Monday, May 6, 2024
Homeदेशसंसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर १९ पक्ष ठाम!

संसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर १९ पक्ष ठाम!

नवी दिल्ली : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या २८ तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी यांनी उद्घाटन करण्यावरुन वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे की त्या या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. त्यांनी सांगितले की या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते झाले पाहिजे. आम आदमी पक्षानेही बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनीच संसद भवनाचे उद्घाटन करावे असे म्हटले होते. त्यानंतर आता अशी माहिती मिळत आहे की काँग्रेसनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नव्या संसद भवनाची गरज होती का, देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावलण्यात आले. एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो २८ तारखेला कार्यक्रम आहे. त्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांनी निर्णय घेतला आहे की आम्ही त्या सोहळ्यावर बहिष्कार टाकू. तसेच राष्ट्रपतींना का डावलले याचे उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाही, असे पक्ष प्रवक्त्याने म्हटले आहे.

दरम्यान, विरोधकांनी बहिष्काराचा निर्णय घेतला असला तरी दुसरीकडे भाजपही आक्रमक झाला आहे. पंतप्रधान सरकारचे नेतृत्व करतात. ते सदनाचा घटक आहेत. राष्ट्रपती मात्र सदनाच्या घटक नाहीत, असे पार्टीने म्हटले आहे.

दरम्यान, संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. येथे अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

२८ तारखेचा ‘योगायोग’ की ‘मास्टरस्ट्रोक’

तसे पाहिले तर भाजप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेहमीच एका नायकाच्या रुपात मानत आला आहे. भाजप राष्ट्रवादासह हिंदुत्वाला सोबत घेत राजकारणात आपली पकड घट्ट करत आहे. अशा वेळी सावरकर भाजपला जास्त फायदेशीर ठरतात. भाजपाच्या काही नेत्यांनी तर सावरकरांना भारतरत्न देण्याचीही मागणी केली आहे. सावरकरांच्या जयंती दिनीच संसद भवनाचे उद्घाटन करून भाजप सावरकरांना पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या रणनितीवर राहुल गांधी आणि काँग्रेसने सणसणीत उत्तर दिले पाहिजे, अशीही राजकीय वर्तूळात चर्चा सुरु आहे.

१९ पक्षांचा बहिष्कार

संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोध वाढत चालला आहे. आतापर्यंत १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या पक्षांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जनता दल (युनायटेड), राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), समाजवादी पार्टी, राजद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फ्रेन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिवोल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथिगल, कच्ची, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कडगम, राष्ट्रीय लोकदल या पक्षांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -