- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
पौराणिक कथेनुसार, श्रीरामाने रावणाचा वध करून, १४ वर्षांनी ते सारे अयोध्येत परतले; श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना व १६०० बंदिवान स्त्रियांना सोडविले. दोन्ही वेळी जनतेने घराघरांत दिवे लावून, दीप प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले त्या विजयाची आठवण म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो.
दिवाळी म्हणजेच दीपावली! दीप म्हणजे दिवा, आवली म्हणजे ओळ. दिव्यांची ओळीने केलेली मांडणी. अंगणात, खिडकीत, दरवाजापुढे ओळीने मंद उजळणाऱ्या पणत्यांची रांग. घरांवर विजेच्या दिव्यांच्या माळा. घराबाहेर उंचावर आकाशकंदील. सर्वत्र दिव्यांची रोषणाई. असा हा दिव्यांचा दीपोत्सव!
दिवा हे उजेडाचे, प्रकाशाचे, ज्ञानाचे, मांगल्याचे प्रतीक आहे. समग्र अंधाराला घालवून लख्ख उजेड देण्याचे काम दिवा करतो. प्रतीकात संस्कृतीचा अर्थ दडलेला असतो तो शोधा. स्वतःच्या, स्वतःबरोबर दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी हा दीपोत्सव!
‘तमसो मा ज्योतिर्गमय’! प्रकाशाचा संबंध देवाशी आणि जीवनाशी आहे. जेथे देवाची उपासना होते, तेथे कोणत्या ना कोणत्या प्रकारे (समई, पणती, मेणबत्ती) प्रकाश अखंडित ठेवण्याची प्रथा आहे. आनंद, उत्साह, भरभराट आणणारा सण दीपावली!
आपला भारत हा कृषिप्रधान देश. पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात झालेल्या दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्याचे घर स्वतःच्या शेतातील पिकामुळे भरलेले असते. या समृद्धीमुळे घरातील सर्वांना नवीन कपडे, घराला दिव्याची रोषणाई, घरांत गोडधोड, थंडीसाठी शक्तिवर्धक फराळ करून आप्तस्वकियांची भेट घेणं हे दिवाळीच्या उत्सवाचे मूळ स्वरूप.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकातले पहिले दोन दिवस अशी चार दिवसांची दिवाळी साजरी केली जाते. अमावास्या म्हणजे काळोख! पण आश्विन आमावस्या ही असंख्य दिव्यांमुळे लखलखत असते. दीपावलीच्या दिवशी केवळ महालक्ष्मी नाही, तर पितरांसाठीही दिवे लावले जातात. पितरांची रात्र दिवाळी अमावास्येपासून सुरू होते. अशी ही दीप प्रज्वलनाची प्रथा आहे.
सर्वत्र अंधार असताना अंधारापासून मुक्त होण्यासाठी, वाईट शक्तींना कमजोर करण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात. दिवाळी हा प्रकाश अंधाराचा खेळ. अंधाराचा संबंध अज्ञान, न सांगता येणाऱ्या, लपविणाऱ्या गोष्टीशी असतो, तर प्रकाशाचा संबंध प्रकाशाइतकेच सत्य उघडपणे सांगणाऱ्या ज्ञानाशी असतो. असा हा अज्ञानाचा अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा दीपोत्सव!
दिवा जळत असताना दिव्याच्या प्रकाशात माणसे वावरतात. पण त्यांची ज्योतीला, प्रकाशाला, जाणीवही नसते. रवींद्रनाथ टागोर एक हृदयस्पर्शी सत्य सांगतात – “कुठलीही ज्योत मग ती क्रांतीची असो, शक्तीची असो, भक्तीची वा ज्ञानाची असो, अखंड तेवत ठेवण्याचा प्रयत्न बड्या धनिकाकडून नव्हे किंवा बुद्धिवंतांकडून नव्हे, तर सामान्य माणसांकडून होतो.” काही उदा. –
१. उच्चशिक्षित बुद्धिमान कर्मयोगी समाजसेविका कुसुमताई तासकर यांनी ७० वर्षांपूर्वी वंचित, उपेक्षित समाजघटकांची सेवा करण्यात आपले जीवन सार्थक मानले. सेवा करताना त्यांच्या लक्षात आले, समाजातील पुष्कळांना मानसपोचाराची गरज आहे. तुरुंगातील बाल गुन्हेगारांना, वसतिगृहातील कैद्यांना, अपंगांना मानसपोचाराची चाचणी देऊन कुसुमताईने उपचार केले.
२. बालगुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या, समाजाने झिडकारल्यामुळे मुलांना विकास पाटील हा युवक श्रीगोंद्यात पारधी समाजासाठी काम करत आहे.
३. राणी बंग यांचा मुलगा अमृत बंग हा आपल्या सहकाऱ्यांसोबत चाकोरीबाहेरील चालणाऱ्या मुलांना सामाजिक समस्यांविषयी सजग करीत नवी पिढी तयार करीत आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, ‘अप्पो दीपो भव!’ तुम्ही स्वतःच प्रकाशरूप व्हा. सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. अंधार मिटवायला मिणमिणती पणती, किंवा प्रकाशाची तिरपी रेघही पुरते.
प्रत्येक सणामागे कोणती ना कोणती कथा असते. पौराणिक कथेनुसार, श्रीरामाने रावणाचा वध करून, १४ वर्षांनी ते सारे अयोध्येत परतले; श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना व १६०० बंदिवान स्त्रियांना सोडविले. दोन्ही वेळी जनतेने घराघरांत दिवे लावून, दीप प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले त्या विजयाची आठवण म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो.
दिवाळीच्याच दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी वर आल्या. त्यांचा जन्मदिवस आणि कालांतराने याच दिवशी भगवान विष्णूशी त्यांचा विवाह झाला म्हणून दिवाळीत लक्ष्मीपूजन करतात. बळीराजा अत्यंत दानशूर. पण कोणाला केव्हा आणि कोठे दान द्यावे, हे बळीराजा समजत नव्हते. बळीराजाला पाताळात गाडण्याआधी विष्णूने या निस्सीम भक्ताला आशीर्वाद दिला, “दिवाळीचे तीन दिवस बळीचे राज्य असेल.”
दिवाळी म्हणजे निराशेवर आनंदाचा, अज्ञानावर शहाणपणाचा, असत्यावर सत्याचा, मिळविलेला विजय होय. वाईट गोष्टीची सतत तक्रार करण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीवर प्रकाश टाकत दुसऱ्यासाठी एक तरी आशेचा दिवा लावावा.
दिवाळी! हिंदू धर्मातील सर्वात मोठा, घराघराला ऊर्जा देणारा, सर्वांना एकत्र आणणारा सण! दीपावली सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक पंथात प्रकाशाचे एक स्वतःचे महत्त्व आहे. दिवाळीचा प्रत्येक दिवस एक सांस्कृतिक विचार सांगतो.
१. वसुबारस : भारतीय संस्कृतीत गाईला असलेले महत्त्व लक्षात घेऊन गाय-वासराच्या पूजनाने दिवाळीला सुरुवात होते.
२. धनत्रयोदशीला मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. हिशोबाच्या चोपडीची पूजा करतात. आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांना हा दिवस समर्पित आहे. अपमृत्यूचे संकट टाळण्यासाठी या दिवशी एक दिवा दक्षिणेकडे ज्योत करून ठेवतात. ‘यमदीपदान’.
३. नरक चतुर्दशीला पहाटेचे अभ्यंग स्नान! प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात नरक निर्माण करणाऱ्या उदा. आळस, प्रयत्न न करणे, अस्वच्छता, झोप, राग… यांना मारून टाका. दिव्याच्या प्रकाशात तिन्हीसांजेला घराघरांत आलेल्या देवीलक्ष्मीच्या पूजेसोबत आरोग्यलक्ष्मी ‘केरसुणी’चीही पूजा करतात. जेथे स्वच्छता, प्रयत्न तेथे लक्ष्मी निवास करते.
४. बलिप्रतिपदा / पाडवा! साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा. पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास. व्यापाराचे नवे वर्ष.
५. बहीण-भावाच्या नात्याचे प्रेम भाऊबीज.
दिवाळीत अनेकांना आपली कला, सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळते. दिवाळीत होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीत घराघरांतून फराळ, कंदील, पणत्या, दिवे, सजावट यांचीही विक्री होते. या साऱ्या हिंदूंच्या परंपरा अबाधित राहण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते.
आजच्या दिवाळीच्या बदललेल्या स्वरूपांत फटाके कमी झाले. दिवाळी अंकाला वाचक नाही. कागदाऐवजी प्लास्टिकचे कंदील, रांगोळीला स्टिकर, तेलाच्या पणतीऐवजी विद्युत दिवे, कोरडे संदेश यावर विचार व्हावा. पर्यावरण वाचावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘साधुसंत येति घरा, तोचि दिवाळी दसरा’ याचा अर्थ जीवनात क्षणभर तरी सत्संग घडावा. “दुष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद” देणाऱ्या या दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा!
[email protected]