Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीम्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द, विद्यार्थ्यांचा संताप, पेपर फुटी प्रकरणी तिघे ताब्यात

म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द, विद्यार्थ्यांचा संताप, पेपर फुटी प्रकरणी तिघे ताब्यात

मुंबई : आज, रविवारी आणि या आठवड्यात होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली, अशी घोषणा शनिवारी मध्यरात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून केली. ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान म्हाडाचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. या प्रकऱणी पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली. सायबर पोलिसांच्या सतर्कतेसह एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती आहे.

आव्हाडांनी मध्यरात्री केलेल्या ट्वीटमध्ये व्हिडिओ शेअर करत म्हटले की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

आव्हाड यांच्या ट्वीटनंतर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे बसेस बंद असताना आम्ही खाजगी गाडी करून आलो. ऐनवेळी परीक्षा रद्द केली. आता आमच्यावर बसलेला आर्थिक भुर्दंड कोण देईल? तसेच एका विद्यार्थ्याने म्हटले की, मी परराज्यात शिकायला राहतो. फक्त परीक्षेसाठी आलो होतो. आता इतका खर्च कसा सहन करायचा? असं म्हणत त्याने आव्हाडांना ट्वीटरवर टॅग केले आहे. तर अन्य एकाने आरोग्य विभागामध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजनशून्य कारभार आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

एक लाख उमेदवार बसणार होते परीक्षेला

आज, रविवारी म्हाडासाठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार या पदांसाठी ५० हजार उमेदवार, तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदासाठीच्या परीक्षेसाठी ५६ हजार उमेदवार परीक्षा देणार होते. मात्र त्या आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

काय आहे पार्श्वभूमी

काही दिवसांपूर्वी या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी मंत्री आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत. त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल, असं जाहीर केले होते. यासोबतच त्या दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता. आज ही परीक्षा होणं अपेक्षित होते.

एकूणच दलाली घेतली जात असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -