Friday, April 26, 2024
Homeकोकणरायगडमाथेरानमधील वाहतूक कोंडीवर हवी कायमस्वरूपी उपाययोजना

माथेरानमधील वाहतूक कोंडीवर हवी कायमस्वरूपी उपाययोजना

टॅक्सी संघटनेने गिरिस्थान नगर परिषद, पोलीस प्रशासनाकडे केली मागणी

संतोष पेरणे

नेरळ : माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी विकेंडला पर्यटकांची गर्दी होत असल्याने नेरळ-माथेरान घाटात वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अनेकदा पर्यटकांना दोन ते तीन किलोमीटरचे अंतर घाटातील चढावावर पायी चालत जावे लागते. यावर माथेरान गिरिस्थान नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी मार्ग काढावा, अशी मागणी नेरळ-माथेरान दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी संघटनेने केली आहे.

वातावरणात उष्मा वाढल्याने गारवा अनुभवण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यात सुट्ट्या असल्याने माथेरानमध्ये दररोज हजारो पर्यटक येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत माथेरानच्या पर्यटनाचा ट्रेंड बदलला असून केवळ वीकेंडला माथेरानमध्ये पर्यटक गर्दी करीत असतात, तर माथेरान येथील दस्तुरी नाका येथील चार पार्किंगमध्ये किमान ५०० वाहने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. मात्र शनिवार तसेच रविवार आणि सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढत असल्यामुळे सकाळच्या वेळेपासूनच वाहनांच्या लांबचलांब रांगा नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर लागत असत. त्यात वाहनांची गर्दी होत असताना पार्किंगमधील वाहनेही एकाच वेळी बाहेर पडतात. मात्र त्याबाबत दस्तुरी नाका येथे असलेल्या पोलीस प्रशासनाकडून आणि नेरळ पोलिसांकडून वाहनांच्या कोंडीबाबत कोणतीही माहिती देण्यात येत नाही आणि त्यामुळे घाट रस्त्यात तसेच दस्तुरी नाका येथील पार्किंगच्या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढत जाते.

मागील वर्षी जुलै महिन्यात माथेरान पर्यटनासाठी खुले करण्यात आल्यानंतर अशाच प्रकारे दररोज वाहतूक कोंडीच्या समस्या माथेरान घाटात आणि पार्किंगमध्ये होत होत्या. त्यावेळी लॉकडाऊन असल्याने प्रवासी वाहने तसेच उपनगरीय लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यावेळी येणारा प्रत्येक पर्यटक हा माथेरानमध्ये खासगी वाहने घेऊन येत होता. परिणामी घाटरस्त्यात आणि दस्तुरी येथील वाहनतळ फुल्ल होत होते. त्यावर पालिकेकडून उपाययोजना करताना नेरळ-माथेरान घाटरस्त्यात जुम्मापट्टी येथे वाहने पार्क करण्याची सुविधा करण्यात आली होती. नेरळ येथे वाहने पार्किंग करून माथेरानला जाणे किंवा खासगी वाहने जुम्मापट्टी येथे उभी करून प्रवासी टॅक्सीने माथेरान येथे पर्यटकांना पाठवले जात होते.

त्यावेळी तो प्रयोग यशस्वी झाला होता आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली होती. त्यात मे आणि जून महिना हा माथेरानमधील पर्यटनाचा सर्वात मोठा हंगाम असतो. त्या काळात पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन व लागून सुट्ट्या असल्यास प्रशासनाने जुम्मापट्टी येथे वाहनतळ सुरू करावे, अशी मागणी नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या संघटनेने केली आहे. वाहतूक कोंडीचा फटका महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक बसतो. त्यावेळी अनेक पर्यटकांना किमान दीड किलोमीटर पायपीट करीत दस्तुरी नाका गाठावा लागतो.

प्रशासनाने पर्यटन हंगामात सर्व खासगी वाहनांसाठी दस्तुरी नाका येथील वाहनतळ बंद ठेवून जुम्मापट्टी येथेच वाहनतळ सुरू करावा यासाठी तेथे वन विभागाकडून तात्पुरते वाहनतळ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि त्या वाहनतळावर सुरक्षारक्षकही तैनात करून पर्यटकांच्या वाहनांची काळजी घ्यावी, अशी सूचना ‘नेरळ-माथेरान टॅक्सी संघटना’ यांनी केली आहे.

घाटात वाहतूक कोंडी झाल्यास रुग्णवाहिकांना देखील अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नेरळ- माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नरेश कराळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -