Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकेंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन

३०७ नव्या उद्योजकांना १७ कोटी रुपयांच्या बँक धनादेशांचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे शानदार उद्घाटन भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन २१ ते २३ मे या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर चालणार आहे. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी एमएसएमईचे डायरेक्टर पी.एम.पार्लेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी सहकारी उद्यमनगरचे चेअरमन श्रीकृष्ण काणेकर, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे चेअरमन कमलकांत सावंत, मुकुल मेश्राम, डॉ. मिलिंद कुलकर्णी, असिस्टंट डायरेक्टर व्ही.आर. शिरसाट, राहुल मिश्रा, डी. आर. जोहरी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना एमएसएमईचे डायरेक्टर पी. एम.पार्लेवार म्हणले की, आजच्या या कार्यक्रमात २५० नव्या उद्योजकांना निधी वाटप केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हात नवे उद्योग उभे राहत आहेत हे त्याचे उदाहरण आहे. आजचे हे आयोजन नक्कीच यशस्वी झालेले आहे. असा कार्यक्रम प्रथमच घेतला जात असून तो यशस्वी झाला, याचा आनंद आहे, असे पार्लेवार यांनी सांगितले.

सावंतवाडी सहकारी उद्यमनगरचे चेअरमन श्रीकृष्ण काणेकर म्हणाले, नारायण राणे केंद्रात मंत्री झाले हे आमचे भाग्य आहे. त्यांच्यामुळे आता सहकारी उद्यमसारखी खास योजना राबविली जात आहे. एमएसएमईचे अधिकारी स्वतः पाठपुरावा करून येथील उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत, हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळेच शक्य झाले आहे.

चेंबर्स ऑफ कॉमर्सचे चेअरमन कमलाकांत सावंत म्हणाले, मी १९५८ मध्ये मुंबई सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो. मात्र जी ग्रोथ हवी होती, ती मिळाली नाही, मात्र आता बदल होत आहे. जेव्हा आम्ही उद्योग करायला सुरुवात केली तेव्हा २ लाख बँक लोन मिळत नव्हते. जेथे आम्हाला २ कोटींची अपेक्षा होती. मात्र आता परिस्थिती बदलली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे बँक लोन आणि सर्व प्रकरणी लायसन्स दारात उपलब्ध झाली आहेत. आता मार्केटिंगचा प्रश्न सुद्धा सुटला आहे. या संधीचा फायदा घ्या, नोकरीच्या मागे धावू नका उद्योजक व्हा, असे आवाहन सावंत यांनी केले.

यावेळी बँक ऑफ इंडियाचे १५६ लाभार्थ्यांना ६ कोटी १४ लाख, महाराष्ट्र बँकच्या वतीने २ कोटी १२ लाख, तर युनियन बँकच्या वतीने १ कोटी ५३ लाख, बँक ऑफ बडोदाकडून १ कोटी ५३ लाख, कॅनरा बँकेच्या वतीने ८५ लाख, स्टेट बँकेकडून २ कोटी ५० लाख असे एकूण ३०७ नव्या उद्योजकांना १७ कोटी रुपयांचे वेगवेगळ्या बँकांचे धनादेश वितरीत करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -