Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर सोमय्यांचा मोर्चा

मुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर सोमय्यांचा मोर्चा

नोएडातील अनधिकृत टॉवर तुटला, मुंबईतील अनधिकृत इमारतींचे काय? सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : नोएडात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ट्वीन टॉवर उद्धवस्त केल्यानंतर आता मुंबईतील अनधिकृत इमारतींवर आणि त्यांच्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र दिले आहे. तसेच या प्रकरणी कोणत्याही बिल्डरला माफी देण्यात येऊ नये, अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.

विविध प्रकारचे घोटाळे बाहेर काढून राजकारण्यांना जेरीस आणणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर वळवला आहे. याबाबत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे मुंबईतील अनधिकृत इमारतीचे काय? असा सवाल उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.

मुंबईत असे शेकडो अनधिकृत टॉवर आणि हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्ष बांधण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो कुटुंबिय चिंतेत आहे. मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नसून, यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे विशेष ऑडिट करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेले शेकडो टॉवर्स आहेत. माझ्या माहितीप्रमाणे २५ हजाराहून अधिक फ्लॅटधारक ओसी न मिळाल्याने चिंतेत आहेत. त्यामुळे या मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचे रक्षण करण्याची मागणी आपण शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केल्याचे सोमय्या म्हणाले.

किशोरी पेडणेकर यांचे वरळीत अर्धा डझनहून अधिक बेनामी गाळे

किशोरी पेडणेकर यांनी बेनामी गाळ्यांचा ताबा घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा मी एसआरए प्राधिकरणात जाऊन कारवाईची मागणी केली असल्याचेही सोमय्यांनी यावेळी सांगितले. वरळीमध्ये अर्धा अर्धा डझनहून अधिक बेनामी गाळे पेडणेकर यांनी ताब्यात घेतल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

अनिल परबांचा रिसॉर्टही १२ सेकंदात तोडावा

अनिल परब यांच्या मालकीचा रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया अंतिम करण्यासाठी आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली असल्याचे सोमय्यांनी सांगितले. तोडकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले. गणेशोत्सवा दरम्यान कंत्राटदार नेमण्यात येणार असून दिवाळीपर्यंत अनिल परबांचा रिसॉर्ट तुटणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. नोएडातील ट्वीन टॉवर १२ सेकंदात पाडण्यात आले. अगदी तशाच प्रकारे अनिल परब यांचे हे रिसॉर्टदेखील १२ सेकंदात उद्धवस्त झाले पाहिजे. यामुळे भ्रष्ट मंत्र्यांना एक धडा असेल असेही सोमय्यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -