Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीNana Patekar Fan Viral Video : नानांनी माफी मागितली पण चापट खाल्लेला...

Nana Patekar Fan Viral Video : नानांनी माफी मागितली पण चापट खाल्लेला फॅन म्हणतो ‘माझी इज्जत गेली…

त्या फॅनने व्यक्त केल्या भावना

उत्तरप्रदेश : दोन दिवसांपूर्वी नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शूटिंग सुरु असताना सेल्फी काढायला आलेल्या एका फॅनला चापट मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला होता. त्यामुळे चाहत्यांनी नानांना बरंच ट्रोल केलं. या प्रकरणी शूट सुरु असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तो सीनचाच एक भाग असल्याचे सांगितले. तर नानांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेला घटनाक्रम सांगितला. चापट खाल्लेला फॅन हा क्रू मेंबरपैकीच असावा असं वाटल्याने नानांनी जी रिहर्सल केली होती त्यानुसार त्या फॅनला चापट मारली. नानांनी या व्हिडीओमध्ये सर्व चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

यानंतर आता चापट खाल्लेल्या फॅनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नानांनी म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा बोलावलं वगैरे नाही असं त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला, ‘घाटावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे की नाही किंवा कोणी सेलिब्रिटी तेथे आहे की नाही याची मला कल्पना नव्हती. मी नेहमीप्रमाणे घाटावर आंघोळीसाठी गेलो होतो. जेव्हा मला समजले की, जवळच नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यानंतर मी नाना पाटेकर यांच्याकडे गेलो. तिथल्या बाऊन्सरने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी कसाबसा त्यांच्याजवळ गेलो.

नाना पाटेकर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते की, ‘मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला’. याबाबत त्या फॅनला प्रश्न केला असता त्याने मात्र वेगळाच खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी सेल्फी घ्यायला जाणार तोच नानांनी मला चापट मारली आणि मला बाऊन्सरने बाहेर काढलं. माझ्या विभागात सर्वांना ही घटना समजली असल्याने माझी इज्जत गेली आहे. याशिवाय नाना पाटेकर यांनी मारल्यावर मला परत बोलावलं, ते सर्व खोटं आहे. असं काही घडलंच नाही’.

नानांवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारताच फॅनने नकार दिला. दरम्यान, नाना पाटेकर म्हणाले, ‘मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते. जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही’ अशी नानांनी व्हिडीओमध्ये माफी मागितली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -