Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलAlien : परग्रह सजीव

Alien : परग्रह सजीव

  • कथा : प्रा. देवबा पाटील

परग्रहांवर थोड्या फार फरकाने तुमच्या-आमच्या ग्रहांवरील सजीवांसारखेच सजीव असण्याची शक्यता आहे. कारण सजीवांसाठी आपल्या ग्रहांसारखे पोषक वातावरण असल्याशिवाय तेथे पूर्ण विकसित सजीव राहूच शकत नाहीत.

संदीप व दीपा हे जिज्ञासू बहीणभाऊ त्यांच्या यक्षमित्राच्या अंतराळ यानातून अवकाश प्रवासाचा आनंद लुटत होते व त्याला माहिती विचारीत आपल्या जिज्ञासाही पूर्ण करून घेत होते.

“आपले विश्व प्रसरण पावत आहे याबद्दल तुमच्या शास्त्रज्ञांचे काय मत आहे? तसेच ते स्वर्गातील देव, गंधर्व, यक्ष, किन्नर आकाशातून खाली पृथ्वीवर यायचेत व पुन्हा परत जायचेत, असेही पौराणिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे. हे ग्रहावरून इकडे खाली पृथ्वीवर येत असतील का आणखी वेगळ्या स्वर्गातील इतर कुणी वेगळे देव खाली येत असतील काय?” दीपाने प्रश्न केले.

“तुमच्या व आमच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की हे विश्व सतत प्रसरण पावत आहे. आकाशगंगा एकमेकांपासून प्रचंड वेगाने दूर जात आहेत. त्यांचा दूर जाण्याचा ताशी वेगसुद्धा काढण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की काही हजारो वर्षांपूर्वी त्या आकाशगंगा आजच्या मानाने एकमेकांच्या खूप जवळ होत्या. कदाचित त्या हजारो वर्षांपूर्वी काही ग्रहांवर सारख्याच सजीवांना सारखेच पोषक असे वातावरणही असू शकेल व ते सजीवही त्यामुळे थोडेफार सारखेच दिसत असतील. त्यावेळच्या विज्ञानानुसार त्यावेळी अशी काही प्रगत अवकाशवाहनेही असू शकतील की जे ते कमी अंतर पार करून जवळच्या ग्रहावर वा परग्रहावर जाऊ शकत असतील. तशा वाहनांतून कदाचित त्यावेळचे काही स्वर्ग नाव असलेल्या एखाद्या परग्रहावरील ब्रह्मलोकातील, विष्णूलोकातील, कैलासलोकातील तुम्हा आम्हासमान मानव वा देव स्वग्रहसमान वातावरण असलेल्या एकमेकांच्या ग्रहावर जात असावेत म्हणजे तुमच्या पृथ्वीवर येत असावेत. आता राहिला प्रश्न आमच्या ग्रहावरील आमच्या सर्व सजीवांचा तुमच्या पृथ्वीवर येण्याचा. तर मी आत्ताच तुमच्यासमोर हजर असल्याप्रमाणे बाकीचेही तुमच्या पृथ्वीवर केव्हाही येऊ शकतात.” यक्ष सांगत होता.

“इतर परग्रहांवर अशी काही जीवसृष्टी असेल काय? असल्यास ती कशी असेल?” दीपाने पुन्हा प्रश्न केला.

“आता प्रश्न आहे, परग्रहावरील जीवसृष्टीचा.” यक्ष सांगू लागला, “तुमच्या व आमच्याही संशोधकांच्या मते आपल्याच आकाशगंगेत कोठेना कोठे काही परग्रहांवर थोड्या फार फरकाने तुमच्या आमच्या ग्रहांवरील सजीवांसारखेच सजीव असण्याची शक्यता आहे. कारण सजीवांसाठी आपल्या ग्रहांसारखे पोषक वातावरण असल्याशिवाय तेथे पूर्ण विकसित सजीव राहूच शकत नाही. फरक असलाच, तर तेथील वातावरणाच्या परिस्थितीनुसार असेल. जसे पृथ्वीवरील सजीवात कार्बन हा मुख्य घटक आहे. सर्व विविध रासायनिक पदार्थ जे शरीरपेशीत आहेत, ते कार्बन या मूलद्रव्याबरोबर अन्न द्रव्यांच्या झालेल्या संयोगामुळे झालेले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते कार्बनप्रमाणेच सिलिकॉनसुद्धा असा एक मूलद्रव्य आहे की ज्याची बारीक संयुगे होऊ शकतात. तेव्हा एखाद्या परग्रहावर कुठलातरी जीव कोळशाचा न बनता सिलिका म्हणजे रेती वा वाळूचाही बनला असेल.”

“पण ते सजीव आमच्यासारखे असतील का, तुमच्यासारखे असतील वा पूर्णपणे वेगळे असतील?” संदीपने विचारले.”

“परग्रहावर तुमच्या-आमच्यासारखेच बायामाणसेही तेथे असतील का वेगळे असतील? तेथील प्राणी, पक्षी आपल्या पशुपक्ष्यांसारखेच असतील का तेही निरनिराळे असतील? तेथील पाखरे, फुलपाखरे असेच मस्त उडत असतील का? तेथील वनस्पती, झाडेझुडपे कसे असतील? तेही आपल्या पृथ्वीवरील तरूवेलींसारखे हिरवे असतील का वेगवेगळ्या रंगाचे असतील? ते तर आपण काहीच सांगू शकत नाही. पण आपल्यासारखे प्राणी तेथे नसतील, तर आपणाहून थोड्या फार फरकाने वेगळ्या प्रकारचे असतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्याचे कारण प्रत्येक ग्रहावरचे भौगोलिक, भौतिक व आसमंतीय वातावरण नि पर्यावरण हे वेगवेगळे असते. त्यामुळे एखाद्या ग्रहावर सजीव असलेही तरी ते तेथील वातावरणानुसार वेगळेच असणार असे शास्त्रज्ञ म्हणतात. तो फरक देह, अवयव, रंग, रूप, उंची, आकाराचा नि ते आपल्यापेक्षा जास्त विकसित वा कमी प्रगत असण्याचाही राहील.” यक्षाने सांगितले.

यक्ष म्हणाला, “हो तसाही असू शकतो व शरीराच्या अंतर्गत द्रव्याचा म्हणजे रक्ताचा, आतील अवयवांच्या रचनेचा व बाह्यरचनेच्या रंग, रूप, उंची असा आकार इ. बाबतीतही भिन्नता असू शकते. एखाद्या ग्रहावर निळ्या रंगाचे आपल्यासारखे प्राणी तर दुस­ऱ्या एखाद्या ग्रहावर वनस्पतींसारखे हिरवे पशुपक्षी असू शकतील, तर तेथील सर्व वनस्पती लाल रंगाच्या असू शकतील. कदाचित एखाद्या ग्रहावर सर्व मानवासमान प्राण्यांना कायम शेपट्या असू शकतात किंवा प­ऱ्यांसारखे कायमस्वरूपी पंखही असू शकतात किंवा राक्षसांप्रमाणे शिंगेही असू शकतात, तर कुणाला कानच नसू शकतात, तर कुणाला डोकेही नसू शकते अशा प्रकारे. एखाद्या जलग्रहावर फक्त पाण्यात पोहणारेच वेगळ्या प्रकारचे सजीव असतील दुस­ऱ्या एखाद्या वायूग्रहावर केवळ हवेत तरंगणारेच विभिन्न सजीव असू शकतात. असो.” यक्ष पुढे म्हणाला “आता आपण तुमच्या ग्रहावर उतरत आहोत. तुम्हीही उतरण्यासाठी सज्ज राहा.”

यक्षाचे यान थांबले. यानाचा दरवाजा उघडल्या गेला. दीपा व संदीप हळूहळू यानातून खाली उतरले नि समोर बघतात, तर त्यांचे आजोबा होते. दोघेही बहीणभाऊ आजोबांसोबत जेवायला घरात गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -