नाशिक : ‘सामना’ वृत्तपत्रात आज छापून आलेल्या अग्रलेखावर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे वाटते का, असा खडा सवाल त्यांनी केला आहे. तुमचं जेवढं काही आयुष्य असेल तेवढं शरद पवार यांचं राजकारण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला. अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे.
यावर छगन भुजबळ म्हणाले, “आता संपादक म्हणजे संजय राऊतच हे सर्व लिहित आहेत हे आम्हांला माहित आहे. त्यांना हे सगळे उकळून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असं त्यांना वाटतं का?”
“संजय राऊत हे कोणाकोणाच्या घरात गेले होते, आणि कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहित. एवढं लक्ष त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बॅगांवर ठेवलं असतं तर आज बाहेर बसण्याची परिस्थिती आली नसती”, अशी सडेतोड टीका भुजबळांनी केली आहे.