Friday, April 26, 2024
Homeमहामुंबईमंत्री नवाब मलिक यांचे डी कंपनीशी थेट संबंध; मनी लॉन्ड्रिंगही केले

मंत्री नवाब मलिक यांचे डी कंपनीशी थेट संबंध; मनी लॉन्ड्रिंगही केले

मुंबई सत्र न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी ‘डी’ कंपनीच्या सदस्यांची मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठीत आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली २३ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिक यांच्या विरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली. मलिक यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होता, असेही न्यायालयाने निरीक्षणात म्हटले आहे. त्याशिवाय मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळविण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री मलिक यांनी हसीन पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या. मनी लाँड्रिंग केले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावेळी न्यायाधीश रोकडे यांनी असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले आहेत.

वास्तविक २१ एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि त्याचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. दरम्यान, मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील पॉवर ऑफ अॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. ‘आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली,’ असे विशेष न्यायाधीश राहूल एन रोकडे यांनी म्हटले आहे.

अलिशानच्या वक्तव्याने अडचण…

आरोपपत्रात पारकरचा मुलगा अलिशानच्या वक्तव्याचाही समावेश आहे. अलिशानने यापूर्वी ईडीला सांगितले होते की, त्याच्या आईचे २०१४ मध्ये दाऊदच्या मृत्यूपर्यंत आर्थिक व्यवहार होते आणि सलीम पटेल हा तिच्या साथीदारांपैकी एक होता. अलिशानने ईडीला सांगितले होते की, पटेलसह त्याच्या आईने गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवला आणि कार्यालय उघडून त्याचा काही भाग ताब्यात घेतला. नंतर आईने ते मलिक यांना विकले.

मलिक यांना किडनीचा त्रास…

नवाब मलिक यांना किडनीच्या त्रासामुळे त्यांच्यावर कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या खासगी रुग्णालयातील उपचाराच्या अर्जाला परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी नबाब मलिक यांना आर्थर रोड जेलमधून कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. सध्या नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -