Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महापालिका उभारणार जलशुद्धीकरण केंद्र

ठाणे महापालिका उभारणार जलशुद्धीकरण केंद्र

साडेसहा कोटींचा खर्च, जागेचा शोध सुरू

ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या १० एमएलडी अतिरिक्त पाण्यावर स्वतःच प्रक्रिया करण्याचा निर्णय अखेर ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी ठाणे महापालिकाच जलशुद्धिकरण प्लांट उभारणार असून यासाठी अंदाजे साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या जलशुद्धिकरण केंद्रासाठी वागळे पट्यात जागा शोधण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून ही जागा अंतिम झाल्यास साधारणतः तीन ते चार महिन्यात हे जलशुद्धिकरण केंद्र बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर झाला आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच, मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे.

मात्र हे पाणी प्रक्रिया न केलेले असल्याने या पाण्याचा वापर करणे अशक्य झाले होते. तानसा धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी मिळत असल्याने अशा प्रकारची अडचण आली नव्हती. मात्र हे पाणी वैतरणा धरणातून मिळणार असल्याने प्रक्रिया न केलेले पाणी मिळणार असून पावसाळ्यात अधिक दूषित पाणी येण्याची शक्यता पालिका प्रशासनातर्फे वर्तवण्यात आली होती.

पालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ द.ल. लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबई पालिकेकडून मिळणाऱ्या अतिरिक्त १० एमएलडी पाण्यासाठी ठाणे पालिकेला १ कोटी ७० लाख रुपयांची अनामत रक्कम मुंबई महापालिकेकडे जमा करावी लागणार असून तशी प्रक्रीया पालिकेने सुरू केली आहे. या पाण्याचे वितरण प्रमुख्याने वागळे इस्टेट परिसरात करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे; परंतु प्रक्रियाविनाच मिळणारे पाणी नागरिकांना देणे योग्य नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

पालिकेने आता वागळे इस्टेट परिसरात जलशुद्धिकरण प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला आहे. जय भवानीनगर परिसरात एका जागेची पाहाणी करण्यात आली आहे. मुंबई पालिकेमार्फत ठाणे शहरात दररोज ६५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा,वैतरणातील जलवाहिन्या ठाणे शहरातून जातात. वैतरणा जलवाहिन्यांद्वारे मुंबई पालिका ठाणे कारवालो नगर,अंबिकानगर,वर्तकनगर, बाळकुम, काजुपाडा, नळपाडा येथे दररोज १६ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -