Sunday, May 5, 2024
Homeकोकणरायगडमुरुडच्या मच्छीमारांना अखेरच्या सीझनमध्ये कोळंबीचा जॅकपॉट

मुरुडच्या मच्छीमारांना अखेरच्या सीझनमध्ये कोळंबीचा जॅकपॉट

मोठ्या मासळीच्या दुष्काळात आशेचा किरण...

संतोष रांजणकर

मुरुड : समुद्रात मोठ्या मासळीच्या दुष्काळामुळे मुरुड तालुक्यातील ७० टक्के मोठ्या नौका १ जूनपूर्वीच किनाऱ्यावर लॉकडाऊन करण्यात आलेल्या आहेत. मात्र एकदरा येथील ३० टक्के छोट्या नौका काहीतरी चांगली मासळी मिळेल या अपेक्षेने किनाऱ्याजवळ उथळ समुद्रात मासेमारी करीत असतात. तथापि, अखेरच्या सीझनमध्ये त्यांची ही अपेक्षा सफल झाली, असे गेल्या ४ दिवसांत दिसून येत आहे.

एकदरा परिसरातील नौकांना मुरुडसमोरील समुद्रात पद्मजलदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात कोलंबी मासळी मिळू लागल्याने मासळी दुष्काळाच्या व आर्थिक चणचणीच्या दिवसांत आशेचा मोठा किरण गवसल्याचे दिसून येत आहे. ‘एकदरा महादेव कोळी समाज’चे अध्यक्ष पांडुरंग आगरकर, मुरुड महादेव कोळी समाज अध्यक्ष आणि रायगड मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘मासळीच्या दुष्काळाने होरपळलेल्या छोट्या मच्छीमारांना कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने एक प्रकारे अचानक जॅकपॉट लागला आहे’.

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून एकदरा येथील ३० ते ४० छोट्या २ सिलिंडर्सवाल्या नौका दिवसात २ ते ३ वेळा कोळंबीच्या मासेमारीसाठी जाताना दिसून येत आहेत. कोळंबी, मांदेली अशी छोटी मासळी मिळत असल्याने कोळंबीचे सोडे काढण्यासाठी कोळी भगिनींची मोठी लगबग सुरू असल्याचे एकदरा येथील मच्छीमार रोहन निशानदार यांनी सांगितले. अशी मासेमारी दिवसा – रात्री दोन वेळा केली जाते असे सांगून रोहन निशानदार म्हणाले की, सध्या कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने कातळावर सुकविलेल्या सोड्याचा भाव रुपये १७००/- (सतराशे) असून हे भाव आवाक्यात येत असल्याचे दिसत आहेत.

ओल्या कोळंबीचा साधारण १ किलो टोपलीचा प्रतवारीप्रमाणे भाव २००/- ते ३००/- रु. असून टायनी, चैती अशा प्रकारातील ही लाल कोळंबी आहे. पावसाळा येत असल्याने नागरिक आणि पर्यटकांकडून कोळंबी सोड्यांना मोठी मागणी दिसत आहे. त्यामुळे कोळंबीची आवक वाढणे म्हणजे एकदरा येथील मच्छीमारांसाठी पावसाळी दिवसांत उदरनिर्वाहासाठी आशेचा किरण ठरू शकतो. वादळी पावसाची शक्यता असल्याने हे छोटे मच्छीमार कोळंबीची जलद आणि जास्तीत जास्त मासेमारी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

रावस, सुरमई, घोळ, कुपा, पापलेट, पाला अशी मासळी समुद्रात मिळेनाशी झाल्याने ६ सिलेंडर्सवाल्या मोठ्या नौका मे महिन्याच्या सुरुवातीला किनाऱ्यावर ओढण्यात आल्याने मार्केटमध्ये ही बाहेरगावांतून येणारी मोठी मासळी ३० टक्के प्रमाणात दिसून येत असून त्यांचे भाव देखील परवडणारे नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा, नागरिकांचा हिरमोड झलेला दिसून येतो. गेल्या ३ ते ४ वर्षांत मासळीच्या दुष्काळाचे हे संकट या वर्षी आधिक गडद झाल्याने मच्छीमार मोठ्या प्रमाणात होरपळला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये शासनाने मच्चीमारांच्या मागे ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे, अशी मागणी रायगड मच्छिमार कृती संघाचे अध्यक्ष मनोहर बैले, मुरूड तालुका कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर, राज्य मच्छिमार संघाचे संचालक विजय गिदी यांनी केली आहे. सध्या मुरूड तालुक्यात पाऊस सदृश ढगाळ वातावरण आहे.

मार्केटमध्ये राजपुरीचा जवळा…

मुरुडपासून ४ किमीवर असणाऱ्या राजपुरी येथील समुद्रकिनारी कोलीम म्हणजे जवळा मिळायला लागला असून मुरुडच्या मार्केटमध्ये तो विक्रीस येत आहे. राजपुरी येथील कोळी महिला याची विक्री ५०/- रुपयाला दोन वाटे याप्रमाणे करताना दिसत आहेत. सुकी मासळी खरेदीसाठी देखील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा कल दिसत आहे. राजपुरी येथील जवळा खूप चविष्ट असल्याने मागणी वाढती आहे. फ्राय जवळा रेसिपी ही ग्रामीण भागात लोकप्रिय असून आता पुणे, मुंबईतील पर्यटकांच्या पसंतीसही ती हळूहळू उतरू लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -