Monday, January 20, 2025
Homeताज्या घडामोडीपुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: नगरविकास विभागाने केंद्र शासनाकडे पाठविलेल्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असून डबल इंजिन सरकार असल्याने त्याचा फायदा होतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करावे आणि आपल्या कारकीर्दीची छाप शहर विकासावर सोडावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील महापालिका आयुक्त, नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना केले.

आज सभागृहात नगरविकास दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले यंदा नगरविकास विभागाने घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांना देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्याचा उपयोग शहराच्या सुशोभीकरणासाठी योग्य पद्धतीने करावा. शहरांची स्वच्छता करताना लोकसहभाग वाढव.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. शहरांचा विकास करताना कल्पकता आणि अंमलबजावणी यांचा समन्वय योग्य प्रमाणात झाला पाहिजे.

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल

यावेळी शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहा वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. यामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तसेच पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अहमदनगर महानगरपालिका यांना पारितोषिक देण्यात आली.

तर नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, उमरखेड नगरपरिषद व हिंगोली नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद, पवनी नगरपरिषद व सोनपेठ नगरपरिषद यांना पारितोषिके देण्यात आली. नगरपंचायत गटामध्ये मौदा नगरपंचायत व देवरुख नगरपंचायत,देवळा (नाशिक) नगरपंचायत व बाभुळगाव नगरपंचायत यांना पारितोषिके देण्यात आली.

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ५ गटातील प्रत्येकी ३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -