पुणे : पुण्यात एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज पाहून हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ही घटना शिक्रापूर येथे घडली.
जॉय लोबो असे मृताचे नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो व ॲग्नेल कसबे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबो यांचा १७ वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी असून तिचे ॲग्नैल कसबे याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. जॉय लोबो यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. यामुळे त्यांचा मुलीशी व पत्नीशी नेहमी वाद होत होता.
मुलीचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी तसेच स्वतःच्या प्रेम संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी सॅन्ड्रा हिने मुलीचा प्रियकर कसबे याच्या मदतीने पतीला संपवले. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला.
याप्रकरणी पोलिसांनी तब्बल २३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत दोघांना अटक केली आहे.
जॅाय लोबो यांनी काही दिवसापूर्वी पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. त्यावरून जॉय लोबो याचा तिघांनी मिळून घरात चाकूने खून केला आणि एक दिवस घरातच मृतदेह ठेऊन दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला.
पतीचा खून करण्यापूर्वी या माय-लेकीने अनेक क्राईम वेब सिरीज बघून काढल्या होत्या. पतीचा खून केल्यावरही नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून रोज त्याच्या फोनवरून त्याची पत्नी स्टेटस अपडेट करत होती.