्य सभादेखील घेतल्या जात आहेत. ऐन दिवाळीत रात्री दहाच्या नंतर फटाके फोडू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. पोलीस यंत्रणेने त्या आदेशाचे पालन करत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात रात्री दहाच्या नंतर फटाके फोडू दिले नाहीत. असे असताना रात्री दहाच्या नंतर रात्री उशिरापर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाहीर सभा कोणत्या कायद्यात बसणाऱ्या आहेत? असा सवालही यानिमित्ताने पुढे येत आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात छगन भुजबळ व मनोज जरांगे या दोन्ही नेत्यांची एकामागून एक सभा होणार आहेत.
येत्या रविवारी म्हणजेच २६ नोव्हेंबरला छगन भुजबळ यांची हिंगोली येथील रामलीला मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांचीदेखील हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रस कराळे फाट्यावर ११० एकरवर सभा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभेकडे मराठवाड्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्यातील ओबीसी नेते हजेरी लावणार असल्याचे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती, तर राहणारच आहे. शिवाय अध्यक्षस्थानी प्रकाश शेंडगे राहतील. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड येथे भुजबळ यांची झालेली मोठी सभा संपूर्ण राज्यात गाजली होती. त्या सभेनंतर मराठवाड्यात ओबीसी बांधव चांगलाच पेटून उठला आहे. भुजबळ यांच्या जालना जिल्ह्यातील सभेला उत्तर देण्यासाठी मराठवाड्यातील हिंगोली येथे पुन्हा एकदा आरक्षणाच्या सभेतून रणकंदन माजणार आहे.
भुजबळ यांच्या हिंगोली येथील सभेपाठोपाठ मनोज जरांगे यांचीही सभा हिंगोलीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांची खूप मोठी सभा झाली. त्या सभेनंतर मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. या टीकेला हिंगोली येथे २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेतून भुजबळ हे नक्कीच उत्तर देतील. दरम्यान, बीड येथे मराठा आरक्षण मुद्द्यावरून झालेली जाळपोळ व दंगलीला राज्य सरकारमधील एक व्यक्ती जबाबदार आहे, तसेच अंबड येथील सभेत भुजबळांनी जे भाषण केले, ते भाषणही एक स्क्रिप्ट होती, ती स्क्रिप्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लिहून दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल बीड येथे केला.
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा मराठवाड्यातील बीड येथे नुकतीच पोहोचली. ही यात्रा फारशी चर्चेत आली नाही; परंतु यात्रेच्या नंतर पत्रकार परिषद घेऊन मागच्या मुद्द्यावर हात घालत फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी दोन-चार आरोप केल्यामुळे ती बीडची यात्रा राज्यातील ब्रेकिंग न्यूज ठरली. मराठवाड्यात शेतकऱ्यांचा प्रश्न उभा असताना त्या मुद्द्यावर या युवा संघर्ष यात्रेतून चर्चा होणे अपेक्षित असताना मराठा ओबीसी वादाच्या ठिणगीत आमदार रोहित पवार यांनीही यानिमित्ताने उडी घेतली. या सर्व घडामोडी दरम्यान आणखी एक वाद मराठवाड्यात नुकताच दिसून आला.
मराठवाड्यातील जालन्यात धनगर समाजाच्या मोर्चाला अचानक हिंसक वळण मिळाले. अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास उशीर लावल्याचा आरोप करीत संतापलेल्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हल्ला चढवला. आंदोलकांनी त्या ठिकाणी दगडफेक करून अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठवाड्यात एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा जनक्षोभ पेटत असताना जालन्यातील धनगर समाजाच्या मोर्चाला मिळालेले हिंसक वळण, भविष्यातील परिस्थिती दर्शवीत आहे. एकीकडे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगी यांच्या होत असलेल्या सभा, त्यानंतर त्या सभांना उत्तर देणारी छगन भुजबळ यांची हिंगोलीतील २६ रोजी होणारी सभा व आता धनगर समाजाच्या मोर्चाने घेतलेले हिंसक वळण या सर्व घटना पाहता मराठवाड्यात आरक्षणाच्या मुद्द्यासाठी कोणाच्याच सभेला परवानगी देऊ नये, असा सूर उमटत आहे. तसेच मराठा आरक्षणसंदर्भात कायदेशीरदृष्ट्या जे शक्य आहे, ते होणारच असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनामार्फत मराठवाड्यात कोणाच्याच सभेला परवानगी देऊ नये, अशी ही मागणी आता पुढे येत आहे. मराठवाड्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या सभांमुळे केवळ मराठवाड्यातीलच नव्हे; तर राज्यातील वातावरण गढूळ होत आहे. महाराष्ट्रात भविष्यातील अशांतता थांबवायची असेल, तर त्याची सुरुवात मराठवाड्यातील सभाबंदीने व्हावी, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.