Friday, December 13, 2024

Discipline: शिस्त

  • कथा : रमेश तांबे

रवीने आईला न सांगताच पिझ्झा मागवला. रवी पिझ्झ्याचा तुकडा तोंडात घालणार तोच आई ओरडली, ‘उठा ताटावरून कुणालाही जेवायला मिळणार नाही.’

आईने आज जेवणासाठी कोबीची भाजी आणि कडव्या वालाची आमटी बनवली होती. सोबत नेहमीची डाळ, भात, चपाती होतीच. हे असले जेवण बघून रवीने आईसमोरच नाक मुरडले. अन् म्हणाला, ‘आई मी नाही खाणार कोबी अन् ते कडवे वाल! कोबी काय भाजी आहे, किती वास येतो! अन् कडवे वाल त्यांच्या नावातच कडवटपणा आहे. मला नको काही मी मस्त पिझ्झा मागवतो.’ आईने नको नको म्हणत असतानाही रवीने आईच्या मोबाइलवरून पिझ्झा मागवला. आईला रवीचा हा हट्टीपणा अजिबात आवडला नाही. तिने थोडी नाराजी दाखवली, पण रवी तोपर्यंत आनंदाने उड्या मारत घराबाहेर खेळायला देखील गेला!

स्वयंपाक घरात आई काम करत करत रवीच्या हट्टीपणाविषयी विचार करीत होती. हे नाही आवडत, ते नाही आवडत. मी नाही खाणार, हे असं रोजच चालू होतं. शिवाय परवानगी न घेताच त्याने मोबाइलवरून पिझ्झा मागवणं हे तर त्याहूनही गंभीर होतं. असले प्रकार आताच रोखले नाही, तर रवीला वळण लावणं कठीण होईल, हे आई जाणून होती.

एक तासानंतर रवी घरात आला. अजून पिझ्झा आला नव्हता म्हणून तो आईकडे गेला अन् म्हणाला, ‘हे काय आई अजून तुम्ही जेवला नाहीत?’ खरं तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. रवीचे बाबा, ताई सारे जेवणाची वाट पाहत होते, पण का कुणास ठाऊक आईने अजून ताटंच मांडली नव्हती! रवीचा पिझ्झा येताच आईने ताटांची मांडामांड केली. आई, बाबा, ताई सारे जेवणासाठी खाली बसले. पण, आईने जेवण वाढलेच नाही. रवी आपला पिझ्झा उघडून बसला होता. कधी एकदा खायला सुरुवात करतो, असं त्याला झालं होतं. पण, आई तशीच बसून राहिली. ना बाबांना, ना ताईला कुणालाच तिने जेवायला वाढले नाही. आता रवी पिझ्झ्याचा एक तुकडा तोडून तोंडात घालणार तोच आई बाबांवर ओरडली, ‘उठा ताटावरून कुणालाही आज जेवायला मिळणार नाही.’ तसे ताई, बाबा दोघेही मुकाट्याने ताटावरून उठले अन् आपापल्या रूममध्ये गेले. आईसुद्धा जेवणाची भांडी झाकून तिथून उठून गेली.

हा सगळा प्रकार रवीच्या डोक्यात शिरेना. आई असं का वागते. ती बाबांना जेवण देत नाही म्हणून रवी पिझ्झा खायचा थांबला. तो उठला अन् किचनमध्ये गेला अन् आईला म्हणाला, ‘काय गं आई, काय झालं? तू बाबांना अन् ताईला जेवायला का देत नाहीस. शिवाय तूही जेवत नाहीस.’ पण, आई रवीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता आपले काम करीत राहिली. घरातले वातावरण एकदम गंभीर बनले होते. समोर गरमागरम पिझ्झा असूनही त्याचा रवीला आनंद घेता येत नव्हता.

थोड्या वेळानंतर आई म्हणाली, ‘तू खा पिझ्झा, आम्हाला कुणाला भूक नाही.’ आता रवी खूपच गोंधळात पडला. काय करावे, खाऊन घ्यावे की तसेच बसून राहावे. पिझ्झा हळूहळू गार पडत होता अन् घरातले वातावरण गरम! रवीच्या लक्षात आले. आई रागावली आहे. आपण तिला न विचारता पिझ्झा मागवला. ‘बाळ तू खाऊन घे. तुला भूक लागली असेल,’ रवीकडे न बघताच आई पुन्हा म्हणाली. आता रवी बाबांकडे गेला. तर बाबा गादीवर पडून छताकडे एकटक बघत होते. रवी आत आल्याचे त्यांना कळाले पण त्यांनी दुर्लक्षच केले. ताई कसलेसे पुस्तक वाचत बसली होती. रवी ताईला म्हणाला, ‘तुम्ही जेवत का नाहीत.’ ‘आम्हाला कुणालाही भूक नाही. तू घे खाऊन’ ताई रवीला म्हणाली. आता मात्र यश घाबरला. तो धावतच आईकडे गेला अन् तिला मिठी मारून म्हणाला, ‘आई चुकलो मी, नाही खाणार आजपासून पिझ्झा. तुला विचारल्याशिवाय काहीही मागवणार नाही.’ असं म्हणून तो मोठमोठ्याने रडू लागला. रडता रडता आई बोल ना माझ्याशी असं म्हणू लागला. आई आपल्याकडे बघत नाही, असं वाटल्याने जवळच ठेवलेला पिझ्झा त्याने उचलला अन् कचऱ्याच्या डब्यात टाकू लागला. तोच त्याचा हात पकडत आई म्हणाली, ‘अरे वेडा आहेस का? असं कचऱ्यात टाकतात का कधी खायचे पदार्थ!’ आता आईचा राग कुठल्याकुठे पळून गेला होता. रवीला पोटाशी धरत ती म्हणाली, ‘रवी यापुढे शहाण्यासारखं वागायचं हं.’ मग आईने ताईला पिझ्झा गरम करायला सांगितला. नंतर सर्वांनी एकत्र बसून जेवण घेतले. अन् गरमागरम पिझ्झादेखील खाल्ला. रवीला मात्र आजच्या पिझ्झ्याची चव फारच वेगळी अन् हवीहवीशी वाटत होती…! कारण त्या पिझ्झ्याला आईच्या रागाचा अन् मायेचा गंध येत होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -