इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्या पुढाकाराने पाटणा येथे भाजप विरोधकांची २३ जूनला बैठक झाली. काँग्रेसपासून उबाठा सेनेपर्यंत देशातील १५ राजकीय पक्षांचे ३२ नेते या बैठकीला उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केंद्रातील सत्तेवरून खाली खेचायचे आणि नरेंद्र मोदींना हटवायचे असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जे पक्ष काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात लढले, एवढेच नव्हे तर एकमेकांच्या विरोधातही लढले, ते मोदी हटावसाठी पाटणा येथे नितीश कुमार यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. बैठकीचा निचोड काय या प्रश्नाचे उत्तर शोधले, तर येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकच उमेदवार उभा करायचा, विरोधी पक्षांचे मत विभाजन होऊ नये, याची दक्षता घ्यायची व भाजपचा पराभव करायचा असे सांगण्यात आले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७ टक्के मते मिळाली म्हणजे ६३ टक्के मतदार हा भाजपच्या विरोधात आहे, असे गृहीत धरून विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजपचा पराभव करण्याचा हिशेब मांडण्यात आला. पाटण्याची बैठक म्हणजे विरोधकांचे एक सुंदर स्वप्नरंजन होते, असेच म्हणावे लागेल. कारण बैठकीनंतर आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसवर आगपाखड करायला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाढती जागतिक लोकप्रियता बघून विरोधी पक्षांची तारांबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींचा उल्लेख ‘विश्वगुरू’ किंवा ‘बॉस’ असा होत असल्याने विरोधकांची बोबडी वळली आहे. मोदी जिथे जातील त्या देशात अनिवासी भारतीयांकडून मोदींचे जल्लोशात होणारे स्वागत आणि मोदी-मोदी असा होणारा जयघोष ऐकून विरोधक धास्तावले आहेत. मोदींच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीचा कामाचा आलेख भाजपच्या वतीने देशभर आक्रमकपणे मांडला जातो आहे म्हणून विरोधक अस्वस्थ आहेत. देशभर वंदे भारत ट्रेनने क्रांती घडवली आहे. म्हणून विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यातच ईडी आणि सीबीआय व इन्कम टॅक्सकडून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना चाप लावले जात असल्याने काहींना घामटे फुटले आहे. सन २०२४ ला मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर राजकारणातून आपल्याला गाशा गुंडाळावा लागेल, अशी भीती अनेकांना वाटते आहे. म्हणूनच काहीही करू पण मोदी नकोत, या एकाच मुद्द्यावर विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला नितीश कुमार, ललन सिंह (जनता दल यू), राहुल गांधी, केसी वेणुगोपाल (काँग्रेस), ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), एम. के. स्टॅलिन, टी. आर. बालू
(द्रमुक), अरविंद केजरीवाल, भगवंत मान, संजय सिंह, राघव चड्डा (आम आदमी पक्ष), हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा), शरद पवार, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रस), लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, संजय झा (राजद), अखिलेश यादव (सपा), फिरहाद हकीम (एआयटीसी), उद्धव ठाकरे, संजय राऊत व आदित्य ठाकरे (उबाठा सेना), मेहबुबा मुफ्ती (पीडीपी), ओमर अब्दुल्ला
(नॅशनल कॉन्फरन्स), सीताराम येच्युरी (सीपीएम), डी. राजा (सीपीआय) अशा नेत्यांनी मुठी आवळून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार बोलून दाखवला. पुढील बैठक सीमला येथे जुलै महिन्यात घेण्याचे ठरले. बिहारमध्ये जनता दल यु आणि राजद म्हणजे नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांची सत्ता आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे. जिथे बिगर भाजप सरकार आहे. त्या राज्यात विरोधी पक्षांच्या ऐक्याची बैठक घेण्याचा खेळ पुढील काही महिने बघायला मिळेल.
नितीश कुमार हे सतत सत्तेच्या परिघात राहिलेले आहेत. कधी मुख्यमंत्री, तर कधी केंद्रात मंत्री. कधी भाजपच्या मदतीने तर कधी राजदचा हात धरून त्यांनी कायम सत्ता मिळवली आहे. आता त्यांना विरोधी पक्षांचे सर्वमान्य नेते व्हायचे आहे. थोडक्यात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. ज्या नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षासाठी बिहारमध्ये प्रचार केला आणि मुख्यमंत्रीपदावर बसवले त्याच मोदींना हटविण्यासाठी ते उतावीळ झाले आहेत. पाटण्यातील बैठकीनंतर सोशल मीडियावर पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या १९ नेत्यांचा या बैठकीत सहभाग होता, अशा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मोदींनंतर आपणच अशा आविर्भावात अनेक विरोधी नेते वावरताना दिसत आहेत. भाजपच्या विरोधात देशात एकास एक लढत द्यावी, अशी चर्चा पाटण्याच्या बैठकीत झाली. पण बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले – विरोधकांची महाआघाडी ही दिल्लीत असेल. पश्चिम बंगाल संभाळायला आम्ही समर्थ आहोत. भाजपच्या विरोधात महाआघाडी बनविण्याची भाषा पाटणा येथील बैठकीत करतात, मग पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तृणमूल काँग्रेसच्या विरोधात एकत्र येण्याची भाषा का करतात? काँग्रेस आणि डावे पक्षच विरोधकांच्या ऐक्यात बाधा निर्माण करीत आहेत…. पश्चिम बंगालमध्ये पंचायत राज निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एका प्रचार सभेत ममतादीदी म्हणतात-पश्चिम बंगाल आम्हीच बघणार. येथे (विरोधकांची) अपवित्र आघाडी आम्ही होऊ देणार नाही. पश्चिम बंगालमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट, काँग्रेस आणि भाजप या सर्वांना हटवण्याचा निर्धार करा…. इथे फक्त तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर बटण दाबा.… बंगालबाबत आम्ही कोणाशीही समझोता करणार नाही. पंचायतपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत फक्त आमचेच चालेल….
दिल्ली राज्याच्या कार्यक्षेत्रात नोकरशहा व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारला (केजरीवाल सरकारला) आहेत, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यानंतर लगेचच केंद्राने अध्यादेश काढून हे अधिकार नायब राज्यपालांना बहाल केले. यावरून केजरीवाल व त्यांच्या पक्षाचा गेले महिनाभर थयथयाट चालू आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हा अध्यादेश संसदेच्या पटलावर मंजुरीसाठी सरकारतर्फे मांडण्यात येईल, तेव्हा त्याला सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध करावा व अध्यादेश फेटाळून लावावा यासाठी केजरीवाल व त्यांचे सहकारी सर्व विरोधी पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत. भाजप व काँग्रेस हे दोन्ही आपचे कट्टर शत्रू. या दोन्ही पक्षांचा केजरीवाल यांनी दिल्लीतून विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव केला. मग ते कशाला ‘आप’ला मदत करतील? दिल्लीचे काँग्रेसचे नेते अजय माकन म्हणतात, दिल्ली अध्यादेशाला विरोध करण्यासाठी केजरीवाल काँग्रेसकडे समर्थन मागत आहेत व दुसरीकडे काँग्रेसविरोधी भाषा सतत बोलत आहेत. राजस्थानात जाऊन तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या अशोक गेहलोत यांच्याही ते विरोधात बोलतात.… काँग्रेस दिल्ली अध्यादेशाला विरोध करणार नसेल, तर आम्ही विरोधी पक्षांच्या बैठकीला कशाला हजर राहायचे? असा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला आहे. ‘मैं नफरत कीं बाजार में मुहब्बत की दुकान खोलकर बैठा हूं’ असे राहुल गांधी सतत म्हणत असतात. मग दिल्लीच्या प्रश्नावर ‘आप’ला का सहकार्य करीत नाहीत? असा केजरीवाल यांचा प्रश्न आहे.
अध्यादेश हा संसदेच्या अधिवेशनात येतो, तेव्हा तिथे विचार करायचा असतो, बाहेर नव्हे, असे मल्लिकार्जून खरगे यांनी सांगून केजरीवाल यांना फटकारले आहे. मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी हे पाटण्यातील बैठकीला होते पण केरळमध्ये त्यांची सत्ता आहे. केरळ पोलिसांनी सुधाकरन या प्रदेश काँग्रेस नेत्याला अटक केली, यावरून काँग्रेसने सीपीएम विरोधात रान उठवले आहे. राहुल गांधी यांनी तर, सुडाच्या राजकारणाला आम्ही कधीच घाबरत नाही, असे ट्वीट केले आहे. ओमर अब्दुला व मेहबुवा मुफ्ती यांची नाराजी आणखी वेगळी आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांचे ऐक्य हवे, पण मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला दिलेला ३७० कलमाचा विशेषाधिकार रद्द केला व या राज्याचे विभाजन केले तेव्हा पाटणा येथे जमलेले विरोधी पक्ष कुठे होते, असा प्रश्न ते विचारत आहेत.