Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेस्मार्ट सिटीत वाहतुकीचा खोळंबा

स्मार्ट सिटीत वाहतुकीचा खोळंबा

खोदलेल्या अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी

ठाणे (प्रतिनिधी) : स्मार्ट सिटीच्या नावाने डंका वाजवत असलेल्या ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट तर अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहेत. ठाणे शहराच्या दादोजी कोंडदेव परिसरात भूमिगत गटारांचे काम अनेक दिवस सुरू असल्याने त्या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी असते.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर देखील कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे नागरिकांचा संताप होत आहे. काम संथ गतीने सुरू असून कासवाच्या गतीने कामे होत असताना प्रशासन काय करत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. मागील तीन वर्षांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा ठाणेकर सामना करत आहेत.

ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच परिसरात विकासकामांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर खोदकामे सुरू केल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. महापालिकेने तीन हात नाका, देवदयानगर, किसननगर, सावरकरनगर, ढोकाळी, नितीन कंपनी सेवा रस्ता, गोकुळनगर या भागांत रस्ते दुरुस्ती तसेच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे एकाच वेळी हाती घेत येथील रस्ते अर्धे किंवा पूर्णत: खोदले आहेत. ही कामे संथगतीने सुरू असून लोकप्रतिनिधी अथवा आयुक्तांच्या आदेशानंतरही या कामांचा वेग वाढत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

ठाणे शहरात पावसाळ्यामध्ये गेल्या वर्षी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. हे करत असताना महापालिकेच्या नियोजनाचा सावळागोंधळ जागोजागी दिसू लागला असून यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाचे रस्ते, मार्ग अंशत: अथवा पूर्णपणे बंद होत असल्याने ती कामे आता आवरा, अशा प्रतिक्रिया आता नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत.

देवदयानगर येथेही दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या निवासस्थानापासून एक रस्ता खणण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी उपवन तलावाचा सुमारे दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. सावरकरनगर येथेही कामगार रुग्णालय ते सावरकरनगरच्या दिशेने जाणारा रस्ता खणण्यात आला असून येथील वाहतूक एकेरी मार्गाने होते आहे. या ठिकाणी सायंकाळ होताच मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली असून नितीन कंपनी येथून वागळे इस्टेटच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -