Monday, April 27, 2026

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Agriculture Minister Dattatray Bharne :

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

बियाणे उत्पादक संस्था व विक्रेते यांची खरीप हंगाम पूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा

पुणे : "बियाणे उत्पादक कंपन्या व विक्रेते यांनी शेतक-यांना दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण बियाणे उपल्बध करुन द्यावेत, या खरीप हंगामापासून पहिल्यांदाच बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार आहे.तसेच बियाणे कायदा व बियाणे नियंत्रण आदेशांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा शेतक-यांच्या हितासाठी बनावट व निकृष्ट बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. तसेच बियाण्यांची नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक करण्यात आला असून, बियाणे उत्पादक ते शेतकरी या संपूर्ण प्रक्रियेत बियाण्यांची नोंद डिजिटल साखळीच्या स्वरूपात करण्यात येणार आहे. शेतकरी हित हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

आज पुणे येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या डॉ.शिरनामे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बियाणे उत्पादक संस्था व विक्रेते यांच्या खरीप हंगाम पूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेत आगामी हंगामासाठीची पूर्वतयारी, बियाण्यांचे नियोजन, उपलब्धता व वितरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदा संभाव्य एल निनो पार्श्वभूमीवर पाण्याचा ताण सहन करणारे व कमी कालावधीतील वाढणारे वाण उपलब्ध करुन द्यावेत. तसेच जिल्हानिहाय पीक नियोजन मजबूत करुन जर पेरणी ऊशीरा झाली तर पर्यायी पीक नियोजन तयार करा अशा सुचनाही कृषी मंत्र्यांनी विभागाला दिल्या. याप्रसंगी कृषी राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद महासंचालक राहुल रंजन महिवाल,संचालक रफिक नाईकवाडी, संचालक सुनिल बोरकर, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बियाणे उत्पादक संस्था व विक्रेते यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुढे बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यात येईल. गुणवत्तापूर्ण बियाण्यांमुळे उत्पादनात साधारणतः १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, हे लक्षात घेता प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांची शंभर टक्के उपलब्धता असल्याची खात्री करणं आवश्यक आहे. राज्यात यंदा १४५.२० लाख हेक्टर पेरणी क्षेत्र अपेक्षित असून, त्यानुसार पिकनिहाय बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, खरीप २०२६ साठी राज्याची एकूण बियाणे गरज २०.१६ लाख क्विंटल इतकी असून, सध्या सुमारे २८.१४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. म्हणजेच गरजेच्या सुमारे १४० टक्के साठा उपलब्ध असून बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत राज्य मजबूत स्थितीत आहे."

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “बियाण्यांची उपलब्धता समाधानकारक असली तरी ती योग्य वेळी आणि योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. गुणवत्ता, वेळेवर वितरण आणि पारदर्शकता यावर विशेष भर देणे गरजेचे आहे.”

केंद्र शासनाच्या ‘साथी’ पोर्टलच्या माध्यमातून बियाणे व्यवस्थापन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. लॉटनिहाय ट्रॅकिंग, सुलभ विक्री प्रक्रिया, ERP एकत्रीकरण, फार्मर आयडी आधारित माहिती आणि “SATHI-Sale Easy” मोबाईल अॅप यांसारख्या सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

साथी प्रणाली म्हणजे बियाण्यांचा संपूर्ण हिशोब ठेवणारी व्यवस्था आहे. बियाणे कुठं तयार झालं, कुठं गेलं, कोणाला विकलं, सगळं पारदर्शक! म्हणजे आता शेतातून शेतकऱ्यापर्यंत सगळं ट्रॅक करता येतं. त्यामुळे सर्व उत्पादक, पुरवठादार व विक्रेते यांनी सदर प्रणालीचा सक्रीय वापर करावा अशा सुचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

कार्यशाळेत बियाणे उत्पादक, विक्रेते आणि विविध संघटनांच्या सहभागातून समन्वय वाढवणे, अंमलबजावणीतील अडचणी सोडवणे आणि गावपातळीवर वेळेत बियाणे उपलब्धता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला.

राज्य शासनाने बियाणे पुरवठा साखळी बळकट करणे, हवामान बदलास अनुरूप शेतीला चालना देणे आणि डिजिटल प्रणालींचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

“योग्य बियाणे, योग्य वेळी शेतकऱ्यापर्यंत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन ही कृषी मंत्री यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >