अनुराधा दीक्षित

तुम्ही पूर्वी कधी वि. स. खांडेकरांची ‘दोन ढग’ कथा वाचली किंवा ऐकलीय का? असेल तर उत्तम. नसेल तर सांगते. आकाशात एकदा पांढरा आणि काळा ढग समोरासमोर आला. काळा ढग पाण्यामुळे जड झाला होता. तो खाली खाली चालला होता. पांढऱ्याने कुत्सितपणे त्याला वाचारलं, “कुठे चाललास?” “तापलेल्या पृथ्वीला शांत करायला.” काळ्याचं उत्तर. काळ्याने पांढऱ्याला विचारलं, “तू कुठे चाललास?” थोड्या आखडूपणाने पांढरा म्हणाला, “मी तर स्वर्गाकडे चाललोय!” तो स्वर्गाच्या दाराजवळ पोहोचला. तिथे द्वारपालाने त्याला अडवलं. ढगाने कारण विचारलं. द्वारपाल म्हणाला, “तिथे एकच जागा रिकामी होती. ती आताच भरली!” पांढऱ्याने रागाने विचारलं, “कोणाला मिळाली ती जागा?” द्वारपाल म्हणाला, “काळ्या ढगाला! त्याने आपलं सर्वस्व तापलेल्या पृथ्वीला शांत करण्यासाठी अर्पण केलं. त्याच्या परोपकाराच्या पुण्यामुळे काळ्या ढगाला ती जागा मिळाली!” म्हणून दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा जगतो! जो असं करीत नाही, त्याचं जीवन व्यर्थ होय!

ही रूपक कथा असली, तरी माणसांची प्रवृत्ती दाखवणारी आहे. दिसायला गोरीगोमटी असलेल्या माणसांचं अंतरंग गोरं असेलच असं नाही. उलट एखाद्या झोपडीत राहून चटणी भाकर खाणाऱ्या गरिबाकडे माणुसकीची श्रीमंती दिसते. तेच जगणं खरं जगणं आहे. भारतीय तत्त्वज्ञान सांगते, “पोट भरलेलं असतानाही खाणं ही विकृती, भूक लागल्यावर खाणं ही प्रवृत्ती आहे, तर भुकेल्याला आपल्या घासातला घास काढून देणं ही संस्कृती आहे!” अर्थात ह्या गोष्टी कुणी शिकवून समजत नाहीत, तर त्या संस्कारामुळे आपल्या अंगी बाणत असतात.

एकदा मी आणि माझी बहीण माझ्या एका नातेवाइकांकडे गेलो होतो. काही कामानिमित्त. तिथे नातेवाइकांची मुलगी आणि तिची लांबची बहीण होती. आम्ही गेल्यावर घरच्या बाईने पाणी आणून दिलं. आम्ही सोफ्यावर बसून त्यांच्याशी कामासंबंधी बोलत होतो. तेवढ्यात घरातल्या दोन्ही मुली… कॉलेजकन्यका हातात बाऊल घेऊन आल्या आणि हसत-खिदळत त्यातील आईस्क्रीम खाऊ लागल्या. त्या दोघी आम्हाला ओळखत होत्या. तरी त्यांचं आमच्याकडे लक्ष न देता त्यांचं भरपेट आईस्क्रीम खाणं चालू होतं. मी आणि माझी बहीण एकमेकींकडे सूचकपणे पाहिलं. पण त्या घरातल्या माऊलीला आपल्या मुलीला सुचवावंसंही वाटलं नाही की, घरी आलेल्या पाहुण्यांनाही “तुम्ही खाणार का आईस्क्रीम?”
असं विचारावं.

आम्हाला तिथे संकोचल्यासारखं वाटलं. आम्ही काही तरी कारण सांगून तिथून उठलो आणि बाहेर पडलो. नंतर काही दिवसांनी कळलं की, त्या घरातल्या मुलीचा वाढदिवस होता, म्हणून घरात आईस्क्रीम केलं होतं. नंतर म्हणे त्या मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी करण्यासाठी जाणार होत्या! आम्ही काही त्या आईस्क्रीमसाठी हपापलेल्या नव्हतो. पण आई-बापांचे आपल्या मुलांवर करायचे राहून गेलेले संस्कार मात्र दिसले. त्याउलट आणखी एक घडलेली हकिकत मात्र कायमची लक्षात राहिली आणि आजही न पाहिलेल्या तिच्याबद्दल मनात आदराची भावना निर्माण झाली. कोरोनाच्या काळात अचानक लॉकडाऊन झालं. सारे व्यवहार ठप्प झाले. लोकांचे कसे आणि कोणकोणत्या प्रकारचे हाल झाले याच्या अनेक कथा आपण ऐकल्या. त्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळण्याची सोय होती. मृत्यूचं थैमान चालू होतं. लोक हवालदिल होऊन अर्धपोटी, उपाशीपोटी राहूनही आला दिवस कसातरी ढकलत होते. अशातच काही स्वयंसेवी संस्था पुढे होऊन गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य वगैरे गोळा करून त्यांना घरपोच करीत होते. अर्थात हे सारं कोरोनाचे सारे नियम पाळूनच चाललं होतं. अशातच मला माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडून तिच्या एका बहिणीची हकिकत कळली.

दीपा मुंबईत एका चाळीत राहात होती. नवरा एका कंपनीत नोकरी करत होता. पण कोरोनामुळे आता नोकरी गेली होती. हातावरचं पोट. घरात थोडंसं धान्य म्हणजे तांदूळ होते. आणखी काही दिवसांनी तेही संपणार होते. कठीण परिस्थिती होती. हे ऐकून मन अस्वस्थ झालं. मी मैत्रिणीकडून तिच्या बहिणीचा फोन नंबर आणि पत्ताही घेतला. त्या सेवाभावी संस्थेत काम करणारे काही लोक माझ्या ओळखीचे होते. त्यांच्याशी संपर्क साधला. दीपाची सगळी हकिकत सांगितली. त्यांना मदतीची आवश्यकता सांगितली. संबंधित ओळखीच्या दादांनी थोड्याच वेळात तिच्या घरी मदत पोहोचवतो म्हणून सांगितलं.

मी माझ्या मैत्रिणीला ती सगळी माहिती दिली. तिला बहिणीला फोन करून आणखी काही मदत हवी असल्यास नि:संकोचपणे सांगण्यासाठी कळवलं. मला संध्याकाळी मैत्रिणीचा फोन आला. तिने अगदी उत्साहाने मी सांगितलेल्या संस्थेचे लोक बहिणीच्या घरी येऊन गेल्याचं सांगितलं. मला खूप समाधान वाटलं. पण पुढे माझी मैत्रीण जे बोलली त्यामुळे मी अवाक् झाले. दीपाने सांगितलं, “तिच्याकडे मदत पोचवायला लोक आले होते. त्यांनी महिनाभर पुरेल एवढं धान्य व इतर सामान दिलं होतं. पण तिनं ते घेतलं नाही. उलट आपल्या समोरच्या खोलीत राहणारे लोक गेले चार दिवस उपाशी आहेत. त्यांच्याकडे तिने त्या लोकांना मदत द्यायला सांगितली. त्यांच्या घरात माणसंही जास्त होती.” तिचं हे उत्तर ऐकून माझ्याच डोळ्यांत पाणी आलं. गरिबीतही किती स्वाभिमान आणि केवढी माणुसकी!