Friday, April 26, 2024
HomeकोकणरायगडPMAY : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेंतर्गत कोकण विभाग ‘अव्वल’

PMAY : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेंतर्गत कोकण विभाग ‘अव्वल’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर सन्मानित

अलिबाग (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई येथे ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ च्या राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते (PMAY).

या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांतर्गत ‘सर्वोत्कृष्ट विभाग’या गटात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रभारी कोकण विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

सन २०२४ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून ‘अमृत महाआवास योजना’ २०२२ -२३ अभियानातील ५ लाख घरे पुढील १०० दिवसात बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

सर्वांना घरे मिळावीत यासाठी राज्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. याकरिता सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना दर्जेदार आणि वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात, तेव्हा राज्याचा विकास वेगाने होत असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -